शुक्रवारी शेतकऱ्यांनी कृषी कार्यालयाला ठोकले होते कुलुप
चांदुर रेल्वे - (शहेजाद खान)-
स्थानिक प्रभारी तालुका कृषी अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभारामुळे कृषी अधिकारी कार्यालय अनेक दिवसांपासुन चर्चेत आहे. अशातच तालुक्यातील आमला विश्वेश्वर येथील संतप्त शेतकरी शुक्रवारी पाणलोट उपजिविका उपक्रमाचा निधी न मिळाल्याने कृषी अधिकारी कार्यालयात गेले असता कृषी अधिकारी कार्यालयात एकही कर्मचारी व अधिकारी उपस्थित नसल्यामुळे कार्यालयाला कुलुप ठोकले होते. मात्र कुलुप ठोकल्यानंतर रविवारपर्यंत कृषी कार्यालयातील एकही अधिकारी, कर्मचारी शेतकऱ्यांशी चर्चा करायला आलेला नसुन तीन दिवसांपासुन कार्यालयाची चाबी शेतकऱ्यांजवळच असल्याची माहिती मिळाली आहे. यावरून प्रभारी तालुका कृषी अधिकाऱ्यांचा बेजबाबदारपणा उघड झाला आहे.
तालुक्यातील आमला विश्वेश्वर येथील श्रमसाफल्य पाणलोट समितीचे सभासद यांनी प्रत्येक चार हजार आठशे सरकारी निधीचा भरणा केल्यावरही फक्त दहा लाभार्थ्यांना अनुदानाचे वाटप करण्यात आले. उर्वरीत ४० लाभार्थ्यांना कृषी कार्यालयातील संबंधित अधिकारी निधीसाठी वारंवार चकरा मारण्याकरीता लावत आहे. या पाणलोट उपजिवीका उपक्रमातील ४० लाभार्थ्यांनी वारंवार मागणी करूनही कृषी अधिकारी कार्यालयातर्फे उपक्रमाचा निधी मिळत नसल्यामुळे शेतकरी कृषी कार्यालयात गेले असता तेथे कोणीही उपस्थित नव्हते. त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी कृषी अधिकारी कार्यालयाला शुक्रवारी कुलुप ठोकले. कुलुप ठोकल्याच्या तीन दिवसानंतरही कार्यालयाची चाबी शेतकऱ्यांकडेच आहे. कृषी अधिकारी कार्यालयातील कोणत्याही अधिकारी वा कर्मचाऱ्यांनी शेतकऱ्यांशी या प्रकरणावर चर्चा करण्याची तसदीही घेतली नसल्याचे समजते. कृषी अधिकारी ऐवढेच जबाबदार असते तर त्यांनी शुक्रवारीच शेतकऱ्यांसोबत चर्चा करणे गरजेचे होते. मात्र त्यांनी किंवा दुसऱ्या कोणत्याही अधिकाऱ्यांनी या गंभीर बाबीकडे लक्ष दिले नाही. पहिलेच लेटलतीफ प्रभारी कृषी अधिकाऱ्यांचा कारभार दिवसेंदिवस चर्चेत असतांना त्यांचा पुन्हा एक बेजबाबदारपणा समोर आला आहे. शेतकऱ्यांसाठी असलेले कृषी अधिकारी कार्यालय शेतकऱ्यांप्रती किती जागृत आहे याचे उदाहरण सुध्दा पहावयास मिळाले आहे.
Post a Comment