प्रवीण गोंगले / चंद्रपूर /----
चंद्रपूर जिल्ह्यातील गडचांदूर या औद्योगिक शहरालगत नांदाफाटा येथे प्रतिष्ठीत डॉक्टर देवराव जोगी आणि त्यांची पत्नी सुधा यांची ३१ ऑगस्ट २०१५ रोजी राहत्या घरी निर्घृण हत्या होती. या प्रकरणातील आरोपींच्या शोधासाठी चंद्रपूर पोलिसांनी सर्व शक्ती पणाला लावली होती. अखेर या प्रकरणातील २ आरोपींना अटक करून पोलिसानी हत्येचा छडा लावला असून काहीकाळ जोगी यांच्याकडे नोकर असलेल्या आरोपींनी जोगी दाम्पत्त्याने अपमानास्पद वागणूक दिल्याने वचपा काढल्याची कबुली दिली आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील गडचांदूर या औद्योगिक शहरालगत नांदाफाटा येथे वास्तव्य करणा-या डॉ. देवराव जोगी आणि त्यांची पत्नी सुधा या परिसरातील सामाजिक दाम्पत्त्य. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज कार्यात अग्रेसर , उत्तम डॉक्टरी व्यवसाय जोडीला औषधी , कृषी केंद्र आणि इतर व्यवसाय सोबत बक्कळ शेती यामुळे जोगी दाम्पत्त्य सुखाचे जीवन जगत होते. मात्र अचानक ३१ ऑगस्ट २०१५ च्या रात्री त्यांची अत्यंत क्रूरपणे राहत्या घरी हत्या करण्यात आली. सकाळी ही घटना उजेडात येताच एकच खळबळ उडाली. घरातील चीजवस्तू , मोबाईल आणि फेकाफेक दरोडा घातला गेल्याचे स्पष्ट करत होते. मात्र पोलिसांनी सर्व बाजूनी तपास चालविला होता. डॉ. जोगी यांचा या परिसरात सावकारी आणि मालमत्ता खरेदी-विक्रीचा व्यवसाय असल्याने पोलिस या धंद्यातील हितशत्रूनी ही घडवून आणले का या दृष्टीने तपास करत होते. मात्र हाती फारसे काही लागत नव्हते. पोलिस अधीक्षकांनी १० महिने तब्बल ५ विविध पथके या कामी तैनात केली होती. अखेर १० महिन्यांनी एक आशेचा किरण दिसला. डॉ. जोगी यांच्या घरून बेपत्ता झालेला एक मोबाईल activate झाला. पोलिसांनी या मोबाईलवर पाळत ठेवली. त्यावरून नांदाफाटा सिमेंट कंपनीत कंत्राटी कामावर असलेल्या प्रकाश जल्लावार या युवकाला ताब्यात घेतले. त्याची विचारपूस केल्यावर त्याने आपल्या एका सहका-याचे सुरेंद्र ठाकरे याचेही नाव घेतले. यातील 'प्रकाश' हा युवक काही काळपर्यंत जोगी यांच्याकडे नोकर म्हणून कामाला होता. जोगी त्याला सतत अपमानास्पद वागणूक द्यायचे. कालांतराने प्रकाशने नोकरी सोडली मात्र त्याने आपल्या सहका-याच्या मदतीने ३१ ऑगस्टच्या रात्री कट रचून दाम्पत्त्याच्या डोक्यावर लोखंडी रॉडने प्रहार करत वचपा काढल्याचे निष्पन्न प्राथमिक तपासात झाले आहे. या घरातून चोरलेल्या सेट टॉप बॉक्स , एलईडी टीव्ही , डीव्हीडी ,दागिने यापैकी एका शिवारात फेकलेला सेट टॉप बॉक्स जप्त करण्यात पोलिसांना यश आले असल्याची माहिती पोलिस अधिक्षक संदिप दिवाण यांनी दिली आहे.
सुमारे १० महिने विविध युक्त्या आणि पर्याय वापरून उलगडा न झालेले हे हत्याकांड अखेर आरोपींच्या अटकेने सोडविले गेले. यासाठी चंद्रपूर पोलिसांची चिकाटी कामी आली. मात्र आरोपीने हत्या करण्यासाठी सांगितलेली सबब पचनी पडताना दिसत नाही. अपमान १२ वर्षापूर्वी झाला असताना हत्या १२ वर्षानंतर का ? या प्रश्नाचे उत्तर आरोपींना पोलिस कोठडीत पोलिसी खाक्या दाखविल्यावर मिळण्याची शक्यता आहे. या २ मोह-यांच्या मागे एखादा मोठा चेहरा तर नाही याचाही माग पोलिस काढत आहेत.
Post a Comment