उल्हासनगर येथील प्रांतीय हिंदू अधिवेशनाचा प्रथम दिवस
हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी दिशादर्शक असणार्या प्रांतीय हिंदू अधिवेशनास उत्साहपूर्ण वातावरणात प्रारंभ !
![]() |
| दीपप्रज्वलन करतांना प.पू. स्वामी कृष्णानंद सरस्वती, सौ. दीक्षा पेंडभाजे, सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर आणि डॉ. उदय धुरी |
उल्हासनगर (जि. ठाणे)-
भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला नदीकाठी नाही, तर जेथे रक्त सांडले, लढाई चालू होती, त्या कुरुक्षेत्रात गीता सांगितली. आपल्याला मंदिरात जाऊन रडायचे नाही, तर भगवंताला समवेत घेऊन धर्मसंस्थापनेसाठी लढायचे आहे, असे मार्गदर्शन बदलापूर (जि. ठाणे), रामगिरी येथील रामदास आश्रमाचे मठाधिपती प.पू. स्वामी कृष्णानंद सरस्वती यांनी केले.
येथील चालिहा मंदिराच्या सभागृहात मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड या जिल्ह्यांचे १२ आणि १३ नोव्हेंबर असे २ दिवसीय पंचम प्रांतीय हिंदू अधिवेशन होत आहे. या अधिवेशनाच्या उद्घाटन सत्रात ते प्रमुख मार्गदर्शक वक्ते म्हणून बोलत होते. आरंभी त्यांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. या वेळी सनातनच्या संत सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर यांची वंदनीय उपस्थिती लाभली. या वेळी व्यासपिठावर हिंदु जनजागृती समितीचे मुंबई प्रवक्ता डॉ. उदय धुरी आणि सनातन संस्थेच्या साधिका आयुर्वेदाचार्य सौ. दीक्षा पेंडभाजे या उपस्थित होत्या. या अधिवेशनाला ६७ हिंदुत्वनिष्ठ उपस्थित होते.
प.पू. स्वामी कृष्णानंद सरस्वती पुढे म्हणाले, "भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितले, 'तू आणि मी वेगळा नाही. तूच श्रीकृष्ण आहेस. तुझा जन्म लढण्यासाठी आहे. शत्रूला मी आधीच मारले आहे'. आपल्याला गीता केवळ वाचायची नाही, तर जीवनात आचरणात आणायची आहे. भगवान श्रीविष्णूने श्रीकृष्ण आणि श्रीराम यांचा अवतार घेऊन मनुष्यरूपात धर्मकार्य केले. त्यांची पूजा करण्यासह आपल्याला धर्मकार्यही करायचे आहे. धर्मकार्य करायचे नसेल, तर केवळ पूजा करून उपयोग काय होईल ? आपल्याला 'पार्ट टाईम' धर्मकार्य करायचे नाही, तर 'फूल टाईम' धर्मकार्य करायचे आहे. असे केले तर आपण अमर राहू. केरळमध्ये मागील २५ वर्षांपासून 'लव्ह जिहाद' अणि हिंदूंचे धर्मांतर करण्याचे कार्य मोठ्या प्रमाणात चालू आहे. हे आताच रोखायला हवे. हिंदू मात्र जातीजातींमध्ये लढत आहेत. हिंदु धर्माला संपवण्यासाठी आंतरराष्ट्रीय षड्यंत्र चालू आहे. 'लव्ह जिहाद' रोखण्याचा प्रयत्न केला, तर हिंदूंना धर्मांध ठरवले जाते. साध्वी प्रज्ञासिंह आणि पूज्यपाद संतश्री आसारामबापू यांना एका षड्यंत्राद्वारे अटक करण्यात आली. असे कधी शाही इमाम वा ख्रिस्ती पाद्री यांच्याविषयी होऊ शकते का ? कुठलेही चर्च किंवा मशीद यांचे सरकारीकरण होत नाही; पण मंदिरांचे सरकारीकरण होते. हे हिंदूंनी लक्षात घेतले पाहिजे. हिंदूंनी भाषा, प्रांत, जाती यांमध्ये न विभागता हिंदु म्हणून हिंदु राष्ट्रासाठी एकत्र यायला हवे. ख्रिस्ती आणि मुसलमान हे पंथ काही सहस्रावधी वर्षांपूर्वीचे आहेत, तर हिंदु धर्म अतिप्राचीन आहे. गीता, रामायण हे ग्रंथ जगण्याचे तत्त्व शिकवतात. श्रीकृष्णाकडे स्वत:साठी सुख मागू नका, तर धर्मकार्य करण्यासाठी शक्ती मागा".
अधिवेशनाला शंखनादाने प्रारंभ झाला. श्री. मयुरेश गोडबोलेगुरुजी यांनी वेदमंत्रपठण केले. यानंतर प.पू. स्वामी कृष्णानंद सरस्वती आणि सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर यांचा सन्मान करण्यात आला. हिंदु जनजागृती समितीचे श्री. योगेश शिर्के यांनी अधिवेशनासाठी परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांनी दिलेल्या संदेशाचे वाचन केले. त्यानंतर हिंदु जनजागृती समितीचे प्रवक्ता श्री. नरेंद्र सुर्वे यांनी 'ढोंगी धर्मनिरपेक्षतेच्या ठिकाणी हिंदु राष्ट्राची स्थापना केल्यावर हिंदूंच्या सर्व समस्यांचे निराकरण होईल', असे प्रांतीय हिंदू अधिवेशनाचा उद्देश स्पष्ट करतांना सांगितले. सूत्रसंचालन हिंदु जनजागृती समितीचे श्री. सुमित सागवेकर यांनी केले.
प.पू. स्वामी कृष्णानंद सरस्वती यांची धर्मकार्य करण्याची तीव्र तळमळ !
मार्गदर्शन करतांना प.पू. स्वामी कृष्णानंद सरस्वती म्हणाले, "मी शरीराने थकलो आहे; मात्र मनाने थकलो नाही. आजही मला धर्मासाठी कार्य करायचे आहे. जीवनात प्रत्येक क्षण धर्मासाठी आणि हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी कार्य करूया". या वेळी त्यांनी 'सनातन आणि हिंदु जनजागृती समितीला केरळ येथे धर्मकार्यासाठी करण्यासाठी सर्वोतोपरी सहकार्य करू', असे सांगितले. केरळ येथे १० लाख जण बसतील एवढे स्टेडियम उभारून त्याचा धर्मकार्यासाठी उपयोग करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला.
प.पू. स्वामी कृष्णानंद सरस्वती यांचा परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती असलेला भाव
मार्गदर्शनाच्या आरंभी प.पू. स्वामी कृष्णानंद सरस्वती यांनी गुरु डॉ. आठवले यांना उत्तम आरोग्य लाभावे यासाठी प्रार्थना केली.
अधिवेशनात सहभागी संघटना
स्वामी गंभीरानंद आश्रम, विश्व हिंदू परिषद, शिवसेना, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थाान, केशवपाडा मित्र मंडळ, स्वराज्य मावळा प्रतिष्ठाान, बजरंग दल, शंभूराजे युवा प्रतिष्ठान, हिंदु राष्ट्र जनजागरण समिती, हिंदू गोवंश रक्षा समिती, स्वराज्य हिंदु सेना, भारत युवा मोर्चा, हिंंदु धर्म एकता, हिंदूमहासभा, सनातन संस्था, हिंदु जनजागृती समिती
साभार - दैनिक सनातन प्रभात संकेतस्थळ


Post a Comment