हिंदुहिताच्या कार्यक्रमांना बळकटी
देण्यासाठी मुंबई, ठाणे, पालघर आणि
रायगड येथील विविध संघटनांचा सहभाग !
ठाणे - हिंदु राष्ट्र स्थापनेच्या उद्देशाने हिंदूंचे राष्ट्रव्यापी संघटन आकार घेऊ लागले आहे. मागील ४ वर्षांच्या यशस्वी अधिवेशनानंतर या वर्षीही १२ आणि १३ नोव्हेंबर हे २ दिवस पाचव्या प्रांतीय अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले आहे. हे अधिवेशन उल्हासनगर येथील चालिहा मंदिर सभागृह येथे होत आहे. या अधिवेशनामध्ये मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड या जिल्ह्यांतील विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. या संघटना संस्कृतीरक्षण, गोरक्षा, हिंदूंच्या मानबिंदूंचे रक्षण, धर्मांतर आणि लव्ह जिहाद या समस्यांविषयी प्रबोधन आदी क्षेत्रांत कार्य करत आहेत. मागील ४ अधिवेशनांत निश्चित झालेल्या समान कृती कार्यक्रमांतून प्रेरणा घेऊन हिंदुहित आणि हिंदूूसंघटन यांविषयी विविध उपक्रम यशस्वीपणे राबवण्यात आले आहेत. याच कार्याला अधिक गती देण्याचा प्रयत्न या अधिवेशनाद्वारे करण्यात येणार आहे, अशी माहिती हिंदु जनजागृती समितीच्या वतीने देण्यात आली.
या अधिवेशनाला विश्व हिंदू परिषद, हिंदु राष्ट्रसेना, शिवसेना, श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, केशवपाडा मित्र मंडळ, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, मी मराठी संघ, रायगड संवर्धन प्रतिष्ठान, नवनाथ सेवा संघ, हिंद सायकल सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, हिंदू एकता समिती, स्वराज्य युवा प्रतिष्ठान, चिन्मय मिशन, वज्रदल, साईनाथ स्पोर्ट्स क्लब, हिंदु महासभा, भारतीय युवा शक्ती, बजरंग दल, गोरक्षक आणि मनसे यांचे पदाधिकारीे, तसेच श्री योग वेदांत सेवा समिती, श्री स्वामी समर्थ संप्रदाय, वारकरी आदी संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित रहाणार आहेत.
राष्ट्र्र आणि धर्म यांचे कार्य करतांना संघटक आणि कार्यकर्ते यांना विविध अडचणींना सामोरे जावे लागते. या अडचणींवर मात करता यावी, तसेच अंगभूत कौशल्याचा विकास व्हावा आणि व्यक्तिमत्त्व विकास कसा करावा, याचे मार्गदर्शन करण्यात येणार आहे. तसेच हिंदु राष्ट्र स्थापनेची आवश्यकता, सामाजिक संकेतस्थळाच्या माध्यमांतून धर्मजागृती कशी करावी, माहिती अधिकार कायद्याचा प्रभावीपणे वापर कसा करावा, याचे प्रशिक्षण आदी विषयांवर तात्त्विक मार्गदर्शन करण्यात येईल.

Post a Comment