BREAKING NEWS
Showing posts with label सांगली. Show all posts
Showing posts with label सांगली. Show all posts

Tuesday, January 24, 2017

सामान्यांना लोकप्रतिनिधी बनवणारा एकमेव नेता म्हणजे बाळासाहेब ठाकरे होय ! – नितीन शिंदे

सांगली– 
प्रखर राष्ट्रभक्त, प्रखर हिंदुत्वनिष्ठ ही ओळख असण्यासमवेत सामान्यातील सामान्य कार्यकर्त्याला आमदार, खासदार बनवणारा एकमेव नेता म्हणजे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे होय ! बाळासाहेबांचे विचार आजही मराठी माणूस आणि हिंदूंना प्रेरणा देतात. नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी देशासाठी केलेले कार्य अतुलनीय होय. त्यांच्यामुळे तरुणांना क्रांतीची नवी दिशा मिळाली, असे मनोगत शिवप्रतापभूमी मुक्ती आंदोलनाचे निमंत्रक आणि माजी आमदार श्री. नितीन शिंदे यांनी केले. ते स्वातंत्रसेनानी नेताजी सुभाषचंद्र बोस आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात बोलत होते.
या वेळी हिंदु एकता आंदोलनाचे श्री. नारायणराव कदम, तसेच व्यंगचित्रकार श्री. गणेश काटकर यांचा सन्मान करण्यात आला. या प्रसंगी श्री. पंडितराव बोराडे, सर्वश्री स्वप्नील कुंभोजकर, महिला आघाडीच्या सुनिता इनामदार यांसह अन्य उपस्थित होते.

Friday, January 6, 2017

अवैधरित्या शस्त्रे विक्री प्रकरणी संजय साडविलकर यांचे अन्वेषण करण्यासाठी न्यायालयाने पोलिसांना आदेश द्यावा ! – सनातनचे अधिवक्ता समीर पटवर्धन यांची मागणी

सांगली –
sanjay-sadvilkar
 संजय साडविलकर हे गुन्हेगार असून त्यांनी अवैधरित्या शस्त्रे बाळगून गुन्हे केल्याची स्वीकृती विशेष अन्वेषण पथक (एस्आयटी) आणि न्यायाधीश यांच्यासमोर दिली आहे. त्यामुळे या स्वीकृतीच्या आधारे संजय साडविलकर यांच्या अवैध शस्त्र विक्री प्रकरणाचे अन्वेषण करण्याविषयी न्यायालयाने पोलिसांना आदेश द्यावा, असा युक्तीवाद सनातनचे अधिवक्ता श्री. समीर पटवर्धन यांनी ६ जानेवारी या दिवशी कवठेमहांकाळ (जिल्हा सांगली) येथील न्यायालयात केला. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी श्री. प्रवीण नवले यांनी संपूर्ण युक्तीवाद ऐकून घेतल्यानंतर या खटल्याची पुढील सुनावणी १३ जानेवारीला ठेवली आहे.
घटनाक्रम असा…
संजय साडविलकर यांच्या विरोधात कवठेमहांकाळ येथील सौ. आशाताई पोतदार यांनी पोलीस ठाण्यात २९ ऑक्टोबर २०१६ या दिवशी तक्रार केली होती; मात्र पोलिसांनी या तक्रारीची नोंद न घेतल्याने सांगलीचे पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांच्याकडे २१ नोव्हेंबर २०१६ या दिवशी तक्रार प्रविष्ट केली होती. तरीही पोलिसांनी या प्रकरणी कोणतीही कार्यवाही न केल्यामुळे १३ डिसेंबर २०१६ या दिवशी कवठेमहांकाळ येथील न्यायालयात संजय साडविलकर यांच्या विरोधात याचिका प्रविष्ट करण्यात आली.
अधिवक्ता समीर पटवर्धन युक्तीवाद करतांना म्हणाले की,
१. डॉ. दाभोलकर आणि कॉ. पानसरे हत्या प्रकरणे ही महाराष्ट्रातील संवेदनशील अन् गाजलेली प्रकरणे आहेत. १६ फेब्रुवारी २०१५ या दिवशी कॉ. पानसरे यांची हत्या झाल्यानंतर या प्रकरणी सनातनचे साधक श्री. समीर गायकवाड यांना ऑक्टोबर मासात अटक झाली होती.
२. त्यानंतर सनातनचे साधक डॉ. वीरेंद्रसिंह तावडे यांना अटक करण्याची प्रक्रिया चालू असतांनाच एक दिवस आधी संजय साडविलकर यांनी प्रसारमाध्यमांसमोर डॉ. तावडे यांना ओळखतो, असा जबाब एस्आयटीच्या शपथेवर नोंदवला आहे.
३. या जबाबात साडविलकर यांनी वर्ष १९८५ ते १९८८ या कालावधीत माझ्याकडे दुसरा व्यवसाय नसल्याने मी उदरनिर्वाहासाठी गावठी रिव्हॉल्व्हर खरेदी-विक्रीचे काम करत होतो. त्यामुळे मला रिव्हॉल्व्हर बनवणे आणि दुरुस्त करणे याची माहिती होती, अशी माहिती स्वतःहून एस्आयटीला दिली आहे. याचा अर्थ संजय साडविलकर हे अवैध शस्त्र विक्रीचे गुन्हे करत होते, हेच सिद्ध होते.
४. त्यामुळे या कबुलीजबाबाच्या आधारे संजय साडविलकर आणि संगनमत करून विकणारे सर्व गुन्हेगार अन् साथीदार कोण ? त्यांनी शस्त्रे कोणाला विकली ? किती गुन्हे घडले ? आदी गुन्ह्यांचे अन्वेषण होणे हे समाजाच्या दृष्टीने आवश्यक आहे.
५. सौ. आशाताई पोतदार यांनी प्रविष्ट केलेल्या तक्रारीची नोंद न घेतल्याने कवठेमहांकाळ येथील न्यायालयात तक्रार नोंदवण्यात आली आहे. या सर्व गोष्टींचा विचार करून फौजदारी आचारसंहिता १५६(३) प्रमाणे या गुन्ह्याचे अन्वेषण करण्यासाठी न्यायालयाने पोलिसांना आदेश द्यावा, अशी विनंती करत आहोत.

Saturday, December 24, 2016

संस्कृती भ्रष्ट करणारा अन् युवा पिढीला नासवणारा सनबर्न फेस्टिव्हल रहित करा ! - रणरागिनी

मारुती चौक येथे आंदोलन करतांना रणरागिणी शाखेच्या महिला
रणरागिणी शाखेची आंदोलनाद्वारे नारीशक्तीची चेतावणी सनबर्न फेस्टिव्हल रहित करा !

      सांगली - अमली पदार्थांचा गैरवापर आणि अनैतिक कृत्ये यांमुळे कुप्रसिद्ध ठरलेला सनबर्न फेस्टिव्हल गोव्यातून सांस्कृतिक आणि शैक्षणिक राजधानी असणार्‍या पुण्यात हालवण्यात आला आहे. हा फेस्टिव्हल संस्कृती भ्रष्ट करणारा अन् युवा पिढीला नासवणारा असल्याने २८ ते ३१ डिसेंबर २०१६ या काळात पुणे येथे होणारा सनबर्न फेस्टिव्हल रहित करावा, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीप्रणित रणरागिणी शाखेच्या सौ. मधुरा तोफखाने यांनी केली. त्या २४ डिसेंबर या दिवशी मारुती चौक येथे झालेल्या आंदोलनप्रसंगी बोलत होत्या. या वेळी ३१ डिसेंबर या दिवशी गडकोटांच्या पावित्र्य रक्षणासाठी शिवभक्त, शिवप्रेमी संघटना, पोलीस आणि प्रशासन यांनी साहाय्य करावे, असे आवाहन सनातन संस्थेच्या सौ. वैशाली राजहंस यांनी केले. या प्रसंगी ९० हून अधिक हिंदुत्वनिष्ठ महिला उपस्थित होत्या. या वेळी स्वाक्षरी अभियान राबवण्यात आले, याला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला. अनेक नागरिक थांबून विषय ऐकत होते. 
     या वेळी स्वा. सावरकर प्रतिष्ठानच्या सौ. वर्षा देशपांडे म्हणाल्या, देशाला स्वांतत्र्य मिळाले; पण आपण खरोखरच स्वतंत्र झालो आहोत का ? अद्यापही अनेक पाश्‍चात्त्य परंपरांच्या आपण मानसिक गुलामगिरीत आहोत. भारतीय संस्कृती महान असून आपल्याला प्राचीन परंपरा आहेत. त्यामुळे हिंदु संस्कृतीचा महान असा वारसा लक्षात घेऊन आपण नवीन वर्ष हे १ जानेवारीला न साजरे करता गुढीपाडव्यालाच साजरे केले पाहिजे. 
     या वेळी माजी मुख्याधिपिका श्रीमती लता कोल्हटकर म्हणाल्या, पाश्‍चात्त्यांच्या वातावरणात आणि भारतियांच्या वातावरणात मोठा फरक आहे. भारतीय संस्कृतीत गुढीपाडव्याला अनेक चांगले पालट होतात. झाडांना पालवी फुटते. याउलट असे काहीही पाश्‍चात्त्य संस्कृतीत घडत नाही. होळी, रंगपंचमी, दिवाळी अशा प्रत्येक सणाला धर्मशास्त्रीय आधार आहे. हिंदूंनी नवीन वर्षाच्या शुभेच्छा या गुढीपाडव्याला दिल्या पाहिजेत. 
     या वेळी भाजपच्या सौ. आशताई पोतदार, संस्कृत शिक्षिका सौ. संपदा पाटणकर, श्रीमती हेमा मानधना यांनीही मनोगत व्यक्त केले. 
सहभागी संघटना - स्वा. सावरकर प्रतिष्ठान, माहेश्‍वरी महिला संघटना, भाजप, हिंदु विधीज्ञ परिषद, हिंदु जनजागृती समिती, सनातन संस्था, रणरागिणी शाखा, प.पू. अनिरुद्धबापू संप्रदाय 
उपस्थित मान्यवर - स्वा. सावरकर प्रतिष्ठानच्या सौ. वर्षा देशपांडे, कोल्हापूर जिल्हा माहेश्‍वरी महिला संघटनेच्या साहित्य आणि सांस्कृतिक समितीच्या प्रमुख श्रीमती हेमा मानधना, हिंदु विधीज्ञ परिषदेच्या अधिवक्त्या (सौ.) भारती जैन, प.पू. अनिरुद्ध बापू संप्रदायाच्या सौ. आरती कुरबेट्टी, माजी मुख्याध्यापिका श्रीमती लता कोल्हटकर 

Friday, December 9, 2016

कोल्हापूर येथे होणार्‍या धर्मजागृती सभेसाठी उपस्थित राहून धर्मकर्तव्य बजावा ! - सचिन पवार, श्रीशिवप्रतिष्ठान

पत्रकार परिषदेत उपस्थित डावीकडून सौ. स्मिता
माईणकर, सौ. गौरी खिलारे आणि श्री. सचिन पवार

       सांगली - हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आयोजित हिंदु धर्मजागृती सभा या हिंदूंमध्ये नवचैतन्य निर्माण करतात. या सभेला श्रीशिवप्रतिष्ठानचा पाठिंबा आहे. तरी सांगली येथील हिंदूंनीही ११ डिसेंबर या दिवशी कोल्हापूर येथे होणार्‍या धर्मसभेसाठी उपस्थित राहून धर्मकर्तव्य बजावावे, असे आवाहन श्रीशिवप्रतिष्ठानचे विभागप्रमुख श्री. सचिन पवार यांनी केले. ते येथे कोल्हापूर येथे होत असलेल्या हिंदु धर्मजागृती सभेच्या पार्श्‍वभूमीवर आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. ही पत्रकार परिषद ९ डिसेंबर या दिवशी हरिदास भवन येथे घेण्यात आली. या वेळी हिंदु जनजागृती समितीच्या सौ. गौरी खिलारे, तसेच सनातन संस्थेच्या सौ. स्मिता माईणकर उपस्थित होत्या.

Friday, October 21, 2016

अभय वर्तक यांच्यावर गुन्हा प्रविष्ट करण्यासाठी अवामी लीग पार्टीचे अश्रफअली वांकर आणि त्यांचे सहकारी यांचा सांगली पोलिसांवर दबाव !

सनातन संस्थेचे प्रवक्ता श्री. अभय वर्तक यांनी महाराष्ट्र 
१ या वाहिनीवरील चर्चासत्रात केलेल्या वक्तव्याचे प्रकरण

         सांगली - सनातन संस्थेचे प्रवक्ता श्री. अभय वर्तक यांनी महाराष्ट्र १ या दूरचित्रवाहिनीवरील चर्चासत्रात केलेल्या वक्तव्याचे भांडवल करून त्यांच्यावर गुन्हा प्रविष्ट करण्यासाठी अवामी लीग पार्टीचे अश्रफअली सलीम वांकर आणि अन्य लोक यांनी सांगली ग्रामीण पोलिसांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. श्री. वर्तक यांच्यावर गुन्हा प्रविष्ट झाला पाहिजे, यांसाठी वांकर आणि त्यांचे सहकारी २० ऑक्टोबर या दिवशी दिवसभर सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यासमोर ठिय्या मारून बसले होते. अशा प्रकारे एखाद्या वक्तव्यावर गुन्हा प्रविष्ट होत नाही, असे सांगूनही ते ऐकण्यास सिद्ध नव्हते. शेवटी पोलिसांनी सदर प्रकरणी योग्य तो कायदेशीर सल्ला आणि वरिष्ठ अधिकारी यांचे मार्गदर्शन घेऊन लवकर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याची तजवीज ठेवली आहे, असा उल्लेख करून त्यांना तक्रारीच्या अर्जावर पोच दिली. 
         वांकर यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, मी बुधगाव येथे रहाणारा असून १९ ऑक्टोबर या दिवशी महाराष्ट्र १ न्यूज वाहिनी पहात असतांना सदर चर्चासत्रात उपस्थित असलेले अभय वर्तक यांनी ज्या वेळी आझाद मैदानावर दंगे झाले, त्या वेळी मराठा पोलीस महिलांवर मुसलमानांनी बलात्कार केले, अशा प्रकारचे वक्तव्य जाणीवपूर्वक आणि पूर्वग्रहदूषितपणे केले. यामुळे माझ्यासह मुसलमान बांधवांच्या भावना दुखावल्या आहेत. या वक्तव्यामुळे मुसलमान आणि मराठा समाज यांच्यात तेढ अन् द्वेष निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे त्यांच्यावर भारतीय दंड संहिता २९५ अ आणि १५३, तसेच इतर अन्य कलमांनुसार गुन्हा प्रविष्ट करून कायदेशीर कारवाई करावी. 
         या वेळी शेरूभाई सौदागर, करीम मेस्त्री, असिफ बावा, रजाक नाईक, नालबास मुल्ला, अज्जू पटेल, लालू मेस्त्री, अकबर शेख, इमरान जमादार, उमर गवंडी, जमीर सनदी, आक्रम शेख, इकबाल खान, फारूक मुल्ला यांसह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते. 
         गुन्हा प्रविष्ट होण्याची मागणी करणार्‍यांमध्ये सामाजिक कार्यकर्ते असीफ बावा यांचा समावेश होता. बावा यांच्यावर काही दिवसांपूर्वी पोलीस अधीक्षक कार्यालयावर बेकायदा जमाव जमवून मोर्चा काढल्याच्या प्रकरणी गुन्हा प्रविष्ट आहे.

Tuesday, September 27, 2016

सांगलीत मराठा एकजुटीचे विराट दर्शन

सांगली – तळपत्या उन्हात सांगलीत आज मराठ्यांचा महासागर उसळला आणि प्रक्षुब्ध मनाचा नि:शब्द हुंकार सांगलीकरांनी अनुभवला. लाखो मराठा मोर्चेकर्‍यांनी शहराचे प्रमुख रस्ते व्यापून टाकल्याने काही काळासाठी शहर पूर्णपणे ठप्प झाले. उन्हाची तमा न बाळगता महिलाही मोठ्या प्रमाणात या मूक मोर्चात सहभागी झाल्या. गर्दीचा विक्रमी उच्चांक मोडत आणि शांतता व शिस्तीचे दर्शन घडवीत हा मूक मोर्चा ऐतिहासिक ठरला.सकल मराठा समाजाच्या वतीने आज सांगलीत मराठा क्रांती मूक मोर्चा काढण्यात आला. विश्रामबाग चौक येथील क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून मोर्चाची सुरुवात करण्यात आली. विश्रामबाग चौक ते राममंदिरच्या दिशेने निघालेल्या मोर्चामध्ये लाखो मराठा शिस्तबद्धपणे सहभागी झाले होते. संपूर्ण शहरात भगवी लाट उसळल्याचे चित्र पाहायला मिळत होते. राममंदिर चौकापर्यंत येणार्‍या मोर्चाचे शेवटचे टोक मिरजनजीक होते; तर राममंदिर ते सिव्हिल हॉस्पिटल आणि राममंदिर ते काँग्रेस भवन असे तिहेरी रस्ते गर्दीने फुलून गेले होते. आजपर्यंतच्या मोर्चांच्या गर्दीचा विक्रम मोडून नवा इतिहास घडविला. मोर्चाच्या प्रारंभी विश्रामबाग येथील क्रांतिसिंह नाना पाटील चौकात माजी मंत्री डॉ. पतंगराव कदम, जयंत पाटील, प्रतीक पाटील यांच्यासह सर्वच राजकीय पक्षांचे मराठा नेते उपस्थित होते. मोर्चात अग्रभागी मुली व महिला, त्यापाठोपाठ तरुण शिस्तबद्धपणे सहभागी झाले होते. राममंदिर चौकात मोर्चा आल्यानंतर चार मुलींनी आपला आक्रोश भाषणातून व्यक्त केला. तत्पूर्वी अक्षया पाटील, चैत्राली घोरपडे, विश्‍वजा शिंदे, स्नेहल पवार, अंकिता मोहिते, सुश्मिता पै, किरण कदम, प्रियांका एडके, मोहिनी शिंदे या १० मुलींच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांना मागण्यांचे निवेदन दिले. निवेदन दिल्यानंतर राममंदिर चौकात योगिता पाटील, स्नेहल पवार, कवठेपिरान येथील अश्‍विनी, विट्याची पूजा आदींनी आवेशपूर्ण भाषणांतून मराठ्यांचा हुंकार मांडला. ही ऐतिहासिक वज्रमूठ क्रांतिकारक चळवळ बनली आहे. मराठा समाजाच्या मागण्या सरकारने त्वरित मान्य करून न्याय दिला नाही तर सनदशील मार्गाने संघर्षाचा तीव्र लढा उभारण्याचा इशारा यावेळी या तरुणींनी मोठ्या आवेशात दिला. या सभेचा प्रारंभ कोपर्डी येथील अत्याचारग्रस्त निर्भया, आत्महत्या केलेले शेतकरी व शहीद जवानांना श्रद्धांजली वाहून करण्यात आला. राष्ट्रगीताचे गायन होऊन मोर्चाचा समारोप झाला.

Friday, September 23, 2016

सार्वजनिक नवरात्रोत्सवात होणारे अपप्रकार थांबवा - हिंदु जनजागृती समितीचे पोलीस निरीक्षक यांना निवेदन



पोलीस निरीक्षक श्रीकांत पिंगळे (डावीकडे)
यांना निवेदन देतांना हिंदुत्वनिष्ठ 
       सांगली - भारतीय संस्कृतीचे जतन करणे, तसेच समाज, राष्ट्र आणि धर्म यांविषयी जागृती करणे या उद्देशाने सार्वजनिक नवरात्रोत्सवाला आरंभ झाला; मात्र सध्या सार्वजनिक नवरात्रोत्सवात अनेक अपप्रकार शिरले आहेत. चित्रपटगीतांच्या तालावर गरबा खेळणे, मद्यपान करणे, अश्‍लील अंगविक्षेप करत नाचणे, बळजोरीने वर्गणी गोळा करणे, सजावटीवर अनाठायी व्यय करणे, मंडपात जुगार खेळणे आदी कारणांनी उत्सवाचे पावित्र्य नष्ट होत आहे. तरी सार्वजनिक नवरात्रोत्सवात होणारे अपप्रकार थांबवण्यासाठी पोलीस प्रशासनाने पुढाकार घ्यावा, या मागणीचे निवेदन पोलीस अधीक्षक कार्यालयात गृहखात्याचे पोलीस निरीक्षक श्रीकांत पिंगळे यांना हिंदु जनजागृती समितीच्या वतीने देण्यात आले. या वेळी समितीचे कार्यकर्ते आणि अन्य उपस्थित होते.

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.