BREAKING NEWS

Sunday, April 10, 2016

प्रतिकूल परिस्थितीतही राज्याचा विकास दर वाढला ही आनंदाची बाब - अर्थमंत्री श्री सुधीर मुनगंटीवार ◆ अर्थमंत्री श्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले अर्थसंकल्पाचे विश्लेषण

http://vidarbha24news.com/ShowNews.aspx?id=2302

●प्रवीण गोंगले /विशेष बातमी /----● आम्ही सत्तेत आलो तेव्हा कर्जाच्या डोंगराचा , मागे पडलेल्या विकास दराचा वारसा आम्हाला मिळाला . मात्र आम्ही योग्य नियोजन करत मार्ग काढण्यावर भर दिला . राज्य प्रतिकुल परिस्थितीचा सामना करत असताना राज्याचा विकास दर ५.८ टक्क्याहून ८ टक्क्यापर्यंत वाढला ही सर्वात जमेची बाजु आहे. अर्थसंकल्पात जनतेच्या आशा आकांक्षांचे प्रतिबिंब दिसावे यासाठी आम्ही नागरिकांच्या सुचना मागविल्या . जो काटकासरीसाठी उत्तम सुचना देईल त्यास १० लक्ष रु. चे पारितोषिक जाहीर करत या प्रक्रियेत लोकसहभाग वाढविण्याचा प्रयत्न आम्ही केला . हे वर्ष शेतकरी स्वाभिमान वर्ष म्हणून आपण साजरे करीत आहोत .लाखाचा पोशिंदा असलेल्या शेतकरी राजाला स्वाभिमानाचा घास मिळावा म्हणून २६ हजार ८९१ कोटी रु. ची तरतूद कृषीक्षेत्र व शेतकरी बांधवांसाठी केली , असे प्रतिपादन अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले . दि. ९ एप्रिल रोजी चंद्रपुरात ज्ञानज्योती विचार मंच या संस्थेद्वारे आयोजित अर्थसंकल्पाचे विश्लेषण या कार्यक्रमात अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार बोलत होते . कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ कल्याणकर होते . मंचावर आ. नानाजी शामकुळे , आ संजय धोटे , सौ. सपना मुनगंटीवार , महापौर सौ. राखी कंचर्लावार, ज्ञानज्योती विचार मंचचे अध्यक्ष श्री रवींद्र भागवत यांची उपस्थिती होती . यावेळी बोलताना अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार पुढे म्हणाले , अर्थसंकल्पाच्या माध्यमातून सर्वच क्षेत्रांना न्याय देण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे . चांद्यापासून बांद्यापर्यंत असे महाराष्ट्राचे वर्णन केले जाते . मी चांद्याचा आणि वित्त राज्यमंत्री बांद्याचे असल्याने संपूर्ण महाराष्ट्राच्या विकासाचे योग्य नियोजन करण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे . गेल्या वर्षी अर्थसंकल्प मांडताना सिंचन क्षेत्रासाठी केलेल्या तरतुदीला एका पैशाचाही कट लावला तर पुढचा अर्थसंकल्प मांडणार नाही अशी प्रतिज्ञा मी विधानसभागृहात केली होती ती प्रतिज्ञा पूर्ण केल्याचा मला मनापासून आनंद आहे . तरुणांना स्वयंरोजगाराच्या संधी प्राप्त व्हाव्या यासाठी जेसीबी मशीन खरेदी योजना आम्ही जाहीर केली . या योजनेच्या माध्यमातून फक्त त्यांना जेसीबी मशीन आम्ही देणार नसून त्यांना कामे सुद्धा देण्यात येतील . निराधारांच्या अनुदानात वाढ करण्याचा निर्णय , राज्यमहामार्गावर महिलांसाठी स्वच्छतागृहे बांधण्याचा निर्णय , महिलांसाठी स्वतंत्र तेजस्विनी बसेसचा निर्णय , स्वतःची घरे नसलेल्या स्वातंत्र्य संग्राम सैनिकांना घरे देण्याचा निर्णय, गोवंश गोवर्धन केंद्र स्थापण्याचा निर्णय, जलसाक्षरता जलजागृती केंद्र स्थापन करण्याचा निर्णय, अंगणवाडी सेविका व मदतनीस भगिनींना विमा संरक्षण , दहा हजार अंगणवाड्या आदर्श करणे , उद्योग क्षेत्रासाठी विजसवलत असे अनेक निर्णय , योजना , संकल्प सांगत त्यासंदर्भात आपली भूमिका त्यांनी विस्तृतपणे मांडली . शेतकऱ्यांना प्रगत तंत्रज्ञानाचा लाभ व्हावा म्हणून कृषी गुरुकुल योजना , कृषी महोत्सव योजना या सारख्या योजना आम्ही जाहीर केल्या आहेत असे सांगत योजनानिहाय तरतुदीबाबत विस्तृत आकडेवारी देत अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्पाचे विश्लेषण केले . चंद्रपूर जिल्ह्यासाठी मोठया प्रमाणावर निधी उपलब्ध करण्यात आला असल्याचे सांगत या जिल्ह्यातील नागरिकांच्या प्रेमामुळेच आपण आज या पदापर्यंत पोहचू शकलो असेही अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले . अध्यक्षीय भाषणात बोलताना डॉ कल्याणकर यांनी सामाजिक बांधिलकी भान बाळगत सर्वसमावेशक असा अर्थसंकल्प सादर केल्याबद्दल अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे अभिनंदन केले . स्व. आर. आर. पाटील यांच्या स्मृत्यर्थ सांगली जिल्ह्यात सभागृह बांधण्याचा अर्थमंत्र्यांचा संकल्प त्यांच्या व्यक्तिमत्वाचे मोठेपण , अजातशत्रुत्व दर्शविते असेही डॉ कल्याणकर म्हणाले . कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुहास अलमस्त यांनी तर संचालन दत्तप्रसन्न महादाणी यांनी केले . कार्यक्रमाला नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती .



Share this:

Post a Comment

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.