BREAKING NEWS

Saturday, April 8, 2017

'प्रवास प्रकाशाकडे’ उपक्रमातून चिमुकल्यांची आकाशाला गवसणी

महेन्द्र महाजन / रिसोड  / वाशिम : 



समाजसेवक अविनाश मारशेटवार व मित्रपरिवाराच्या अनोख्या उपक्रमातून सोनखास येथील जिल्हा परिषद शाळेच्या चिमुकल्यांनी विमान प्रवासाच्या शैक्षणिक सहलीतून आकाशाला गवसणी घातली. या सहलीतून मुलांना नवे जीवन अनुभवता आले व त्यांच्या आत्मविश्‍वासाला जिज्ञासेचे नवे पंख फुटले.
    ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या शाळेतील गरीब, होतकरु व गुणवंत विद्यार्थ्यांच्या विकासाला व कलागुणांना चालना मिळावी, त्यांना प्रत्यक्ष जीवनानुभव मिळून प्रेरणा मिळावी या हेतूने समाजसेवक अविनाश मारशेटवार व मित्रपरिवाराच्या पुढाकारातून चिमुकल्यांना बालवयातच जगावेगळया प्रवासाचा अनुभव घेता यावा या उदात्त हेतुने जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा सोनखास या शाळेतील पाच विद्यार्थ्यांची उच्च कसोटीतून निवड करुन ‘प्रवास प्रकाशाकडे’ या उपक्रमामधून अनोख्या विमान प्रवासाच्या शैक्षणिक सहलीची पर्वणी उपलब्ध करुन दिली.3 ते 6 एप्रिल या कालावधीत शैक्षणिक अभ्यास सहलीसाठी नागपुर-पुणे या ठिकाणच्या शैक्षणिक व विशेष स्थळांना भेटी देणे. त्यामध्ये वातानुकुलित बस, कार, विमान यामधून प्रवास, विशेष भोजन व निवास असा विविधांगी उपक्रमाचे नियोजन प्रसिद्व टुर्स ऍण्ड टॅव्हल्स कंपनी गो पर्यटकचे मालक निखिल नांदगावकर पुणे यांनी करुन विद्यार्थ्यांसाठी विनामुल्य सेवा उपलब्ध करुन दिली.
    या प्रवासादरम्यान मुलांना नागपूर येथे विभागीय पासपोर्ट ऑफिसला भेट, नागपूर मेट्ो प्रकल्प भेट, प्रसिद्व रमन सायंस सेंटरच्या भेटीत थ्रीडी शो, तारांगण व विविध वैज्ञानिक प्रयोग हाताळून मुलांनी भरभरुन आनंद घेतला. त्यानंतर नागपूर-पुणे विमान प्रवासाची अविस्मरणीय संधी चिमुकल्यांना मिळाली. या विमान प्रवासाचा मुलांनी भरभरुन आनंद लुटला. पुणे येथे दोन दिवसाच्या शैक्षणिक सहलीत रामीलेक्स या उत्पादक कंपनीस भेट देवून तेथील उत्पादनाची माहीती, ड्रोन विमानाची माहिती, कंपनीच्या सर्व विभागाची माहीती, रॉ मटेरियलची विल्हेवाट, तेथील प्रशासन, त्यांच्या उद्योग उभारणीचा प्रवास पाहीला. त्यासोबतच उद्योेगपती राम जोगदंड व अविनाश जोगदंड यांचे मार्गदर्शन मुलांना लाभले. यावेळी विद्यार्थ्यांच्या विविध बालसुलभ प्रश्‍नंाची उत्तरे जोगदंड यांनी देवून त्यांच्या जिज्ञासेचे निराकरण केले. पुणे येथील प्रसिध्द फिनिक्स मॉलला भेट देवून मल्टीप्लेक्स चित्रपटगृहातील चित्रपटाचा आनंद मुलांनी लुटला. ऐतिहासिक सिंहगडाची पायवाटेने सैर करुन सिंहगडाच्या इतिहासाची माहिती देण्यात आली. आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांच्या मुलांना दत्तक घेवून त्यांचे शिक्षण व पालन पोषण करणारे व अवघ्या सव्वीसाव्या वर्षात अभियांत्रिकी सेवा सोडून समाजसेवा करणारे अशोक देशमाने यांच्या ‘स्नेहवन’ ला भेट देवून तेथील मुलांच्या भेटी घेतल्या. त्यांनी मुलांना मोलाचे मार्गदर्शन केले.
    पंचतारांकित जेडब्यु मॅरीट हॉटेलला भेटीचा अद्भुत अनुभव मुलांनी घेवून ज्युस व चहाचा आनंद घेतला. या भेटीचा रोमांचकारी अनुभवांनी मुले प्रफुल्लीत झाली. शनिवारवाडयातील लेजर शो मधून मराठयांच्या जिवंत इतिहासाची ओळख मुलांना करुन देण्यात आली. दगडूशेठ गणपती दर्शन, शाळा भेट, खडकवासला धरण व पुणे दर्शन करुन देण्यात आले. प्रवासादरम्यान मुलंाच्या राहण्याची उच्च दर्जाची व्यवस्था, थाटबाट सारख्या हॉटेलमधील चांदीच्या ताटामधील भोजनाचा स्वानंद, प्रसिद्ध कल्याण भेळची चव, बास्किन रॉबिन्सच्या आईस्क्रीमची चव, बीएमडब्ल्यु वातानुकुलित महागडया गाडीने प्रवास, हार्डले डेविडसन 1700 सीसी या 21 लाखाच्या टु व्हीलरचा अनुभव या अशा विविधांगी मेजवाणीचा अविस्मरणीय अनुभव मुलंाना अविनाश मारशेटवार समाजसेवक व मित्रपरिवार वाशिम हयांच्या ‘प्रवास प्रकाशाकडे’हया सामाजिक उपक्रमातुन देण्यात आला.
    गा्रमीण भागातील सरकारी शाळेत शिकणार्‍या गुणवंत व होतकरु विद्यार्थ्यांंच्या कल्पनाशक्तीच्या ज्ञानकक्षांना उत्तुंग भरारी मिळुन नवी सामाजिक जाणिव निर्माण व्हावी या हेतूने हा उपक्रम राबविण्यात आला. जिल्हा परिषद शाळेकडे पाहण्याचा समाजाचा बदलेला दृष्टीकोन ह्या उपक्रमामधून दिसून आला. अशा उपक्रमाचे सामाजिक जाण असणार्‍या सुजाण नागरिकांनी स्वागतच करावयास हवे. अशा उपक्रमांना व शाळांना वारंवार संधी देवून भविष्यात अशा उपक्रमाचे आयोजन मोठया प्रमाणात करायला पाहीजे.
    हया आगळ्यावेगळया उपक्रमामध्ये मुलांच्या बॅगपासून टॉवेल्सपर्यंत संपुर्ण खर्चाचा भार उचलणारे समाजसेवक अविनाश मारशेटवार व त्यांचा  मित्र परिवारांचे सर्व स्तरातून स्वागत होत असून या अनोख्या उपक्रमामुळे सोनखासच्या विद्यार्थ्यांनाही क्षितीजापलीकडील नवे जीवन अनुभवण्याची संधी मिळाल्याने या चिमुकल्यांच्या चेहर्‍यावर वेगळाच आनंद ओसंडून वाहत होता. डाएट प्राचार्या डॉ. प्रतिभा तायडे, शिक्षणाधिकारी जुमनाके, गट शिक्षणाधिकारी गजानन बाजड, डॉ. हरिष बाहेती आदी अनेकांनी या उपक्रमाचे कौतूक केले आहे.

Share this:

Post a Comment

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.