प्रवीण गोंगले / चंद्रपूर /---
चंद्रपूर जिल्हयाची जीवनवाहिनी असलेल्या इरई नदीच्या पुनरुज्जीवन कार्यक्रमाचा आढावा घेण्यासाठी उद्या दि. 07 मे, 2016 रोजी सायं 7 वा चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीला जलपुरूष डॉ. राजेंद्र सिंह यांची विशेष उपस्थिती राहणार आहे. वित्तमंत्री तथा चंद्रपूर जिल्हयाचे पालकमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांच्या विनंतीनुसार डॉ. राजेंद्र सिंह या बैठकीला उपस्थित राहतील.
चंद्रपूरात झालेल्या जलपरिषदे दरम्यान वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी इरई नदीचे पुनरुज्जीवन करण्याचा मानस व्यक्त केला होता व जलपुरुष डॉ. राजेंद्र सिंह यांना या प्रकियेत सहकार्य करण्याचे आवाहन केले होते. त्यावेळी डॉ. राजेंद्र सिंह यांनी या प्रक्रियेत सर्वतोपरि सहकार्य करण्याचे आश्वासन वित्तमंत्री ना. मुनगंटीवार यांना दिले होते.
दि. 10 एप्रिल, रोजी इरई नदी पुनरूज्जीवनाच्या कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. त्यानंतर दि. 30 एप्रिल रोजी वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पडोली पुलाजवळ सदर कार्यक्रमाची पाहणी केली. या पाहणीदरम्यान लवकरच जलपुरुष डॉ. राजेंद्र सिंह यांना आमंत्रित करण्यात येणार असल्याचे सांगत एक चांगला आराखडा तयार करून डॉ. राजेंद्र सिंह यांच्यासमोर कामाचे सादरीकरण करण्याच्या सूचना ना. मुनगंटीवार यांनी प्रशासनाला दिल्या होत्या. त्यानुसार दि. 07 मे रोजी होणा-या बैठकीसाठी डॉ. राजेंद्र सिंह यांना आमंत्रित करण्यात आले आहे.
नदी पुनरुज्जीवन अंतर्गत प्रामुख्याने इरई धरणस्थळाच्या खाली पाणलोट क्षेत्रात ठिकठिकाणी चेक डॅम बांधकाम करणे, इरई धरण स्थळापासून खालील भागात 9 साखळी बंधा-याचे बांधकाम करणे, शहराला लागून असलेल्या पडोली पुलापासून व दाताळा पुलाजवळ सौदर्यीकरण करणे,चंद्रपूर शहरा लगतच्या बाजुला आवश्यक त्या ठिकाणी संरक्षण भिंतीचे बांधकाम करणे इत्यादी कामे प्रस्तावित असून सदर कामाकरीता 84 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. या कार्यक्रमासाठी चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्राच्या माध्यमातून तसेच शासनाच्या विवीध योजनांच्या माध्यमातून योगदान व आर्थिक सहभाग देण्याचे मान्य करण्यात आले आहे.
या बैठकीत डॉ. राजेंद्र सिंह यांच्यासह वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार इरई नदी पुनरुज्जीवन कार्यक्रमाचा आढावा घेणार असून बैठकीला जिल्हाधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर यांच्यासह संबंधित सर्व अधिका-यांची उपस्थिती राहणार आहे. दि. 08 मे रोजी सकाळी इरई नदी पुनरुज्जीवन कार्यक्रमाची प्रत्यक्ष पाहणीसुध्दा डॉ. राजेंद्र सिंह करतील.
ना. सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारातून चंद्रपूर जिल्हयातील दोन हजार अंगणवाडयांना होणार रेडीओ व स्पिकर्सचे वितरण
ना. सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारातून चंद्रपूर जिल्हयातील दोन हजार अंगणवाडयांना होणार रेडीओ व स्पिकर्सचे वितरण
वित्तमंत्री तथा चंद्रपूर जिल्हयाचे पालकमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने चंद्रपूर जिल्हयातील दोन हजार अंगणवाडयांना रेडीओ तसेच स्पिकर्सचे वितरण करण्यात येणार आहे.
ना. सुधीर मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतून व पुढाकारातून चंद्रपूर जिल्हयातील आंगणवाडी सेविकांची एक दिवसीय “बाल आकार” नामक प्रशिक्षण कार्यशाळा 17 ऑक्टोबर, 2015 ला घेण्यात आली. तसेच 2016-17 च्या अर्थसंकल्पातसुध्दा राज्यातील दहा हजार अंगणवाडया आदर्श व स्मार्ट म्हणून विकसित करण्याचा संकल्प त्यांनी जाहिर केला. यासाठी 100 कोटी रु. तरतूद करण्यात आली. त्याचबरोबर चंद्रपूर जिल्हयातील 100 आंगणवाडी सेविकांच प्रशिक्षकांचे प्रशिक्षण यशदा पुणे द्वारे घेण्यात आले.
ना. सुधीर मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतून व प्रयत्नाने पावर ग्रीड या कंपनीच्या सी.एस.आर. निधीमधून दोन हजार अंगणवाडयांना रेडीओ व स्पिकर्स देण्याचे निश्चित करण्यात आले असून मे 2016 च्या अखेर चंद्रपूर जिल्हयातील अंगणवाडयांना सदर रेडीओ स्पिकर्सचे वितरण करण्यात येईल.
आकाशवाणी चंद्रपूरच्या माध्यमातून प्रत्येक आठवडयात एक ते दोन तासाच्या कालावधीत अंगणवाडीतील बालकांसाठी, गरोदर माता, स्तनदा माता, किशोरवयीन मुली यांच्यासाठी जागृतीपर कार्यक्रम प्रसारीत करण्यात येणार आहे. सदर कार्यक्रमासाठी यशदा पुणे येथील तज्ञ तसेच राज्यातील इतर तज्ञ मार्गदर्शकांची मदत घेण्यात येईल.
ना. सुधीर मुनगंटीवार हे प्रथमत: सर्व अंगणवाडी सेविकांना आकाशवाणीद्वारे संबोधित करतील. देशाच्या उज्वल भविष्यासाठी 0 ते 5 वयोगटातील बालकांवर योग्य संस्कार करणे व त्यांची आरोग्य विषयक देखभाल करणे अत्यंत महत्वाचे असून त्यादृष्टीने प्रभावी उपाययोजना करण्यासाठी राज्य सरकार कटीबध्द असल्याने ना. सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटले आहे.
Post a Comment