BREAKING NEWS

Friday, July 22, 2016

‘तालीम’मध्ये दिसणार लावणीचं लावण्य...

अनिल चौधरी /
पुणे :---


नाविन्यपूर्ण विषय आणि आशयावर चित्रपट बनविण्यासाठी प्रसिद्ध असलेली मराठी चित्रपटसृष्टी दिवसेंदिवस दृष्ट लागण्याजोगं यश मिळवत आहे. अशातच एक काळ गाजवणारा महाराष्ट्राच्या लाल मातीतील खेळ असलेली कुस्ती ‘तालीम’ या चित्रपटातून रूपेरी पडद्यावर दिसणार आहे. बऱ्याच बॉलिवूडपटांचे यशस्वी संकलन केल्यानंतर थेट मराठीत दिग्दर्शनाकडे वळलेल्या नितीन मधुकर रोकडे यांच्या ‘तालीम’ या आगामी मराठी चित्रपटात प्रेक्षकांना पुन्हा एकदा कुस्तीचे डावपेच पाहायला मिळणार आहेत. रघुजन फिल्म्स, रोअरिंग गोट मीडिया आणि एनएमआर मूव्हीज या बेनरअंतर्गत निर्माते सुदर्शन लक्ष्मण इंगळे, संजय मुळे, जयआदित्य गिरी आणि नितीन मधुकर रोकडे यांनी ‘तालीम’ चित्रपटाची निर्मिती केली असून येत्या 5 ऑगस्ट 2016 रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
‘तालीम’ या चित्रपटात प्रेक्षकांना लावणीचं एक नवं लावण्य पाहायला मिळणार आहे. या चित्रपटातील ‘‘इश्काचा बाण सुटला...’’ ही लावणी केवळ कर्णमधुर नसून ती नेत्रसुखदही झाली आहे. या लावणीचं चित्रीकरण जुन्नरमधील घाटघर येथे खास भव्य दिव्य असा सेट उभारून करण्यात आलं आहे. या सेटवर अभिनेत्री वैशाली दाभाडे यांच्यावर ही लावणी चित्रीत करण्यात आली असून ‘तालीम’मध्ये प्रेक्षकांना नावीन्यपूर्ण अशी एक ठसकेबाज लावणी पाहायला मिळणार आहे. मराठी चित्रपटसृष्टीतील सध्याचे आघाडीचे गीतकार मंदार चोळकर यांच्या लेखणीतून अवतरलेल्या या लावणीला संगीतकार प्रफुल्ल कार्लेकर यांनी संगीत दिले आहे. रोंकणी गुप्ता आणि स्वप्निल गोडबोले यांच्या सुमधूर आवाजात ही लावणी ध्वनीमुद्रित करण्यात आली आहे.
‘तालीम’मध्ये वैशाली दाभाडे लक्ष्मी सातारकरच्या भूमिकेत दिसणार आहे. वजनदार घुंगरू पायात घालून तासन्तास सराव करताना हे पात्र साकारण्यासाठी वैशालीने बरीच मेहनत घेतली आहे. या लावणीवर नृत्य करताना खऱ्या अर्थाने लावणी नृत्य काय असते याची जाणीव झाल्याची भावना वैशाली दाभाडे यांनी व्यक्त केली. प्रेक्षकांना अस्सल लावणीचा आनंद यातून लुटता येईल असंही वैशालीचं मत आहे. यानिमित्ताने लावणीच्या खऱ्या स्टेप्स जाणून घेता आल्या, त्या शिकताना कसून मेहनत करावी लागल्याचं वैशाली म्हणाली.
‘तालीम’चे दिग्दर्शक नितीन रोकडे यांनी याविषयी माहिती देताना सांगितले, मराठी चित्रपट हा मराठी प्रेक्षकांच्या मनातील असावा, त्यामुळेच कुस्तीवर आधारित कथा निवडली. या चित्रपटात केवळ कुस्ती नसून लावणीचाही समावेश आहे. ही लावणी भव्य दिव्य असावी असं मला सुरूवातीपासून वाटत होतं. त्यामुळेया लावणीतील प्रत्येक फ्रेम एखाद्या तसबीरीसारखी वाटावी यासाठी विशेष मेहनत घेण्यात आली आहे. ही मेहनत प्रेक्षकांना पडद्यावर लावणी पाहताना नक्कीच जाणवेल. विशेषतः निर्मात्यांनी अतिशय सहकार्य केल्याने ही लावणी सहा दिवस शूट करणं शक्य झाल्याचं दिग्दर्शक नितीन रोकडे यांनी सांगितलं.
‘तालीम’मध्ये अभिजीत श्वेतचंद्र, वैशाली दाभाडे, प्रशांत मोहिते, विष्णू जोशीलकर, मिताली जगताप, छाया कदम, यशपाल सारनाथ, अर्जुन यांच्या प्रमुख भूमिका आहेत. दिग्दर्शन आणि संकलनाबरोबरच या चित्रपटाची कथा-पटकथा नितीन मधुकर रोकडे यांनी लिहिली आहे.

Share this:

Post a Comment

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.