🔹चांदूर रेल्वे / शहेजाद खान 🔹
नगरपालीका मुख्याधिकाऱ्याकडे शहराच्या समस्या व तेथील पालीकेच्या मालकीच्या जागेची देखभाल व रक्षणाची जबाबदारी असतांना चांदूर रेल्वे मुख्याधिकाऱ्यानी नगर परिषद समोरील नवीन व्यापारी संकुलातील न.प. मालकीची विहीर बुजविल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. ज्यांच्याकडे सार्वजनिक मालमत्तेच्या रक्षणाची जबाबदारी आहे तेच मुख्याधिकारी न.प.मालमत्तेच्या मुळावर उठल्याचे चित्र पहायला मिळत आहे.
स्थानिक नगर परिषद समोर पशु वैद्यकिय दवाखान्या आहे.या दवाखान्याजवळ नवीन दुमजली व्यापारी संकुलाचे काम सुरू असुन ते काम पुर्णत्वास आले आहे. या जागेवर मुबलक पाणी असणारी नगर परिषदेच्या मालकी विहीर आहे. या विहीरीला भर उन्हाळ्यात मुबलक पाणी राहते. या जागेवर व्यापारी संकुलाचे बांधकाम सुरू असतांना सदर जागेतील सार्वजनिक विहीर बुजवु नये व या विहिरीच्या पाण्याचा उपयोग संकुलातील दुकानदारांना व्हावा असे निवेदन मागील वर्षी नगरपालीका मुख्याधिकारी तसेच उपविभागीय अधिकाऱ्यांना दिले होते. त्यावर एसडीओ यांनी दिलेल्या सुचनेवरून तत्कालीन मुख्याधिकारी मंगेश खवले यांनी सदर विहिरीची डागडुगी करून त्यावर जाळी बसविली होती. परंतु आता नगर परिषदेत नवीन आलेल्या मुख्याधिकारी गिता ठाकरे यांनी नियम ढाब्यावर बसवुन सदर विहीर बुजविण्याचे आदेश दिले. त्यांच्या आदेशावरून संबधीत कंत्राटदाराने विहीर बुजविली आहे. सदर विहीरीचा नवीन व्यापारी संकुलाचे बांधकामात कोणताही अडथळा होत नव्हता. उलट नवीन व्यापारी संकुलातील दुकानदार व नागरिकांना या विहीरीच्या पाण्याचा उपयोगच होता. या प्रकरणाची त्वरीत चौकशी करून बुजविलेली विहीर पुन्हा उपसण्यात यावी व विहिरीचे पाण्याचा उपयोग व्यापारी संकुलासाठी करावा अशी मागणी स्थानिक नागरिकांनी उपविभागीय अधिकारी यांना दिलेल्या निवेदनातुन केली आहे.
Post a Comment