चांदूर रेल्वे / शहेजाद खान /-----
परिसरातील अत्यल्प व अल्पभुधारक शेतकऱ्यांनी सन २०१४ व २०१५ मध्ये आपल्या पिकांना खरीप हंगामात पिक विम्याचे संरक्षण मिळावे म्हणून शासन निर्णयानुसार विम्याचे प्रिमियम भरून पिकांना संरक्षित केले. परंतु शेतकऱ्यांनी पिक विमा काढुनही चांदूर रेल्वे शहरातील राष्ट्रीयकृत बँकांनी गेल्या दोन वर्षापासुन शेतकऱ्यांना राष्ट्रीय पिक विमा संरक्षित रक्कमेपासुन वंचित ठेवुन अत्यल्प भरपाई मिळणाऱ्या हवामानावर आधारित पिक विम्याचे संरक्षण दिल्याने शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागत आहे.
मागील दोन खरीपाच्या हंगामात शासनाच्या पिक विमा धोरणाप्रमाणे शेतकऱ्यांचा पिकांचे संरक्षण होऊन नुकसान भरपाई मिळत असल्याने शेतकरी पिक विम्याकडे आर्किषत झाला. सलग दोन वर्षापासुन शेतकऱ्यांना कुठल्या पिकांना व कोणत्या प्रकारचा विमा काढायचा हे ऐकुन न घेता ऐच्छीक व कर्जदार शेतकऱ्यांना हवामानावर आधारित पिक विमा काढून विम्याची प्रिमियम कर्जातुन परस्पर कपात करण्यात येते.या विम्याचे प्रिमियम अधिक असुन शेतकऱ्यांना मिळणारा फायदा अत्यल्प आहे. ऐवढचे नव्हे तर मिळणारी नुकसान भरपाईची रक्कम शेतकऱ्यांचा कर्ज खात्यात जमा करून त्यांची बोळवण बँका करीत आहे. २०१४ मध्ये मौजा शिरजगाव कोरडे येथील लसनापुर च्या अल्पभुधारक शेतकऱ्यांसोबत असाच प्रकार घडला. येथील शेतकऱ्यांनि स्वतः बँकेत जावुन २०१५ चा पिक विमा संरक्षित करतांना हवामानाचा पिक विमा न काढता राष्ट्रीय पिक विम्याचे पिकांना कवच देण्याची विनंती केली. बँक कर्मचाऱ्यानी होकार दिला. मात्र पुढे पाठ मागे सपाट उक्तीप्रमाणे या शेतकऱ्यांना पुन्हा हवामानावर आधारित पिक विमा काढला व विम्याची प्रिमियम रक्कम शेतकऱ्यांचा बँक खात्यातून कपात केली.२०१४ मध्ये तलाठ्याचे पेरेपत्रक कृषी विभागाने काढुन दिलेल्या दरानुसार व कागदपत्रांची पुर्तता करून नगद रक्कम शेतकऱ्यांनी खात्यात जमा केली. तर बँकेने कर्जदार शेतकऱ्यांचा कर्जाच्या खात्यातुन २०१४ ला रू.७०२ ची रक्कम हवामानावर आधारित पिक विमाकडे वळती करून रू.१६०० चा फायदा देत ती रक्कम शेतकऱ्यांचा कर्ज खात्यात जमा केली. तर २०१५ मध्ये २६०० रूपये हवामानावर आधारित पिक विम्याची नुकसान भरपाईची त्यांच्या कर्ज खात्यात जमा केली. अशावेळी या शेतकऱ्यांनी हसावे कि रडावं अशी स्थिती त्यांची झाली आहे. आमचा प्रतिनिधींनी या शेतकऱ्यांची भेट घेतली असता त्यांनी हवामानावर आधारित पिक विम्याची तारिख गेल्यानंतर शेतकऱ्यांना राष्ट्रीय पिक विम्याचे कवच न देता हवामानावर आधारित पिक विम्याचे सरंक्षण कसे काय दिले याकडे लक्ष वेधुन शासनाने दोन्ही वर्षांचा राष्ट्रीय पिक विम्याचा लाभ शेतकऱ्यांना द्यावा अशी मागणी केली.
Post a Comment