मुंबई - आमच्या देशात कारवाई कोणावर होते, तर साध्वी
प्रज्ञासिंह यांच्यावर होते. काश्मिरात अतिरेक्यांशी लढणार्या कर्नल
श्रीकांत पुरोहित यांच्यावर होते. अन्वेषण यंत्रणा 'सनातन'सारख्या आश्रमात
जाऊन वृद्ध, अपंग साधकांचा छळ करतील. हिंदुत्ववाद्यांवर, प्रखर
राष्ट्रभक्तांवर कठोर कारवाई करण्याची एकही संधी ही मंडळी सोडणार नाही; पण
१८ सैनिकांचे बळी घेणार्या पाकड्यांवर म्हणावी, तशी कठोर कारवाई होत नाही.
ती आता तरी होईल, अशी अपेक्षा आहे, असेे परखड प्रतिपादन शिवसेनेचे
पक्षप्रमुख श्री. उद्धव ठाकरे यांनी २१ सप्टेंबरच्या दैनिक सामनाच्या
संपादकियातून केले आहे.
त्यांनी पुढे म्हटले आहे की,
१. महाभारतात भीम किचकाची मांडी फोडून घटाघटा रक्त प्यायला होता, तसा बदला
घ्या. किचकाने द्रौपदीस मांडी दाखवून अपमानित केले. त्याचा बदला भीमाने
घेतला. हिंदुस्थानच्या हातात भीमाची गदा आहे, बांगड्या नाहीत, हे दाखवा.
बदला घ्या ! खरंच बदला घ्या ! पाकिस्तान आतंकवादी देश आहेच. त्याला
आतंकवादी देश घोषित करण्याचा व्यर्थ खटाटोप कशाला ? पाकिस्तान कंगाल आणि
भिकारी आहेच. त्याच्यावर आर्थिक निर्बंधांची गुळणी टाकून काय होणार ?
निर्लज्ज आणि कोडग्यांना शब्दांच्या माराने काय धडा मिळणार ? 'लाथों के भूत
बातों से नहीं मानते. कृती करा ! बदला घ्या !' १८ सैनिकांच्या कुटुंबांचा,
१२५ कोटी जनतेचा हाच आक्रोश आहे.
२. हिंदुस्थानवर संकटाचा पहाड कोसळला आहे. अशा वेळी राजकीय मतभेदांना गाडून
सरकारच्या पाठीशी ठाम उभे रहाण्याची आवश्यकता आहे. १८ सैनिकांच्या
बलीदानाने देश सुन्न झाला असून अजूनही धक्क्यातून सावरलेला नाही.
३. पाकिस्तानला धडा शिकवू, उरीतील घटनेचा बदला घेऊ, आक्रमणकर्त्यांना
सोडणार नाही, असे आमच्या पंतप्रधानांनी सांगितले आहे. त्यासाठी आम्ही
त्यांचे अभिनंदन करतो आणि 'पाकिस्तानला धडा शिकवण्याचे बळ त्यांना लाभो',
अशी आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना करतो; पण पाकिस्तानला धडा शिकवणार म्हणजे
नक्की काय करणार ? पठाणकोटवरील हल्ल्यानंतरही अशाच प्रकारची वक्तव्ये
जोरकसपणे करण्यात आली होती, त्याचे काय झाले ? पाकिस्तानला धडा शिकवण्याचे
बाजूला राहिले आणि त्यांच्याशी प्रेमालाप चालू झाला. पठाणकोटचे बलीदान जणू
व्यर्थ गेले. 'जागतिक पातळीवर पाकिस्तानचा मुखवटा फाडू आणि त्यांचा खरा
चेहरा उघडा करू', असे पठाणकोटच्या वेळी सांगितले.
४. पठाणकोटवरील आक्रमणानंतर आमच्या लष्करप्रमुखांनीही खणखणीत शब्दांत
सांगितलेच होते, 'पाकिस्तानला त्यांच्याच भाषेत उत्तर देऊ. बदला घेऊ. वेळ,
दिवस आणि जागा आम्ही ठरवू !' उरीतील भयंकर घटनेनंतरही ले. जनरल रणबीर सिंह
यांनी तेच प्रखर शब्द वापरले.
पाकला 'जशास तसे' उत्तर देण्याची वेळ आली आहे ! - उद्धव ठाकरे
मुंबई - पाकिस्तानला जशास तसे उत्तर देण्याची वेळ आता आली आहे.
पाकिस्तानकडून वारंवार होणारी आक्रमणे हा माझा एकट्याचा नव्हे, तर संपूर्ण
भारतातील जनतेचा प्रश्न आहे. आता युद्ध देशासाठी व्हायला हवे,
निवडणुकीसाठी नको, असे परखड प्रतिपादन शिवसेना पक्षप्रमुख श्री. उद्धव
ठाकरे यांनी केले. येथे २१ सप्टेंबर या दिवशी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते
बोलत होते. या वेळी त्यांनी उरी येथील लष्करी तळावरील आक्रमणाचा निषेध
नोंदवला. त्यांनी 'मराठा आरक्षण प्रश्नाच्या संबंधी स्वतंत्र अधिवेशन
बोलवा', असेही म्हटले.
श्री. ठाकरे पुढे म्हणाले...
१. पंतप्रधान मोदी यांच्याकडे बहुमत असल्याने त्यांनी पाकिस्तानच्या विरोधात कारवाई करावी.
२. उरी येथील आक्रमणामुळे देशभरात संतापाची लाट पसरली आहे. सरकारने लोकांचा संताप लक्षात घ्यावा.
३. पाक भारताशी कसा वागतो, ते विसरू नका. प्रत्येक आक्रमणानंतर केवळ चौकशी करणे हेच धंदे चालू ठेवायचे का ?
४. आक्रमणाच्या संदर्भात पूर्वसूचना मिळाली होती, तर मग गाफीलपणा कुणी केला ?
५. पाकवर आक्रमण करण्याचे धाडस कोण दाखवणार ?
Post a Comment