BREAKING NEWS

Monday, September 19, 2016

गोंडखैरी, ब्राम्हणी, धापेवाडा ग्रापंला प्रत्येकी 50 लाख रुपये देण्याची - पालकमंत्र्यांची घोषणा

·         शासन आपल्या दारी उपक्रम
·         मुख्यमंत्री व गडकरीमुळेच निधी उपलब्ध
·         ग्रापंत अल्ट्रा वॉटर फिल्टर प्लॉन्ट लावावा
·         साडेसात ते आठ हजार गावकऱ्यांशी थेट संवाद
·         कर्मचारी मुख्यालयी राहात नसल्याच्या तक्रारी
·         शुध्द पाण्यासाठी कायमस्वरुपी योजना

नागपूर / भीमराव लोणारे /--

 गोंडखैरी, ब्राम्हणी व धापेवाडा या तीनही मोठया ग्रामपंचायतींना विकास कामांसाठी आपण प्रत्येकी 50 लाख रुपयांचा निधी देणार असल्याची घोषणा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज केली. या निधीतून सिमेंट रस्ते कमी घ्या व प्रत्येक ग्रामपंचायतमध्ये अल्ट्रा वॉटर फिल्टर प्लॉन्ट लावण्याचे निर्देशही पालकमंत्र्यांनी प्रशासनाला दिले. पाच लोकसंख्येपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतींना 50 लाख रुपये देण्याचे ठरविण्यात आल्याचेही ते म्हणाले.
या तीनही ग्रामपंचायतीत आज आपल्या समस्यांसाठी शासन आपल्या दारी उपक्रमांतर्गत पालकमंत्र्यांनी वरील घोषणा केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यामुळेच या जिल्हयाला विकास कामांसाठी निधी उपलब्ध होत असल्याचेही पालकमंत्री बावनकुळे यांनी याप्रसंगी आवर्जून सांगितले.
याप्रसंगी व्यासपीठावर भाजपाचे जिल्हाध्यक्ष डॉ. राजीव पोतदार, जि.प. अध्यक्षा निशा सावरकर, मुख्य कार्यपालन अधिकारी कादंबरी बलकवडे, माजी जि.प. अध्यक्ष रमेश मानकर, दिलीप जाधव, सोनबा मुसळे, सरपंच गीताताई हावरे, उपसरपंच हेमराज पोहनकर, श्रीमती मांडवकर, अजय वाठकर, ब्राम्हणी येथील कार्यक्रमात राजेश जीवतोडे, संजय टेकाडे, किशोर रेवतकर, दादाराव मंगळे, उमेश्वर मावळकर, जि.प. सदस्य शुभांगी वैद्य, धापेवाडा येथील कार्यक्रमात जि.प. सदस्या अरुणा मानकर, अशोक धोटे, मीना तायवाडे, धापेवाडा सरपंच प्रकाश टेकाडे, प्रेम झाडे, दिलीप धोटे, प्रमोद हत्ती, संदीप उपाध्ये, बेबीबाई धुर्वे, गजानन आवारी, डॉ. मनोहर काणे, सतिश मिश्रा, संजय निमजे, बंसीलाल कुमरे, मंगेश कोटाडे, विनोद धोटे, शेखर वैद्य, संजय काळे, संजय चालखोर, दुर्गादास तभाने, भाऊराव अतकरी, मौदनकर, प्रवीण गमे, आदी उपस्थित होते.
गोंडखैरी जि.प. प्राथमिक शाळेत झालेल्या कार्यक्रमात याप्रसंगी बोलताना पालकमंत्री म्हणाले, शुध्द पाणी, आरोग्य, फवारणी, स्वच्छता, घनकचरा व्यवस्थापन या कामांसाठी शासन प्राधान्याने अनुदान देणार आहे. नागरिकांनी आता प्रशासनाकडून कामे करुन घ्यावी. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रयत्नाने सर्वांना घरकुले मिळणार आहे. आर्थिक दृष्टया मागासलेल्यांचा लाभ होईल. यासाठीची बीपीएलची अट आता निघाली आहे. रेशन धान्य दुकानांतून सर्वांना धान्य मिळेल. येथूनही एपीएल, बीपीएलची अट बाजूला होणार आहे. मशीनवर अंगठा ठेवला की धान्य मिळणार त्यामुळे आता काळाबाजार होणार नाही.
गावांचा विकास करतांना गावकऱ्यांचे सहकार्य आवश्यक आहे. त्याशिवाय विकास होणार नाही. प्रशासनाला मदत करा, असे आवाहनही पालकमंत्र्यांनी केले. ब्राम्हणी या गावातही पालकमंत्र्यांनी नगर पंचायत होईपर्यंत 50 लाख रुपये निधी ब्राम्हणीलाही देण्यात येईल अशी घोषणाही पालकमंत्र्यांनी केली. 50 लाखांच्या कामाच्या ई-निविदा काढण्याच्या सूचनाही पालकमंत्र्यांनी याप्रसंगी केल्या.
या तीनही गावात महावितरणकडून करण्यात येणाऱ्या कामाचा आढावा घेऊन उपस्थित नागरिकांच्या तक्रारी ऐकून घेतल्या. गोंडखैरी व ब्राम्हणी येथे अजूनही 12 तास वीजपुरवठा शेतकऱ्यांना मिळाला नाही. याबद्दल महावितरणच्या अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. तसेच महसूल, आरोग्य, पाणीपुरवठा, पोलीस, कृषी विभाग, पशुसंवर्धन अशा सर्व विभागांचा आढावा घेत या तीनही ठिकाणी पालकमंत्री बावनकुळे यांनी साडेसात ते आठ हजार नागरिकांशी भेट संपर्क करुन संवाद साधला.
शासन आपल्या दारी या उपक्रमात लक्षात आले की, कोणत्याही विभागाचा कर्मचारी मुख्यालयी राहात नाही याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करुन वरिष्ठ अधिकाऱ्यांना कारवाईचे निर्देश देण्यात आले. गोंडखैरी येथील आरोग्य विभागाच्या मुख्यालयी न राहणाऱ्या तीन कर्मचाऱ्यांवर कारवाई म्हणून वेतनवाढ रोखण्यात आल्याची माहिती पालकमंत्र्यांना देण्यात आली. गावांमध्ये सध्या अस्तित्वात असलेल्या नळयोजनांना पाणी मिळत नसल्याच्या तक्रारी गावकऱ्यांनी केल्या. या संदर्भात अधिकाऱ्यांचे समाधानकारक उत्तरे मिळाली नाहीत. महसूल निरीक्षक, कृषी सहायक, पटवारी, तहसिलदार, लाईनमन, कनिष्ठ अभियंते गावात राहात नसल्याचे यावेळी स्पष्ट झाले. महसूल विभागाचे कर्मचारी गावात राहात नसल्यामुळे शेतकऱ्यांना सातबारा प्रमाणपत्र घरपोच मिळत नाही. येत्या ऑक्टोबर ते डिसेंबरपर्यंत सर्व शेतकऱ्यांना घरपोच सातबारा प्रमाणपत्र देण्यात येईल, तसेच मागासवर्गीय विद्यार्थ्यांना त्यांच्या शाळेतच जात प्रमाणपत्र मिळेल असे आश्वासन प्रशासनातर्फे देण्यात आले.
पोलिस विभागाने अवैध दारुबंदी करावी, तसेच सट्टापट्टी बंद करण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले. गावातील समस्या गावकऱ्यांच्या तोंडी वदवून घेऊन प्रशासनासमोर पालकमंत्र्यांनी ठेवल्या. यावरुन प्रशासनाने गावात खूप कामे करण्याची गरज असल्याचे लक्षात आले. निधी नसेल तर सांगा निधी देऊ पण कामे वेळेत झाली पाहिजे यावरच पालकमंत्र्यांचा अधिक आग्रह होता.
डासांवर नियंत्रणासाठी दर महिन्याला गावात फवारणी करणे आवश्यक असताना एकाही गावात फवारणी झाली नसल्याचे नागरिकांच्या तक्रारीवरुन स्पष्ट होत होते. याबाबत पालकमंत्र्यांनी आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांची कानउघडणी केली. ब्राम्हणीत गेल्या तीन वर्षात एकदाही फवारणी झाली नसल्याचे स्पष्ट झाले. आरोग्य केंद्रात डॉक्टर, कर्मचारी, औषधे नसल्याच्या तक्रारी या कार्यक्रमात समोर आल्या.
शुध्द पाणी मिळावे यासाठी कायमस्वरुपी योजना आपण करणार असल्याचे पालकमंत्री बावनकुळे यांनी यावेळी सांगितले. कृषी विभागाचे अधिकारी, तहसिलदार, गटविकास अधिकारी यांनी मोठया ग्रामपंचायतीत शेतकऱ्यांना प्रशिक्षण व मार्गदर्शन करावे. आठवडयात दोन ग्रामपंचायतीत जिल्हा कृषी अधिकाऱ्यांनी जावे. जिल्हा कृषी अधिकारी व शेतकऱ्यांचा संवाद झाला पाहिजे. हा उपक्रम राबवा असे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले. तसेच महावितरणच्या अधिकाऱ्यांनी शुक्रवार-शनिवार ग्रामपंचायतींचा दौरा करावा. सरपंचाच्या भेटी घ्याव्या. त्यांच्या समस्या ऐकाव्या व डिसेंबरपर्यंत सरपंचाच्या तक्रारी सोडवाव्या, असे स्पष्ट निर्देश याप्रसंगी देण्यात आले.

Share this:

Post a Comment

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.