BREAKING NEWS

Friday, September 16, 2016

केतकी बनली संगीतकार

अनिल चौधरी , पुणे :-
काही व्यक्तींना जन्मजातच दैवी देणगी मिळालेली असते. अभिनयासोबतच गायनाचाही सुरेल गळा लाभलेली केतकी माटेगावकरही त्यापैकीच एक आहे असं म्हणायला हरकत नाही. आजवर बऱ्याच चित्रपटांद्वारे केतकीच्या अभिनयाचे विविध पैलू जगासमोर आले आहेत. केतकीच्या आवाजातील बरीच गाणी तरूणाईच्या ओठी रूळली आहेत. “मला वेड लागले प्रेमाचे...” या केतकीच्या गाण्याने केवळ तरूणाईलाच नव्हे तर अबालवृद्धांना अक्षरशः वेड लावलं. यांसारखी बरीच गाजलेली गाणी देणारी केतकी आता अभिनय आणि गायनासोबतच संगीत दिग्दर्शिकाही बनली आहे. नेहमीच काहीतरी वेगळ करण्याच्या ध्यासाने पछाडलेल्या केतकीने ‘फुंतरू’ या चित्रपटात रोबोची भूमिका साकारत सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं. काही दिवसांपूर्वाच प्रदर्शित झालेल्या ‘वायझेड’ या चित्रपटात तिने संस्कृत गाणं गाण्याचं धाडस केलं, जे रसिकांना खूप भावलं. संगीतकाराच्या रूपात आपल्या कारकिर्दाची सुरूवात करताना केतकीने भक्तीरसाने ओतप्रोत भरलेलं गाणं स्वरबद्ध केलं आहे. “हरी दर्शनाची ओढ...” असे बोल असलेलं हे गीत सुप्रसिद्ध गायक सुरेश वाडकर यांच्या आवाजात ध्वनीमुद्रित करण्यात आलं आहे.
“विठ्ठल  भक्तीत मन हे चकोर...” असा मुखडा असलेलं हे गीत सुरेशजींच्या आवाजात ऐकताना कान तृप्त होतात. लहान वयात केतकीने अतिशय सुरेख संगीत या गीताला दिलं आहे. कमलेश भडकमकरने संगीत अरेंजरची जबाबदारी सांभाळली आहे. रघुवेंद्र गणेशपुरे यांनी हे गीत लिहिलं आहे.
अभिनय, गायन आणि आता संगीत दिग्दर्शन करण्याबाबत बोलताना केतकी म्हणाली, गाणं आणि माझी नाळ बालपणापासूनच  जोडली गेली आहे.  घरातच संगीत असल्याने त्याला पोषक वातावरण लाभलं. पुढे गायनासोबतच अभिनयातही यशस्वी झाले. त्यानंतर बऱ्याचदा मला गायन करणार की अभिनय असा प्रश्नही विचारला गेला. पण मी दोन्हीकडे समतोल राखत करियरवर लक्ष केंद्रित करतेय. भविष्यात संगीत दिग्दर्शन करायचं हे ठरवलं होतंच, पण इतक्या लवकर संधी मिळेल असं वाटलं नव्हतं. करियरमधील पहिल्या वहिल्या गीतरचनेला संगीत देताना मनात थोडी धाकधूक होतीच, पण आत्मविश्वास होता. या आत्मविश्वासाच्या बळावरच “हरी दर्शनाची ओढ...” या गाण्याला यशस्वी संगीत देऊ शकले. यापुढेही संगीतात सातत्य राखत रसिकांना जे आवडेल ते देण्याचा प्रयत्न करणार आहे. आजवर केवळ गायिकेच्या रूपात संगीताची सेवा करीत होते. आता संगीतकाराच्या रूपात नवनवीन संगीतरचना उदयास आणण्याची संधी लाभली आहे.
बालवयातच गायनासोबतच अभिनयाची आपला ठसा उमटविणाऱ्या केतकीच्या मागे खंबीरपणे उभे राहणाऱ्या आई सुवर्णा आणि वडिल पराग माटेगावकर यांचंही कौतुक करावं तितकं थोडं आहे. करियरच्या या टप्प्यावर केतकीला संगीतकाराच्या रूपात समोर येण्याची संधी लाभल्याने तिचे आई-वडिल खूप आनंदी आहेत. केतकीने पदार्पणात लक्षवेधी कामगिरी केली आहेच, परंतु भविष्यात ती याहीपेक्षा भरीव कामगिरी करेल असा ठाम विश्वास त्यांना वाटतो. आता अभिनय, गायन आणि संगीत दिग्दर्शन अशी तिहेरी जबाबदारी केतकीच्या खांद्यावर असली तरी ती तिन्ही आघाडयांवर यशस्वी होईल असा त्यांना विश्वास वाटतो.

Share this:

Post a Comment

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.