BREAKING NEWS

Sunday, September 25, 2016

*मराठा समाजातील अस्वस्थतेला आधीचे आणि आत्ताचेही राजकारणी सत्ताधारी जबाबदार ~ आम आदमी पार्टीची भुमिका*


           गेले काही दिवस महाराष्ट्रातील विविध भागात मराठा समाजाचे शांततापूर्ण मोर्चे निघत आहेत . मराठा समाजातील असंतोष आणि खदखद संविधानाने दिलेल्या मार्गाद्वारे बाहेर येत आहे. या मोर्चामागे कुठलीही एक संघटना किंवा नेता नसताना, ठरलेल्या सुचनांप्रमाणे लोक रस्त्यावर जमतात व ठरल्याप्रमाणे सर्व पार पाडतात यामागची सामाजिक प्रक्रिया समजून घेण्याची गरज आहे
          अट्रोसिटी कायद्याचे सामाजिक न्यायाच्या दृष्टीने असलेले महत्व लक्षात घेता हा कायदा गरजेचा आहेच. या कायद्याची प्रामाणिक अंमलबजावणी होते का हे आधी पाहिले पाहिजे. जिथे या कायद्याचा गैरवापर दलीतांकडून आणि सवर्णांच्या माध्यमातुनही होत असेल तर तो थांबवला पाहिजे आणि या बाबत सकारात्मक सुचना आल्यास सर्व संबंधिताना एकत्र बसवुन सरकारने मार्ग काढला पाहिजे .
कष्टकरी मराठा समाजातील असंतोष हा गरीबी, गरीबीमुळे चांगले शिक्षण नाही आणि शिक्षण नाही म्हणुन नोकरी ही नाही या कारणांनी आहे असे आम आदमी पार्टी मानते. शेती आणि शेतकऱ्यांना उध्वस्त करणारी धोरणे सातत्याने राबविल्यामुळे तो आहे. हे लक्षात घेता गेली अनेक वर्षे सत्तेत असणारे आणि आता सत्तेत असणारे काहीजण केवळ जातीचे नाव सांगून, या मोर्चांमध्ये सामील होत असतील तर समाजाच्या आजच्या अवस्थेबद्दल त्यांची जबाबदारी काय ? हा प्रश्नही कष्टकरी मराठा मोर्चेकर्यांनी त्यांना विचारला पाहिजे.
           आधीचे सत्ताधारी आणि आत्ताच्या सत्ताधार्यांनी शेती व शेतकऱ्याबद्दल अत्यंत असंवेदनशील आणि बेजबाबदार दृष्टीकोन ठेवला यातच या गंभीर प्रश्नाचे मूळ आहे असे आम्ही मानतो. त्यामुळेच या असंतोषाला आधीचे व आत्ताचे ही सत्ताधारी जबाबदार आहेत.
           मराठा समाजास आप असे आवाहन करू इच्छितो कि आपल्यातील असंतोषाला सकारात्मक वळण देण्यासाठी त्यांनी शेतीची उपेक्षा थांबवणार्या, शेतीत अधिक सार्वजनिक गुंतवणूक मागणाऱ्या, शेतमालाला रास्त हमी भाव देणाऱ्या (स्वामिनाथन आयोगानुसार ), शेतमालप्रक्रिया उद्योगातुन ग्रामीण रोजगार वाढवणार्या आणि सर्व समावेशक विकासाची भूमिका घेणाऱ्या आर्थिक धोरणासाठी सत्ताधार्यांवर दबाव आणावा. सर्वाना चांगले शिक्षण आणि सर्वांना सक्षम रोजगार मिळालाच पाहिजे याकरिता सर्वच समाजातील गरीब कष्टकर्यांना सोबत घेत सरकारला त्यादिशेने काम करण्यास भाग पाडावे
          ‘भाकरी एक आहे आणि खाणारे दहा आहेत अश्या स्थितीत, असलेली एकच भाकरी कोणी खायची हा वाद घालण्याऐवजी दहा भाकर्या का बनत नाहीत हा सवाल सरकारसमोर उभा करावा यातच आपल्या सर्वांचे हित आहे.संधी आणि सुविधांचा विस्तार महत्वाचा आहे. याच भूमिकेतून दिल्लीमध्ये आप जनतेच्या शिक्षण, आरोग्य, विज, पाणी, रोजगार या मुलभुत गोष्टींवर काम करत जनतेचे सक्षमीकरण करत आहे व प्रस्थापित राजकीय हित संबंधाना विरोध करत आहे.
           कोपर्डीतील निर्घुण हत्या ही महिला अत्याचाराच्या मालिकेतील अत्यंत निंदनीय घटना आहे. कोपर्डीत बळी पडलेल्या आमच्या भगिनीस न्याय मिळालाच पाहिजे. या घटनेला जबाबदार नराधमांना कठोरातील कठोर शासन व्हावे यासाठी सरकारने योग्य पावले तातडीने उचलावीत. महिलांवरील अत्याचार थांबावेत आणि महिला सन्मानाची लढाई पुढे जावी यासाठी सर्वांनीच प्रामाणिक पणे काम करण्याची गरज आम आदमी पार्टीस वाटते.
          या मोर्च्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री व प्रस्थापित विरोधी पक्ष यांच्या भूमिका राजकीय हेवादाव्याच्या, फायदा उठवण्याच्या दिसतात. सरकारने चालढकल न करता, मूळ प्रश्नांना बगल न देता प्रामाणिक संवाद करत उत्तरे काढावीत अन्यथा जनतेचा शासनावरील विश्वास उडून जाईल असा इशारा आम आदमी पार्टीने दिला आहे.

Share this:

Post a Comment

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.