हरिद्वार (उत्तराखंड) - सनातन प्रभात नियतकालिकाचे एक दायित्व दर्शवणारे वाक्य आहे की, व्यक्तीला जे पाहिजे ते आम्ही देणार नाही, त्याला जे आवश्यक ते आम्ही देऊ. सिगरेट, दारू, तसचे अश्लीलता पसरवणारी विज्ञापने आम्ही देत नाही. आमचे दायित्व आहे, समाज प्रबोधन, समाज उन्नती आणि राष्ट्राभिमानी समाज मनाची निर्मिती करणे. वृत्तपत्र चालवणे आमचे व्रत आहे, ते आमचे उत्पन्नाचे साधन नाही. त्यागाची भावना असलेल्या पत्रकार, संपादकांच्या योगदानातून सनातन प्रभातच्या ४ आवृत्त्या प्रसिद्ध होतात. एकही वार्ताहर, संपादक पगारी नाही.समाज आणि राष्ट्र यांसाठी दायित्वाची भावना असणार्यांना एकत्र आणले पाहिजे, असे विचार हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक पू. डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी मांडले. विज्ञान-विकास आणि प्रसारमाध्यम या विषयावर हरिद्वारच्या निष्काम सेवा ट्रस्टमध्ये २ दिवसांची प्रसारमांध्यमांची बैठक आयोजित केले होती. त्यामध्ये ते बोलत होते. बैठकीमध्ये मुख्य अतिथि म्हणून श्री. गोविंदाचार्य तसेच हरिद्वारचे खासदार आणि माजी मुख्यमंत्री रमेश पोखरियाल, अन्य मान्यवर, तसेच देशभरातून आलेले १२० पत्रकार उपस्थित होते. या वेळी वेदामधील आधुनिक विज्ञानाचे अस्तित्व, आनंदाचे विज्ञान आणि विकासाचा बहुआयामी विचार, प्रसारमाध्यमांची आवश्यकता, प्रसारमाध्यमांची नवी भूमिका त्याचप्रमाणे सध्याची प्रसारमाध्यमांची परिस्थिती अशा सूत्रांवर चर्चा करण्यात आली. प्रख्यात दर्शनशास्त्री श्री. रामेश्वर मिश्र, प्रख्यात अर्थतज्ञ श्रीमती कुसुमलता केडिया यांनीही पत्रकारितेच्या अनुषंगाने त्यांचे विचार मांडले.
पू. डॉ. चारुदत्त पिंगळे मार्गदर्शन करतांना पुढे म्हणाले की,
१. पाश्चात्त्य त्यांची विचारसरणी आपल्या लोकांवर लादत आहेत. ती दूर करण्यासाठी आपण चिंतन करून पत्रकारितेच्या माध्यमातून त्याविषयी लोकांना जागृत केले पाहिजे.
२. ज्योतिष खोटे ठरले, तर ज्योतिषाला पैसे भरावे लागतील, अशा प्रकारचे अभियान धर्मद्रोह्यांनी चालवले होते; परंतु ७ दिवसांत त्वचा सुंदर झाली नाही, तर आस्थापनाकडून हानीभरपाई मिळण्यासाठी कोणी आवाज उठवत नाही. तथापि त्यासाठी ग्राहक संरक्षण कायदा आणला पाहिजे. याविषयी जागृती केली पाहिजे. हे पत्रकारितेचे दायित्व आहे. जे आपल्या देशावर आर्थिक आणि सांस्कृतिक आघात करत आहेत त्यांचे खरे स्वरूप समाजासमोर आणले पाहिजेत.
३. वेदांमधील ज्ञानाच्या अधिष्ठानावर युरोपमध्ये वैज्ञानिक प्रयोग चालू आहेत. आपल्या देशात असे का होत नाही ?
४. आज अपल्या देशातील नागरिकांना सामाजिक परिस्थितीमुळे देश सोडून परदेशात जावे लागत आहे. ते लोक तेथे कर्तृत्व गाजवून त्या देशांना मोठे करत आहेत. हॉवर्ड विद्यापिठात संस्कृत अनिवार्य केले आहे. भारतातील प्रतिभावंत तरुणांना देशातच रोखण्यासाठी सरकारवर दबाव आणला पाहिजे.
५. वर्णभेदाकडेसुद्धा प्रसारमाध्यमे व्यवसायिकरणाच्या दृष्टीने पहातात. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष यांमधील धर्म सोडून केवळ अर्थाच्या पाठीमागे प्रसारमाध्यमे लागलेली आहेत. ती व्यावसायिक लाभासाठी आचारसंहिताही पायदळी तुडवत आहेत. वर्णभेद म्हणजे मानवी मनाचा वैचारिक उथळपणा आहे.
६. शरिराचे सौंदर्य, मनाचे सौंदर्य, गुणांचे सौंदर्य यांविषयी पत्रकारांना अवगत करून त्याविषयीचे धर्मशिक्षण त्यांना दिले पाहिजे. उच्च चिंतन क्षमता दर्शवणारे लेखन वृत्तपत्रात आले पाहिजे. आपल्या संतांचा विचार केला, तर त्यांच्याजवळ कोणतीही आधुनिक साधनसामुग्री नव्हती; परंतु धार्मिक तत्त्वांच्या आचरणामुळे आजही त्यांचे अनुयायी प्रसारमाध्यमापेक्षा अधिक आहेत.
Post a Comment