कुठे संत ज्ञानेश्वरांच्या काळातील संशोधन करणारे विदेशी प्राध्यापक
आणि कुठे संत ज्ञानेश्वरांवर टीका करणारे तथाकथित बुद्धीप्रामाण्यवादी !
संत ज्ञानेश्वर महाराज |
पुणे - संत ज्ञानेश्वरांच्या काळात सापशिडीचा खेळ हा मोक्षपट म्हणून ओळखला जात होता, असे डेन्मार्क देशातील प्रा. जेकॉब यांनी केलेल्या संशोधनातून समोर आले आहे. प्रा. जेकॉब यांनी इंडियन कल्चरल ट्रेडिशन या अंतर्गत संत ज्ञानेश्वरांच्या काळात खेळले जाणारे खेळ, असा संशोधनात्मक विषय घेतला होता. त्यामध्ये त्यांना संत ज्ञानेश्वरांच्या काळात सापशिडीचा खेळ खेळला जात होता, अशी माहिती मिळाली. हा खेळ मिळवण्यासाठी त्यांनी भारतभर भ्रमण करून सापशिडीचे अनेक पट जमवले; परंतु त्यांना संत ज्ञानेश्वरांचा पट मिळाला नाही, तसेच त्याचा संदर्भही कुठे मिळाला नाही. याविषयी प्रा. जेकॉब यांनी येथील संत साहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक आणि संशोधक वा.ल. मंजूळ यांच्याकडे विचारणा केली असता रा.चिं. ढेरे यांच्या हस्तलिखित संग्रहातून त्यांना दोन मोक्षपट मिळाले. त्यांवर लिहिलेल्या ओव्यांमधून आयुष्य कसे जगावे, कोणती कवडी कोठे पडली की काय करावे, याचे मार्गदर्शनही करण्यात आले आहे.
मोक्षपटातून संदेश !
मोक्षपटाचे दोन्ही पट २० x २० इंच आकाराचे असून त्यात ५० चौकोन आहेत. त्यातील पहिले घर जन्माचे, तर शेवटचे घर मोक्षाचे असून त्याद्वारे माणसाच्या जीवनाचा प्रवास मांडला आहे. मोक्षपट खेळण्यासाठी सापशिडीप्रमाणेच ६ कवड्यांचा वापर करण्यात येत असून त्या पालथ्या पडल्या, तर दान मिळते. या पटावरही साप असून त्यांना काम, क्रोध, लोभ, मोह, मद आणि मत्सर अशी नावे दिली आहेत. त्यामधील प्रत्येक शिडीला प्रगतीची शिडी असे संबोधून तिला सत्संग, दया आणि सद्बुद्धी अशी नावेही देण्यात आली आहेत. माणसाने आयुष्य कशा प्रकारे जगावे, याचे तत्त्वज्ञान खेळातून सांगण्यात आले आहे.
Post a Comment