BREAKING NEWS

Thursday, November 3, 2016

'खाकी'ने दिला 'रोजा'ला मायेचा आसरा अहेरी पोलिसांची माणूसकी


रंगय्या रेपाकवार/ अहेरी : 

समाजात शांतता व सुव्यवस्था कायम ठेवताना अंगावर खाकी वर्दी चढवून पोलीस प्रत्येक क्षणी सतर्क असतात. ऊन, वारा, पाऊस सोसत कर्तव्यनिष्ठतेची काटेकोरपणे अंमलबजावणी करताना सर्वसामान्यांचा मित्र असलेली ही खाकी वर्दी प्रसंगी कठोर भूमिका घेते. मात्र, या वर्दीमध्ये सुद्धा माणूसकीचा झरा पाझरत असतो. वेळ आली की कठोरपणा टाकून देत एखाद्या गरजवंताला 'खाकी' आईची माया देऊ शकते, याचा प्रत्यय नुकताच अहेरीत आला.
अहेरी व आलापल्ली परिसरात गेल्या दोन ते तीन दिवसांपासून एक १५ वर्षीय वेडसर मानसिक स्थितीत असलेली बालिका फिरत होती. जे मिळेल ते खाणे आणि आसरा मिळेल तिथे झोपी जाणे, असा नित्यक्रम असलेल्या बालिकेचे अस्तित्व काही युवकांच्या लक्षात आले. विशेष म्हणजे, या बालिकेला केवळ गोंडी व तेलुगू भाषा अवगत असल्यामुळे तिची अधिक चौकशी करणे शक्य नव्हते. त्यामुळे युवकांनी सदर बालिकेबद्दल अहेरी पोलीस स्टेशनला माहिती दिली. दिवाळीतील बंदोबस्ताचा ताण असतानाही युवकांनी दिलेल्या या माहितीवर अहेरीचे ठाणेदार संजय मोरे यांनी तातडीने 'ॲक्शन' घेतली. परप्रांतात मुलींची विक्री करण्याची घटना यापुर्वी अहेरी उपविभागात घडली असल्याने ठाणेदारांनी खबरदारी बाळगत तातडीने बालिकेसाठी शोध मोहीम राबविली. मंगळवार १ नोव्हेंबर रोजी सायंकाळच्या सुमारास अहेरी येथील चौकात सदर वर्णनाची बालिका आढळून आली.
पोलीसांची वर्दी ही भल्याभल्यांना घाम फोडणारी असते. मात्र, खाकी वर्दीतील पोलिसांमधील मायेचा ओलावा बालिकेला जाणवला. गोंडी व तेलुगू भाषा अवगत असणाऱ्या बालिकेशी पोलिसांनी संवाद साधला असता, तिने आपले नाव रोजा सिडाम असून गुडीगुड्डम येथील रहिवासी असल्याचे सांगितले. या माहितीच्या आधारे बालिकेच्या मातापित्यांचा शोध घेण्याची दिशा निश्चित झाली होती. मात्र, अहेरी ते गुड्डीगुडम हे २५ किमीचे अंतर असून रात्र झाल्याने बालिकेला स्वगावी पोहोचविण्यासाठी बुधवारची प्रतीक्षा करणे आवश्यक होते. अशास्थितीत अहेरीचे ठाणेदार संजय मोरे यांच्या मार्गदर्शनात अहेरी पोलिसांनी रोजाचे एक दिवसाचे पालकत्व स्वीकारले. तिला राहण्यासह भोजनाची व्यवस्था करून दिली. बुधवारी सकाळच्या सुमारास अहेरीच्या पोलीस उपनिरीक्षक लक्ष्मी छाया तांबुसकर यांच्यासह बालिकेला गुड्डीगुडमसाठी रवाना करण्यात आले. मात्र, गुड्डीगुडम येथे पोहोचल्यावर या ठिकाणी रोजाची मावशी राहत असल्याचे निदर्शनास आले. मावशीने रोजाचे आई-वडील व्यंकटरावपेठा येथे राहत असल्याचे सांगितले. त्यानुसार पोलिसांनी रोजाला व्यंकटरावपेठा येथे आणले. आई-वडीलांना पाहताच रोजाने त्यांना मिठी मारली. वेडसर स्थितीतील बालिकेच्या मदतीला धावून जात ठाणेदार संजय मोरे व पोलीस कर्मचाऱ्यांनी दाखविलेल्या माणुसकीच्या कार्याला अहेरीकरांनी सलाम ठोकून दाद दिली. 

Share this:

Post a Comment

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.