नगरपरिषद निवडणूक :
व्हॉटस् अँप, फेसबुक वापराचा खर्चही करावा लागेल सादर
विदर्भ ब्युरो चिफ : - (शहेजाद खान)
जिल्हय़ात २७ नोव्हेंबर रोजी नगरपालिकांच्या निवडणुका होणार आहेत. उमेदवारांकडून होणार्या सोशल मीडिया वापरावर निवडणूक आयोग लक्ष ठेवून आहे. निवडणूक प्रचारासाठी व्हॉट्स अँप, फेसबूक आदींचा वापर केल्यास त्याचा खर्च उमेदवारांना सादर करावा लागेल.
गत काही वर्षांपासून व्हॉट्स अँप, फेसबुकचा वापर वाढीस लागला. यावेळी नगरपरिषेदत प्रचारासाठी सोशल मीडियाचा वापर सुरू झाला आहे. काही उमेदवारांनी ग्रुप तयार करून मतदारांपर्यत पोहोचण्याचे सोशल मीडिया हे माध्यम सुलभ आणि सोयीस्कर ठरविले आहे. मात्र उमेदवारांनी सोशल मीडियाचा किती वापर केला हा खर्च निवडणूक खर्चात सादर करणे अनिवार्य राहील. अन्यथा सोशल मीडियाचा वापर करूनही त्याचा खर्च न सादर करणारे उमेदवार निवडणूक आयोगाच्या रडारवर राहणार असल्याची माहिती आहे. राज्यात चार टप्प्यात नगरपरिषदांच्या निवडणुका होत आहेत. पहिल्या टप्प्यात जिल्हय़ातील नऊ नगरपरिषदांच्या निवडणुका होत आहेत. निवडणुकांचे बिगूल वाजताच उमेदवारांनी सोशल मीडियावर संपर्क, संवाद साधण्यास प्रारंभ केला आहे. मात्र निवडणूक आयोगाच्या कायद्यानुसार प्रचार आणि प्रसारासाठी उमेदवारांकडून वापर होणार्या सर्व बाबींच्या खर्चाचे विवरण आयोगाकडे सादर करणे अनिवार्य आहे. या कायद्यातून सोशल मीडियाला देखील मुक्ती नाही, असे आयोगाने ठरविले आहे. फेसबूक, व्हॉट्स अँपचा वापर करणार्या उमेदवारांवर करडी नजर ठेवण्याच्या सूचना निवडणूक आयोगाने पोलीस प्रशासनाला दिल्या आहेत. नगरपरिषद निवडणुकीसाठी आयोगाने आदर्श आचारसंहिता लागू केली आहे. आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन व्हावे, यासाठी निवडणूक आयोगाने सोशल मीडियावर प्रचार, प्रसार करण्यापूर्वी परवानगी बंधनकारक केले आहे. अन्यथा ही बाब आदर्श आचार संहितेचे उल्लंघन होणारी असल्यामुळे सदर उमेदवारावर गुन्हा दाखल होण्याची दाट शक्यता आहे.
ग्रामीण भागात सोशल मीडियाची धूम
नगरपरिषद निवडणुकीचे नामांकन अर्ज सादर, माघार या बाबी पूर्ण झाल्या आहेत. आता थेट मतदारांपर्यंत कसे पोहोचता येईल, याचे नियोजन उमेदवारांकडून सुरू आहे. नगरपरिषद निवडणुकीचे 'राजकारण' तापायला प्रारंभ झाला आहे. गल्ली, बोळात, कट्टय़ावर निवडणुकीच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. नगरपरिषद निवडणुकीची ग्रामीण भागात धूम सुरू झाल्याचे चित्र आहे.
Post a Comment