पणजी-भाषावार प्रांत रचनेनंतर देशातील विविध भाषांनुसार विभाजित झालेल्या राज्यांमुळे भाषेवरून भांडणे चालली आहेत. त्यामुळे संस्कृत भाषा हरवत चालली आहे, अशी खंत ‘इष्टी’ या संस्कृत चित्रपटाचे दिग्दर्शक जी. प्रभा यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केली. इष्टी या संस्कृत चित्रपटाने आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या इंडियन पॅनोरमा विभागाचा प्रारंभ झाला आहे. या वेळी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
जी. प्रभा म्हणाले, ‘‘मी संस्कृतचा प्राध्यापक आहे. संस्कृतसाठी माझे जीवन आहे. त्यामुळे संस्कृत चित्रपटाची निर्मिती करण्याचे मी ठरवले. संस्कृत भाषा म्हणजे परंपरा आणि संस्कृती यांची वाहक आहे. तिला एक वेगळा दर्जा आहे आणि आजच्या काळात ती टिकवणे आवश्यक आहे.’’ इमा साबित्रीचे चित्रपट दिग्दर्शक बोबो म्हणाले, ‘‘एका महिला नाट्य कलाकाराचे जीवन दर्शवणारा हा लघुपट आहे. अभिनयाबरोबरच आई, पत्नी या भुमिका बजावत ती इतर नातीही सांभाळत जगत असते. तिच्या जीवनातील समस्या आणि वादळे या लघुपटात मांडलेली आहेत. महिलेची सक्षमता यात दर्शवण्यात आली आहे.’’
Post a Comment