स्वीकृत सदस्य बनले प्रफुल्ल कोकाटे व अजय हजारे
कॉंग्रेसच्या गटनेतेपदी गोटू गायकवाड तर भाजपाच्या गटनेतेपदी संजय मोटवानी
चांदुर रेल्वे- (शहेजाद खान) -
नगर परीषदेची सार्वत्रीक निवडणुक २७ नोव्हेंबरला पार पडली. यावेळी नगराध्यक्षपदाची निवडणुक थेट जनतेतुन करण्यात आली तर आठ प्रभागातुन १७ नगरसेवक मतदारांनी निवडुन दिले. यात अध्यक्षपदासाठी निलेश उर्फ शिट्टु सुर्यवंशी निवडुन आले. तर १७ नगरसेवकासाठी झालेल्या निवडणुकीत कॉंग्रेसचे १०, भाजपाचे ५ व अपक्ष २ असे संख्याबळ नगरपरीषदेत मतदारांनी निवडुन दिले. बुधवारी राज्य सरकारच्या नव्या आदेशानुसार न.प. चे नवनिर्वाचित नगराध्यक्ष आमसभेचे पिठासिन सभापती राहणार असल्यामुळे त्यांच्या देखरेखीत उपाध्यक्ष व स्वीकृत सदस्यांची निवडणुक पार पडली. तत्पुर्वी बुधवारी सभेचे कामकाज सुरू होण्यापुर्वी नगराध्यक्ष निलेश सुर्यवंशी यांनी आपल्या १० नगरसेवकासह, आमदार विरेंद्र जगताप व असंख्य कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत पदभार स्विकारला.
त्यानंतर नगर परीषद सभागृहात झालेल्या पहिल्या आमसभेत उपाध्यक्षपदाची निवडणुक घेण्यात आली. यासाठी कॉंग्रेसकडुन देवानंद खुणे यांनी तर भाजपा कडुन सौ. सुरेखा तांडेकर यांनी आपले नामांकन दाखल केले होते. यावर मतदान होऊन खुणे यांच्या बाजुने १२ मते तर तांडेकर यांच्या बाजुने ५ मते पडली. त्यामुळे देवानंद खुणे यांची उपाध्यक्षपदी वर्णी लागली. या निवडणुकीत अपक्ष नगरसेवक सतपाल वरठे यांनी कॉंग्रेसचे खुणे यांना मतदान केले तर दुसरे अपक्ष नगरसेवक बच्चु वानरेंनी तटस्थ राहण्याची भूमिका बजावली हे विशेष. यानंतर स्वीकृत सदस्यासाठी कॉंग्रेसकडुन प्रफुल्ल कोकाटे, भाजपाकडुन अजय हजारे यांनी आपले अर्ज सादर केले.
पक्षीय बलाबलनुसार कॉंग्रेसचे प्रफुल्ल कोकाटे व भाजपाचे अजय हजारे यांची निवड झाल्याचे पिठासीन सभापतींनी जाहीर केले. सभेचे कामकाज मुख्याधिकारी सुमेध अलोने व कार्यालयीन निरीक्षक धनराज गजभिये यांनी पार पाडले. तर नवनिर्वाचीत अध्यक्ष, उपाध्यक्ष व सर्व नगरसेवकांचा सत्कार नगरपरीषद कर्मचाऱ्यांकडुन करण्यात आला. उपाध्यक्षपदावर देवानंद खुणे व स्वीकृत सदस्य म्हणुन प्रफुल्ल कोकाटे यांची निवड झाल्यामुळे कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी रैलीसह फटाके फोडुन आनंद व्यक्त केला. दरम्यान कॉंग्रेस नगरसेवक गटनेतेपदावर वैभव उर्फ गोटू गायकवाड यांची तर भाजपा नगरसेवक गटनेतेपदावर संजय मोटवानी यांची निवड करण्यात आली.
Post a Comment