मोईन खान / परभणी /-
शाळा व महाविद्यालय स्तरापासूनच विविध घटकांनी स्वयंप्रेरणेने वाहतूक आणि रस्ते सुरक्षेच्या नियमांबाबत जनजागृती करण्याची आवश्यक्ता असून वाहनचालकांनी वाहनाच्या वेगावर नियंत्रण ठेवल्यास अपघात टाळणे शक्य असल्याचे जिल्हाधिकारी राहुल रंजन महिवाल यांनी सांगितले.
प्रशासकिय इमारत येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालय येथे रस्ता सुरक्षा अभियानाचे उद्घाटन करण्यात आले. यानिमित्त आयोजित कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरून जिल्हाधिकारी श्री. महिवाल बोलत होते. यावेळी विभाग नियंत्रक श्रीकांत गभणे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी डॉ.पी.बी.जाधव, यंत्र अभियंता चालन पी जी जगताप, मोटार वाहन निरीक्षक रावसाहेब रगडे, सचिन झाडबुके, सुरेश आगवणे, सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक विजयकुमार अल्लमवार, गंगाधर मेकलवार, आदित्य जाधव, जगदिश माने तसेच उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील अधिकारी आणि वाहन निरिक्षक आदींची उपस्थिती होती. यावेळी मान्यवरांच्या हस्ते वाहनांना रिफ्लेक्टरही लावण्यात आले.
जिल्हा रस्ता सुरक्षा समिती अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी राहुल रंजन महिवाल म्हणाले की, अपघातांची अनेक कारणे असतात. पण त्यामध्ये स्वयंशिस्तीचे पालन न करणे हे महत्त्वाचे कारण ठरते. स्वयंशिस्तीमध्ये वाहतुकीचे नियम पाळणे, वाहने सुस्थितीत ठेवणे, चालकाच्या शारीरिक क्षमतेचे विचार करणे, वेगावर नियंत्रण ठेवणे, वाहनांच्या क्षमतेचा विचार करून प्रवासी वाहतूक, दुचाकीस्वारांनी हेल्मेट वापरणे यासारख्या यांचा अंतर्भाव होतो. वाहतूक शिस्तींसंदर्भात माहिती सर्व घटकांत पोहचणेही महत्त्वाचे असून सामाजिक बांधिलकीच्या जाणीवेतून विविध घटकांनी स्वयंप्रेरणेने रस्ता सुरक्षा अभियानात सहभाग घ्यावा, असे आवाहनही श्री महिवाल यांनी केले.
उपप्रादेशिक परिवहन अधिकारी डॉ. पी बी जाधव यांनी प्रास्ताविकात अपघाताच्या विविध कारणांबाबत माहिती दिली. यंदा ‘तुमची सुरक्षा, तुमच्या कुटुंबियांचे संरक्षण करते, रस्ते सुरक्षांबाबत जागरूक रहा’ असे घोषवाक्य घेऊन सुरक्षा अभियान राबविण्याचे निर्देश असल्याचेही श्री जाधव यांनी सांगितले.
'पालकांनो वाहतुकीबाबत स्वतः शिस्त पाळा'
जिल्हाधिकारी श्री. महिवाल यांनी शहरी आणि ग्रामीण वाहतूकीतील अपघतांच्या कारणांबाबत विश्लेषण केले. वाहतुकीच्या नियमांचे पालन पालकांनी कटाक्षाने करण्याची सुरूवात स्वतःपासून करावी. जेणेकरून मुलेही त्यातून प्रेरणा घेतील. लहान मुलांना पालकांनी वाहने चालविण्यासाठी देऊ नयेत. त्यांना वाहतूकीच्या नियमांचे पालन करण्याबाबत काटेकोर सूचना द्याव्यात. वाहतूक शिस्तींचे पालन स्वतःपासून केले, तर पुढच्या पिढीचे जीवन अपघात विरहित होईल असेही श्री महिवाल यांनी सांगितले.
Post a Comment