देशी गायींना राष्ट्रमाता म्हणून सन्मान मिळावा !
कोल्हापूर– गो-कथाकार श्री. गोपालमणी महाराज यांच्या ‘भारतीय गौ क्रांती मंच आंदोलना’द्वारे देशी गायींना राष्ट्रमाता म्हणून सन्मान मिळावा, यासाठी ९ मे २०१६ पासून गौ प्रतिष्ठा भारत यात्रा उत्तराखंड गंगोत्री येथून चालू आहे. ही यात्रा २४ जानेवारी या दिवशी कोल्हापूर येथे येणार आहे. त्या निमित्ताने शाहू स्मारक भवन येथे सायंकाळी ५ वाजता ‘गो-कथे’चा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती बजरंग दलाचे शहरप्रमुख श्री. महेश उरसाल यांनी २१ जानेवारी या दिवशी घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली. या वेळी बजरंग दलाचे जिल्हाप्रमुख सर्वश्री संभाजी साळुंखे, विहिंपचे अधिवक्ता सुधीर जोशी, डॉ. केदार तोडकर, ओंकार कारदगेकर, राजेंद्र सूर्यवंशी, सुनील पाटील, हिंदु जनजागृती समितीचे मधुकर नाझरे, सुधाकर सुतार, अनिरुद्ध कोल्हापुरे आदी उपस्थित होते.
श्री. महेश उरसाल म्हणाले, ‘‘श्री. गोपालमणी महाराज हे गो-कथा सांगणारे सुप्रसिद्ध कथाकार आहेत. त्यांनी यापूर्वीही ‘भारतीय गौ क्रांती मंच’च्या माध्यमातून आंदोलने करून शासनाचे लक्ष वेधून घेतले आहे. त्यांनी संपूर्ण देशभर देशी गायीचे महत्त्व पटवून सांगण्यासाठी ‘गौ प्रतिष्ठा भारत यात्रे’ला प्रारंभ केला आहे. ही यात्रा देशातील ६७६ जिल्ह्यांमध्ये जाणार आहे. हिमाचल प्रदेश, जम्मू काश्मीर, पंजाब, हरियाणा, राजस्थान, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, गुजरात या राज्यांतून प्रवास करत ही यात्रा ८ जानेवारी या दिवशी महाराष्ट्रात आली आहे. २४ जानेवारी या दिवशी होणार्या कार्यक्रमात गोपालक आणि गोरक्षक यांचा श्री. गोपालमणी महाराजांच्या हस्ते सत्कार करण्यात येणार आहे.’’
विहिंप, बजरंग दल, सेवा व्रत प्रतिष्ठान, होय हिंदूच संघटना, हिंदु एकता आंदोलन, पतित पावन संघटना, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, हिंदु जनजागृती समिती, वन्दे मातरम् युथ ऑरगनायझेशन आणि समस्त हिंदुत्ववादी संघटना, कोल्हापूर इत्यादी हिंदुत्ववादी संघटना या कार्यक्रमाचे आयोजक आहेत.
Post a Comment