जिल्हा प्रतिनिधि :- महेन्द्र महाजन जैन
वाशिम:- बेरोजगार युवकांना स्वतःचा उद्योग व व्यवसाय सुरु करण्यासाठी अर्थसहाय्य करण्यासाठी प्रधानमंत्री मुद्रा योजना सुरु करणायत आली आहे. या योजनेचा लाभ घेऊन तालुक्यातील जास्तीत जास्त युवकांनी स्वतःचा उद्योग, व्यवसाय सुरु करून व्यावसयिक, उद्योजक बनावे, असे प्रतिपादन कारंजाचे उपविभागीय अधिकारी डॉ. शरद जावळे यांनी केले. प्रधानमंत्री मुद्रा योजनेच्या प्रचारासाठी जिल्हास्तरीय मुद्रा समन्वय समितीच्या माध्यमातून जिल्हा अग्रणी बँक व कारंजा तहसील कार्यालयाच्यावतीने आयोजित प्रधानमंत्री मुद्रा कर्ज मेळाव्यात ते बोलत होते.
याप्रसंगी जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक विजय नगराळे, तहसीलदार सचिन पाटील, ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण केंद्र (आरसेटी)चे संचालक प्रदीप पाटील, विदर्भ कोकण ग्रामीण बँकेचे व्यवस्थापक अनिल गोतमारे, बँक ऑफ बडोदाचे जितेंद्र नवलाखा, पंचायत समितीचे विस्तार अधिकारी सुधाकर जाधव, गट समन्वयक वर्षा ठाकरे, जिल्हा माहिती कार्यालयाचे तानाजी घोलप यांच्यासह विविध बँकांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
उपविभागीय अधिकारी डॉ. जावळे म्हणाले, प्रधानमंत्री मुद्रा योजनेतून कर्ज मिळविण्यासाठी युवकांना मार्गदर्शन मिळावे, याकरिता तहसीलदार कार्यालयाने जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्या सूचनेनुसार जिल्हा अग्रणी बँकेशी समन्वय साधून बँक व उद्योग, व्यवसाय उभारण्यासाठी इच्छुक असलेल्या युवकांना एकत्र आणण्यासाठी प्रधानमंत्री मुद्रा कर्ज मेळाव्याचे आयोजन केले आहे. याद्वारे योजनेचे स्वरूप, कर्ज मिळविण्यासाठी आवश्यक कागदपत्रे यासह इतर महत्वाच्या बाबींवर मार्गदर्शन करणे हा प्रमुख उद्देश आहे. या माहितीच्या आधारे परिपूर्ण प्रस्ताव तयार करून संबंधित बँकांना सादर करावेत. तसेच कोणत्याही बँक अधिकाऱ्यांकडून कर्ज वितरणास टाळाटाळ केली जात असल्यास त्याबाबत तहसील कार्यालय किंवा उपविभागीय कार्यालयात लेखी तक्रार द्यावी.
आरसेटीचे संचालक श्री. पाटील म्हणाले की, मुद्रा योजनेतून कर्ज मिळविण्यासाठी युवकांनी सर्वप्रथम आपण कोणता व्यवसाय, उद्योग सुरु करणार आहोत हे निश्चित करावे. तसेच त्याविषयी सविस्तर माहिती संकलित करून त्यासाठीचा आराखडा बनवून बँक अधिकाऱ्यांना आपल्या उद्योगाबाबत सादरीकरण करावे. आरसेटीच्या माध्यमातून विविध व्यवसायांसाठी मोफत प्रशिक्षण देण्यात येते. सदर प्रशिक्षण घेऊन मुद्रा योजनेतून मिळणाऱ्या कर्जाच्या सहाय्याने व्यवसाय सुरु करण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
विदर्भ कोकण ग्रामीण बँकेचे व्यवस्थापक श्री. गोतमारे यांनीही यावेळी मुद्रा कर्ज योजनेविषयी मार्गदर्शन केले. लहान उद्योग, व्यवसायांना कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी प्रधानमंत्री मुद्रा योजना सुरु करण्यात आली आहे. या कर्जासाठी कोणत्याही प्रकारचे मोर्गेज ठेवण्याची आवश्यकता नाही. तसेच कर्ज प्रक्रिया शुल्कातही सुट देण्यात आली आहे. या योजनेचा लाभ घेऊन युवकांनी आपला स्वतःचा उद्योग, व्यवसाय सुरु करावा, असे त्यांनी यावेळी सांगितले. पंचायत समितीच्या गट समन्वयक वर्षा ठाकरे यांनीही यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन केले. प्रधानमंत्री मुद्रा कर्ज योजनेतून मिळालेल्या कर्जाचा वापर त्याच उद्योगासाठी करावा. त्याद्वारे उद्योग, व्यवसाय वाढवण्याचे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले.
जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक श्री. नगराळे यांनी प्रास्ताविक केले. ते म्हणाले की, प्रधानमंत्री मुद्रा योजनेची माहिती जास्तीत जास्त लोकांपार्यात पोहोचविण्यासाठी प्रधानमंत्री मुद्रा कर्ज मेळावे जिल्हाभर आयोजित करण्यात येत आहेत. या योजनेतून जास्तीत जास्त लोकांना कर्ज वितरण होण्याच्या दृष्टीने जिल्हा अग्रणी बँक प्रयत्न करित असल्याचे त्यांनी सांगितले. सूत्रसंचालन देवेंद्र मुकुंद यांनी तर आभार प्रदर्शन राहुल वरघट यांनी केले.
Post a Comment