जिल्हा प्रतिनिधी वाशिम :-
महेंद्र महाजन जैन :-
- लग्नाचे आमिष दाखवून पंधरा वर्षीय मुलीवर दुष्कर्म करणार्या तालुक्यातील ढोकी येथील आरोपी महेश पुंडलिक धावारे यास पहिजे जिल्हा सत्र न्यायाधीश एस. आय. पठाण यांनी गुरुवारी दहा वर्षे सक्तमजुरी व पाच हजार रूपयांचा दंड, अशी शिक्षा सुनावली आहे.
ढोकी येथील महेश पुंडलिक धावारे याने २१ ऑगस्ट २०१५ रोजी त्याच्या घरासमोर राहणार्या अल्पवयीन मुलीस घरी बोलावून घेतले व आपण पुण्याला जावून लग्न करू, असे आमिष दाखवले. याच दिवशी सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास पीडित मुलीचे आई-वडिल तिच्यासह आरोपीच्या घरी टीव्ही पाहण्यासाठी आले होते. दरम्यान पीडित मुलगी तिच्या आईस जेवण करते, असे सांगून घरी परतली होती. आरोपी धावारे हाही तिच्या घरी गेला. तिला लग्नाचे आमीष दाखवून गावातील पेट्रोल पंप गाठले. तेथून एसटी बसने ते पुणे येथील आरोपीचा भाऊ संतोष धावारे याच्या घरी दुसर्या दिवशी पोहचले. संतोष धावारे व त्यांची पत्नी रात्री ८ वाजता घराबाहेर गेले असता, घरी कोणीच नसल्याचे पाहून आरोपी महेश धावारे याने रात्री ८.३० ते ९ वाजण्याच्या सुमारास अल्पवयीन मुलीवर दुष्कर्म केले.
याप्रकरणी पीडित मुलीने ढोकी येथे येवून २५ ऑगस्ट रोजी दिलेल्या फिर्यादीनुसार ढोकी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. तपासाअंती पोलिसांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. या प्रकरणाची सुनावणी पहिले जिल्हा सत्र न्यायाधीश एस. आय. पठाण यांच्यासमोर चालली. या प्रकरणात एकूण सात साक्षीदार तपासण्यात आले. भक्कम पुरावे न्यायालयासमोर आले. तसेच अतिरिक्त जिल्हा सरकारी वकिल ऍड. आशिष कुलकर्णी यांनी केलेला युक्तीवाद ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपी महेश धावारे यास दहा वर्षे सक्तमजुरी व पाच हजार रूपयांचा दंड. तसेच दंड न भरल्यास आणखी एक महिन्याचा कारावास, अशी शिक्षा सुनावली आहे
Post a Comment