BREAKING NEWS

Thursday, March 30, 2017

वारंगी, गोकसावंगी, रिधोरा, मुंगळा येथील शेतकर्‍यांचा महावितरणवर धडक मोर्चा

जिल्हा प्रतिनिधी  / महेंद्र महाजन जैन -


अवास्तव भारनियमन, कृषीपंपांना अपुरा विजपुरवठा, वारंवार वीज खंडीत होणे आदी समस्यांनी मेटाकुटीस आलेल्या तालुक्यातील वारंगी, गोकसावंगी, रिधोरा, मुंगळा येथील शेतकर्‍यांनी अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे जिल्हाध्यक्ष तथा जिल्हा ग्राहक परिषदेचे अशासकीय सदस्य प्रमोद गंडागुळे, जुगलकिशोर कोठारी, नामदेवराव बोरचाटे यांच्या नेतृत्वात बुधवार, 29 मार्च रोजी महावितरणच्या मुख्य कार्यालयावर धडक मोर्चा काढून विज वितरणच्या अधिक्षक अभियंत्यांना निवेदन देवून शेतकर्‍यांच्या समस्या सोडविण्याची मागणी केली. सदर मोर्चामध्ये चारही गावातील सुमारे शंभर ते सव्वाशे शेतकरी सामील झाले होते.
    या चारही गावामध्ये 16 तास भारनियमन असून उर्वरीत 8 तासात 2 ते 3 तासापेक्षा अधिक वेळ लाईन राहत नाही. मेडशी येथील 33 केव्ही क्षमतेच्या रोहित्रावर क्षमतेपेक्षा जास्त दाब होत असल्याकारणाने वारंवार विजपुरवठा खंडीत होत आहे. त्यामुळे वारंगी, गोकसावंगी या ठिकाणी नवीन फीडर बसविण्याची मागणी शेतकर्‍यांनी केली आहे. सदरहू मोर्चामध्ये शेतकरी अशोक दहात्रे, विनोद दहात्रे, धनंजय चतरकर, महादेव चतरकर, आनंद नाईक, शिवाजी केकन, संतोष दहात्रे, दलालधन दहात्रे, संतोष बोरचाटे, विजय उगले, अनिल इंगोले, शरद खंडागळे, बालाजी दहात्रे, बाबुराव चतरकर, दत्तराव बरवे, सुनिल कदम, नितेश देशमुख, किसन जाधव, निलेश दहात्रे, गजानन वानखडे, वैभव कदम, विजय हेंबाडे, अमोल निंबाळकर, संतोष कर्‍हाळे, बाळू कदम आदींसह असंख्य शेतकरी सहभागी झाले होते. शिष्टमंडळाने मेडशी ते उर्ध्व मोर्णा प्रकल्पावर नविन लिंकलाईनची महावितरणकडे मागणी केली. त्याचप्रमाणे महावितरणच्या कर्मचार्‍यांकडून होत असलेली अनियमितता त्वरीत बंद व्हावी, प्रत्येक गावामध्ये जवळपास पाचशे एकर भुईंमुग त्याचप्रमाणे मुंगळा येथे जवळपास एक हजार एकर संत्र्यांला सिंचन व्यवस्था करुन ही पिके वाचविण्यासाठी महावितरणकडून त्वरीत सहकार्य मिळावे अशी मागणी केली. अन्यथा वरील पिक सध्या पडत असलेल्या उन्हामुळे करपून जाईल व खराब होईल. व शेतकर्‍यांच्या उत्पन्नात घट होवून शेतकर्‍यांचे प्रचंड नुकसान होईल. यावेळी अध्यक्ष प्रमोद गंडागुळे यांनी महावितरणच्या नागपूर येथील सल्लागार समितीच्या सदस्या श्रीमती गौरी चंद्रायण यांच्याशी भ्रमणध्वनीवर संवाद करुन त्यांच्याकडून सुध्दा अधिक्षक अभियंता यांना शेतकर्‍यांच्या मागण्यासंदर्भात निर्देश दिले. जुगलकिशोर कोठारी आणि नामदेवराव बोरचाटे यांनी सदर तक्रार जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेमध्ये जिल्हाधिकारी यांच्यासमोर वारंवार उपस्थित केले असल्याचे सांगीतले व त्यावेळी महावितरणच्या प्रतिनिधींनी सदर प्रकरण त्वरीत निकाली काढण्याचे आश्‍वासन दिले होते असे सांगीतले. अधिक्षक अभियंता यांनी सहकार्याची भूमिका दाखविली. आणि पंधरा दिवसाच्या आत या चारही गावातील विज समस्या निकाली काढण्याचे निर्देश उपविभागीय अभियंता चव्हाण यांना दिले. त्याचप्रमाणे कृषी पंपाकरीता लागणारा लिंकलाईनचा प्रस्ताव ताबडतोब सादर करण्याचे आदेश दिले. त्या भागातील कर्मचारी कामात अनियमितता करणार नाहीत असे आश्‍वासन यावेळी अधिक्षक अभियंत्यांनी शेतकर्‍यांना दिले. त्याचप्रमाणे सर्व शेतकर्‍यांनी आपल्या कृषी पंपावर कॅपॅसिटर लावण्याचे आवाहन केले. जेणेकरुन वरील नमूद केलेल्या समस्या कमी होतील. शेतकर्‍यांनी सुध्दा कॅपसिटर लावण्याचे आश्‍वासन दिले. प्रमोद गंडागुळे, जुगलकिशोर कोठारी व नामदेव बोरचाटे यांनी महावितरणकडून देण्यात येणार्‍या बिलांच्या समस्या सांगीतल्या. तसेच शिरपूर येथील चालू असलेले 33 केव्ही उपकेंद्र त्वरीत चालु करण्यात यावे अशी मागणी केली. वाशीम येथील विजेच्या वापराच्या रिडींगची माहिती 11 मार्च पासून ग्राहकांच्या मोबाईलवर देण्यात आली  असली तरीही बिलाच्या रकमेची माहिती अद्याप पाठविण्यात आली नसल्याचे गंडागुळे यांनी निदर्शनास आणून दिले. अधिक्षक अभियंता श्री बनसोडे यांनी याविषयावर त्वरीत लक्ष घालण्याचे आश्‍वासन दिले.

Share this:

Post a Comment

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.