# भाजपा सत्तेसाठी कोणत्याही थराला जाऊ शकते
मुंबई. ( शाहरुख मुलाणी ) – आज देशातील राजकारण एका वेगळ्या वळणावर आले आहे. सत्ताधारी वर्ग हा जाती-पातीचे राजकारण करण्यात गुंतला आहे. सत्ताधाऱ्यांमध्ये सर्वसमावेशक वृत्तीचा अभाव जाणवतो आहे. अशावेळी विरोधक म्हणून आपली मोठी जबाबदारी आहे, अशी भूमिका ठाणे ग्रामीण राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे आयोजित केलेल्या कार्यकर्ता शिबिरात राष्ट्रवादीचे अध्यक्ष खा. शरद पवार यांनी व्यक्त केली. आपण जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी बांधिल आहोत हे कार्यकर्त्यांनी ध्यानात घ्यावे. असे प्रतिपादन पवार यांनी केले.
नुकत्याच झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीत मते विभागणी झाल्यामुळे भाजपाचा विजय झाला. यश-अपयश हा राजकारणाचा एक भाग झाला मात्र सामाजिक ऐक्य टिकवण्याची क्षमता सत्ताधाऱ्यांमध्ये आहे का? ही फार मोठी शंका मनात आहे. उत्तर प्रदेशात योगी आदित्यनांथांनी मुख्यमंत्री म्हणून सुत्रे हाती घेणे हे धक्कादायक आहे. अल्पसंख्याक समाजात चिंतेचे वातावरण निर्माण झाले असल्याचे पवार यांनी सांगितले. मणिपूर आणि गोव्यातही अजब राजकारण झाले. भाजपाच्या केंद्रीय सत्तेने कमी आमदार असणाऱ्यांना सत्तास्थापनेचे निमंत्रण दिले. भाजपाला पूर्ण देशात आपले वर्चस्व स्थापन करायचे आहे. त्यासाठी ते कोणत्याही थराला जाऊ शकतात. लोकशाही दुबळी करण्याचे काम भाजप करत आहे. मात्र देशाची संसदीय लोकशाही टिकवण्यासाठी आपल्याला एकत्र यायचे आहे. असे पवार यांनी कार्यकर्त्यांना सांगितले. नोटबंदीसारख्या जाचक निर्णयाची किंमत छोट्या उद्योजकांना मोजावी लागली. ३५ टक्के व्यवसाय बंद झाले आणि ४० टक्के कामगार घरी बसले. सामान्य माणूस, सहकारी बँका, शेतकरी सगळेच अडचणीत आले आहेत. सामान्य माणसाच्या कष्टाची कमाई उद्ध्वस्त करण्याचे काम सरकारने केले आहे. सामान्य माणसाबद्दल या नेत्यांना अजिबात कणव नाही. अशी जोरदार टीका पवार यांनी सत्ताधाऱ्यांवर केली. केंद्र सरकारने सव्वा लाख कोटी रुपयांचे बड्या लोकांचे कर्ज माफ केले. मात्र शेतकऱ्याच्या कर्जमाफीवर वक्तव्यही करत नाही. मी कृषिमंत्री असताना ७१ हजार कोटी रुपयांचे शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले होती. त्यामुळे आयातदार देश निर्यातदार बनला. नागपूर मुंबई समृद्धी रस्त्या करण्याचा निर्णयही शेतकरी विरोधी आहे. नक्की कोणाची समृद्धी हे सरकार करतेय माहिती नाही. शेतकऱ्याला योग्य किंमत न दिल्यास रस्ता होऊ देणार नाही. अशा इशारा पवार यांनी दिला. वेगवेगळ्या मार्गांनी लोकांमध्ये जरब बसवण्याचा हा सरकारचा प्रयत्न आहे. याविरोधात आपण एकत्र आलो पाहिजे. आपण एकसंध राहून प्रयत्न केले तर ही स्थिती नक्कीच बदलेल. असे खा. शरद पवार यांनी सांगितले.
Post a Comment