बलात्कार, बालकांवरील लैंगिक अत्याचार आणि ॲसिड हल्ला यामध्ये बळी पडलेल्या महिला आणि बालकांना अर्थसहाय्य व पुनर्वसन करण्यासाठी मनोधैर्य योजना राज्यात सुरु करण्यात आली असून या विषयांची गंभीरता पाहून जास्तीत जास्त १० लाखापर्यंत मदत देण्याबाबत सकारात्मक प्रयत्न करणार असल्याचे महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी सांगितले.
विधान परिषद सदस्य हुस्नबानू खलिफे, आनंदराव पाटील, अशोक उर्फ भाई जगताप, अमरनाथ राजूरकर यांनी मनोधैर्य योजनेविषयी विधान परिषदेत उपस्थित केलेल्या लक्षवेधीला उत्तर देताना मंत्री पंकजा मुंडे बोलत होत्या. मंत्री मुंडे म्हणाल्या की, बलात्कार, बालकांवरील लैंगिक अत्याचार, ॲसिड हल्ल्यातील पिडीत महिला व बालकांना प्रतिष्ठा व आत्मविश्वास, पूर्वस्थिती परत मिळवून देण्याबरोबरच त्यांना मानसिक आघातातून बाहेर काढून त्यांना त्यांच्या पायावर उभे करण्यासाठी, एक नवी उमेद देण्यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. मनोधैर्य या योजनेंतर्गत पीडीतांना जास्तीत जास्त वित्तीय सहाय्य देणे, तसेच समुपदेशन, निवारा, वैद्यकीय व कायदेशीर मदत इत्यादी आधार सेवा तत्परतेने उपलब्ध करुन त्यांचे पूनर्वसन करण्यासाठी शासन प्रयत्न करीत आहे. विधान परिषद सदस्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मंत्री मुंडे म्हणाल्या की, शासन मनोधैर्य योजनेची व्याप्ती वाढवियासाठी व पिडीतांना न्याय मिळवून देण्यासाठी मुख्य सचिव स्तरावर बैठक आयोजित करण्यास आली आहे. तसेच हा विषय महिला व बालविकासासोबत वित्त विभाग, गृह विभाग यांचेशी संबंधित असल्याने त्या त्या विभागाचे सचिव आणि महिला आमदारांना बरोबर घेवून मनोधैर्य योजना पिडीतांना न्याय मिळेल अशी परिपूर्ण करण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
Post a Comment