
महिलांना सामाजिक सुरक्षा मिळण्याबरोबरच त्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासनाने अनेक योजना आखल्या आहेत. मात्र महिलांचे सक्षमीकरण करण्यासाठी समाजाची साथ आवश्यक असल्याचे प्रतिपादन अमृता देवेंद्र फडणवीस यांनी आज व्यक्त केले.
येथील बालगंधर्व रंगमंदिरात अहिल्याराणी महिला विकास व शैक्षणिक संस्थेच्यावतीने “बेटी बचाओ-बेटी पढाओ” या मार्गदर्शक पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात श्रीमती अमृता फडणवीस बोलत होत्या. यावेळी महापौर मुक्ता टिळक, खासदार अनिल शिरोळे, निवृत्त पोलीस महासंचालक प्रवीण दिक्षीत, ॲड. उज्ज्वल निकम, कृष्णकुमार गोयल, मार्गदर्शिकेच्या लेखिका निलीमा तपस्वी, मनोहर चव्हाण उपस्थित होते. श्रीमती फडणवीस म्हणाल्या, महिला या सर्व क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत आहेत. त्या कोणत्याच क्षेत्रात मागे नाहीत. महिलांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासनाच्या विविध योजना आहेत. मात्र केवळ शासन स्तरावर प्रयत्न होवून चालणार नाही तर समाजातील सर्व घटकांतून महिलांना साथ मिळाली पाहिजे. महिलांना सक्षम करण्यासाठी ही मार्गदर्शिका मोलाची कामगिरी बजावेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी महापौर मुक्ता टिळक, खासदार अनिल शिरोळे, प्रवीण दिक्षीत, कृष्णकुमार गोयल यांची भाषणे झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक निलिमा तपस्वी यांनी केले. तर आभार मनोहर चव्हाण यांनी मानले.
Post a Comment