मुंबई. ( शाहरुख मुलाणी ) –
भारतीय जनता पार्टीच्या स्थापनेच्या वेळी स्वप्नातही वाटले नव्हते असे यश आता भाजपाला मिळाले आहे. पंचायत ते पार्लमेंट सर्व निवडणुकात भाजपा पहिल्या क्रमांकावर येऊन सत्ता मिळाली तरी सत्ता हे जनतेच्या सेवेचे साधन आहे या मूळ उद्दीष्टावर भाजपा कायमच असून त्याच दिशेने पक्ष वाटचाल करेल, असा विश्वास राज्याचे आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा यांनी गुरुवारी व्यक्त केला.
विष्णू सावरा म्हणाले की, आपण भाजपाच्या स्थापनेपासून पक्षाचे कार्यकर्ते आहोत. पक्षाचा सुरुवातीचा काळ खूप कठीण होता. आपल्याला सर्व समाजाला सोबत घ्यायचे आहे हे उद्दीष्ट ठेवून असंख्य कार्यकर्त्यांनी पक्षाचे काम केले. एकेक कार्यकर्ता जोडून पक्षाचे काम वाढविले व खस्ता खाल्ल्या. त्यानंतर एवढे स्थित्यंतर झाले आहे. पंचायत ते पार्लमेंट सर्व निवडणुकात भाजपा पहिल्या स्थानावर आला आहे. पक्षाकडे सत्ता आली तरी सत्ता हे सेवेचे साधन आहे व आपल्याला लोकांची सेवा करायची आहे, या मूळ उद्दीष्टापासून दूर जाता कामा नये. आशिष शेलार यांनी सांगितले की, भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी म्हटल्याप्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्वातंत्र्यानंतर देशातील सर्वात लोकप्रिय नेतृत्व आहे. अशा नेतृत्वाखाली आपण काम करत असून भाजपाची यशाची चढती कमान आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गरीब हा देव मानून काम चालू ठेवले आहे. प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब पाटील दानवे यांनी अखंड परिश्रम करून पक्षाचे काम वाढविले आहे व पक्षाला यश मिळवले आहे. ते म्हणाले की, भाजपाच्या सरकारने गरीब माणूस केंद्रबिंदू मानून अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. भ्रष्टाचार निर्मूलनासाठी नोटबंदीसारखा अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला. एकात्म मानववादाची भूमिका घेऊन आपण देशाच्या मूलगामी परिवर्तनाकडे चाललो आहोत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानुसार स्थापना दिनानिमित्त प्रदेश कार्यालयात उपस्थितांच्या मोबाईल फोनवर भीम ॲप डाऊनलोड करण्यासाठी विशेष सुविधा निर्माण करण्यात आली होती. भाजपा स्थापना दिनानिमित्त मुंबईत पक्षाच्या प्रदेश कार्यालयात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी मुंबई भाजपा अध्यक्ष आ. आशिष शेलार, प्रदेश उपाध्यक्ष आ. मंगलप्रभात लोढा, प्रदेश उपाध्यक्ष नीता केळकर, प्रदेश सचिव उमा खापरे, मुख्यालय प्रभारी प्रतापभाई आशर, प्रदेश कोषाध्यक्ष शायना एन. सी., महिला मोर्चा प्रदेशाध्यक्ष ॲड. माधवी नाईक, किसान मोर्चा प्रदेशाध्यक्ष ज्ञानोबा मुंढे, कार्यालय सचिव मुकुंद कुलकर्णी, ज्येष्ठ कार्यकर्ते अरुण साठे व मुकुंदराव कुलकर्णी, प्रदेश प्रवक्ते केशव उपाध्ये, अतुल शाह, गणेश हाके व शिरिष बोराळकर उपस्थित होते.
Post a Comment