सीएम टू पीएम “कडू वादळ” घोंगावणार !
देवेंद्र ते नरेंद्र शेतकरी आसूड यात्रा २१ एप्रिल रोजी वडनगरला पोहोचणार !
हजारो कार्यकर्ते शेकडो सभांद्वारे २५०० किमीचा प्रवास करून रक्तदानाने सांगता करणार.
मुंबई. ( शाहरुख मुलाणी ) –
या देशाची लोकशाही महान आहे, लोकांनी दिलेला कौल शेवटी स्वीकारला जातो पण आजकाल कौल मिळाल्यानंतर डोक्यात हवा जाण्याचे प्रमाण वाढले आहे आज जे सत्तेत आहेत त्यांनीच स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी तातडीने लागू करू हमीभाव देवू कित्येक वचने दिली होती आपल्या जाहीरनाम्यात, पण एकहाती सत्तेत बसल्याबरोबर सारे विसरूनच गेले आम्ही त्या गावाचे नाहीतच अश्या अविर्भावात आज गल्ली पासून दिल्लीपर्यंत उत्तरे मिळत आहेत. जय जवान जय किसान जय विज्ञान या घोषणा आता हवेत विरू लागल्या आहेत त्यामुळे मोदी असोत किंवा फडणवीस यांनी सत्तेच्या हवेतून जरा बाहेर येवून दिल्या शब्दाला जागावे, वेळीच जागे झाला नाहीत तर विधवा आणि अपंगांचे श्राप तुमचाच सत्यानाश करतील अशी संतप्त प्रतिक्रिया आज आमदार बच्चू कडू यांनी पत्रकारांसमोर दिली. आज नागपूर येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत, शेतकरी, शेतमजूर विधवा, अपंग आणि सैनिकांच्या हक्कांसाठी त्यांच्या नियोजित शेतकरी आसूड यात्रा कार्यक्रमा बाबत माहिती दिली .
याबाबत बोलताना आमदार बच्चू कडू यांनी सांगितले स्वातंत्र्यानंतर काळ्या इंग्रजांनी राबविलेल्या शेतकरी आणि गोरगरीब विरोधी कायद्यामुळे आतापर्यंत सुमारे ४ लाख शेतकऱ्यांनी आत्महत्या करून जीवन संपविले या आत्महत्या नसून सरकारने केलेलं खुनच आहेत शेतकरी शेतमजूर विधवा अपंग सैनिकांना हक्कापासून वंचित ठेवणारे खासदार आमदार स्वत:चे पगार आणि पेन्शन बेमालूमपणे वाढवीत असून सरकारी नोकरदारांना भरमसाठ पगार देत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत शेतीमालाला उत्पादन खर्च + ५० टक्के नफा देण्याचे आश्वासन दिले सत्तेवर येताच सुप्रीम कोर्टातील याचिका क्रमांक ३७६/११ मध्ये ६ फेब्रुवारी २०१५ रोजी दाखल केलेल्या शपथपत्रात उत्पादन खर्च + ५० टक्के नफा देणार नाही असे नमूद केले आहे, हा देशातील शेतकरी आणि मतदारांचा मोठा विश्वासघात आहे. कर्जमाफी दिल्यास आत्महत्या होणार नाहीत याची हमी देता काय ? असा बालिश प्रश्न विचारून देवेंद्र सरकारने सुद्धा महाराष्ट्रात पेशवाई पेक्षाही भयानक पद्धतीने कारभार चालविला असून शेतकरी, शेतमजूर विधवा गोरगरीब सैनिकांना रेशनची सबसिडी थेट त्यांच्या बँक खात्यावर देण्याची व्यवस्था केली पाहिजे, शेतमालावरील निर्यातबंदी कायमची हटवली पाहिजे, शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी झालीच पाहिजे, रेडी रेकनर नुसार शेतीकर्ज दिले गेले पाहिजे शेतकरी विरोधी कायदे रद्द केले पाहिजे विधवा, दिव्यांग, यांना दरमहा ५००० /- रुपये पेन्शन द्या, किमान वेतन कायद्यानुसार अकुशल कामगाराला रुपये ३५०/- आणि कुशल कामगाराला रुपये ५०० /- इतके वेतन द्या, उस तोडणी कामगारांना हर्वेस्टर यंत्रा प्रमाणे रुपये ४००/- प्रती टन मजुरी द्या, पेरणी ते कापणी पर्यंतचा सर्व खर्च मनरेगा मधून करा, माजी सैनिक आणि त्यांच्या विधवा पत्नी यांच्या कल्याणकारी योजना प्रभावीपणे राबवा, पंतप्रधान आवास योजनेतील शहरी आणि ग्रामीण दरी दूर करून सरसकट रुपये ३,५०,००० अनुदान द्या, अश्या मागण्या करीत लबाडी, बनवाबनवी करणाऱ्या भामट्याना लोकसभा निवडणुकीत दिलेल्या आश्वासनाची आठवण करून देण्यासाठी दिनांक ११ एप्रिल रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूरहून सुरु होणाऱ्या या यात्रेचा दिनांक २१/४/२०१७ रोजी पंतप्रधान मोदी यांच्या वडनगर येथे समारोप करताना निष्क्रिय धोरणापायी आत्महत्या केलेल्या ४,००,००० शेतकऱ्यांना १००० महिला आणि विधवा तसेच शेतकरी कार्यकर्ते रक्तदान करून श्रद्धांजली देण्यात येणार असल्याचेही त्यांनी याप्रसंगी सांगितले.
Post a Comment