महेंद्र महाजन जैन / रिसोड
वाशिम -

गाव म्हटले की त्याला वेश असते. तसे राजकारण, जातीयवाद, अंधश्रद्धा, भावकीतील वाद, हेवेदावे यांचे विषही असते. असेच वाशीम जिल्ह्यातील करडा (ता. रिसोड) गाव. जेमतेम ३,५०० ते ४,००० हजार लोकवस्तीचे. गटातटाच्या राजकारणामुळे गावातील सांडपाण्याच्या नाल्या बुजवल्या गेल्या. शोषखड्डे तर नव्हतेच. त्यामुळे गावातील मुख्य रस्त्यावरून सांडपाणी वाहत होते. त्याला गटारीचे स्वरुप आले होते. ओघानेच पायी चालणेही दुरापास्त झाले होते. नाही म्हणायला शासनाच्या विकास योजना याही गावात आल्या. पण, टक्केवारीमुळे त्या गराटीतच गुडूप झाल्या. जो तो आपल्या घरातील सांडपाणी रस्त्यावर सोडत होता. सहाजिकच गावात बाराही महिने डासांचा प्रादुर्भाव वाढत होता. रस्त्याने चालताना दुर्गंधी येत होती. कधी-कधी तर गटारीच्या चिखलात गाडी घसरून बाहेरगावी निघालेल्यांचे कपडेसुद्धा खराब होत होते. हे थांबावे, आपले गाव स्वच्छ सुंदर दिसावे, असे प्रत्येकालाच वाटत होते. पण, सांडपाण्याची नाली म्हटलं की बहुतांश ग्रामस्थ त्याला विरोध करत. आपल्या दारातून नाली नकोच अशी त्यांची अड्डेलतटू भूमिका होती. दिवस जात होते. दिवस येत होते. पण, १० ते १५ वर्षांपासून असलेले चित्र कायम होते. यावर चर्चा होत होती. मात्र, तोडगा निघत नव्हता. अशातच वर्ष २०१७ उजाडले. नवीन वर्षात अनेकांनी नवा संकल्प केला. त्यात 'डिसेंट टेलर' म्हणून ओळख असलेला एक पस्तीशीतील युवकही होता. भुजंग बाजीराव देशमुख (हॅलो- 9011621049) असे त्याचे नाव. पण, भुजंग यांचा संकल्प इतरांपेक्षा वेगळा होता. तो वैयक्तिक नाही तर गावासाठी होता. गावाला स्वच्छ, अंधश्रद्धा आणि पाणंदमुक्त करण्याचा निर्धार या अवलियाने केला. हो अवलियाच तो. कारण गावातील अनेकांसाठी भुजंग म्हणजे थट्टेचा विषय. सहा महिन्यांपूर्वी काही जण तर त्यांना मुर्ख, पागलही म्हणत. पण, आता हेच टेलर करडावासीयांसाठी आदरणीय झालेत. काही वर्षांपासून भुजंग यांनी टेलरिंगचा व्यवसाय बंद केला.
आता ते एका कृषी कंपनीसाठी मार्केटिंग करतात. एक जानेवारीपासून ते दिवसा कामावर जातात आणि सायंकाळी गावातील प्रत्येक घरी जाऊन स्वच्छतेचे महत्त्व समजावून सांगतात. तुम्हाला तुमच्या दारातून नाली नको आहे तर शोषखड्डा करा, असा पर्याय त्यांनी सूचवला. त्यासाठी केवळ जागा मागितली. सुरवातीला त्यांना नकार मिळत होता. पण, टेलरसुद्धा जिद्दी होते. ज्यांनी नकार दिला त्यांच्या घरी ते रोज जेवणाच्या वेळी जात आणि स्वच्छतेचे महत्त्व सांगत. प्रसंगी त्यांना शिव्यासुद्धा ऐकाव्या लागल्या. ही कटकट आपल्या घरी यायला नको म्हणून काही जण शोषखड्डा करण्यास तयार झाले. त्यावर टेलर यांनीही स्वतःचे पैसे खर्च करून रात्री-मध्यरात्री श्रमदान करत खड्डे बांधून दिले. बुजवलेल्या काही नाल्या मोकळ्या केल्या. पाहता – पाहता सर्व गाव गटारीमुक्त झाले. आता टेलर दिवसा कामावर जातात तर रात्री टाॅर्च घेऊन सकडेवर फिरतात. उघड्यावर कोण बसले त्याला समजावण्यासाठी. ते हे प्रसिद्धीसाठी करत नाहीत. त्यांना भविष्यात राजकणारणातही जायचे नाही. प्रसिद्धी हवी असती तर त्यांनी याच्या प्रेसनोट काढल्या असत्या. त्यांचे फेसबुकवर साधे अकाउंटही नाही. त्यावरूनच त्यांची प्रसिद्धी पराङमुखता दिसून येते. त्यांना हवे आहे ते त्यांचे स्वच्छ, सुंदर गाव... त्यासाठी ते आपला वेळच नाही तर पैसेही खर्च करत आहेत. स्वच्छतेनंतरचा त्यांचा पुढील टप्पा अंधश्रद्धा विरोधी आहे. आता श्रमदान करण्यासाठी गावातील काही युवकसुद्धा त्यांच्या सोबत येत आहेत. अनेकांनी स्वखर्चाने शोषखड्डे तयार केले आहेत. हे केवळ साडेचार महिन्यात...
Post a Comment