BREAKING NEWS

Saturday, April 22, 2017

गणेशोत्सव हा भेदभाव संपविण्याचा, एकोपा वाढविण्याचा उत्सव - मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस

     मुंबई:- 



स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळविणारच' अशी घोषणा करणारे लोकमान्य टिळक यांनी सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला. सामाजिक अभिसरण करणे, भेदभाव संपविणे आणि एकोपा वाढविण्याचा उत्सव म्हणजे गणेशोत्सव असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
     राज्य शासनाने गतवर्षी आयोजित केलेल्या ‘लोकमान्य सार्वजनिक गणेशोत्सव अभियान’अंतर्गत गणेश सजावट स्पर्धेच्या वितरणप्रसंगी ते बोलत होते. राष्ट्रीय संगीत नाट्य केंद्रामध्ये (एनसीपीए) आयोजित या कार्यक्रमास वित्त व नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार, खासदार अरविंद सावंत, आमदार सर्वश्री राज पुरोहित, मंगलप्रभात लोढा, आशिष देशमुख, पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाच्या सचिव वल्सा नायर सिंग, राज्यातील पुरस्कार प्राप्त गणेश मूर्तीकार आणि सार्वजनिक गणेश मंडळाचे प्रतिनिधी आदी उपस्थित होते.
            1857 चा उठाव फसल्यानंतर समाजामध्ये नैराश्य आले होते, असे सांगून मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, या घटनेमुळे इंग्रज साम्राज्याचा सूर्य कधीच आपल्या देशावर मावळणार नाही अशी जनभावना निर्माण झाली होती. देशाला स्वातंत्र्य मिळायचे असेल तर ते इंग्लंडच्या राणीच्या दयेवरच मिळेल असे लोकांना वाटू लागले होते. जनतेची विजिगीषू वृत्ती नष्ट झाली होती. अशा वेळी लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव सुरु करुन लोकांमध्ये चैतन्य निर्माण करण्याचे काम केले, असेही ते म्हणाले.
        मुख्यमंत्री फडणवीस पुढे म्हणाले की, ‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे’ या लोकमान्यांच्या ऐतिहासिक घोषणेच्या शताब्दी महोत्सवानिमित्त शासनामार्फत लोकमान्य सार्वजनिक गणेशोत्सव अभियान सुरु करण्यात आले. लोकमान्यांनी केलेली स्वराज्याची केवळ घोषणा नव्हती तर इंग्रजी सत्तेला एक आव्हान होते. खऱ्या अर्थाने इंग्रजी राजवटी विरोधात देशात असंतोष निर्माण करण्याचे काम या घोषणेने केले.
        मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, आज गणेशोत्सवाचे स्वरुप बदलले असले तरी मूळ हेतू कायम आहे. कोणताही भेदभाव न करता समाजाने एकत्र यावे, सामाजिक एकोपा निर्माण व्हावा, संघटन व्हावे हे उद्देश गणेशोत्सवामुळे सफल होतात. गणेशोत्सवामुळे व्यवस्थापन शास्त्र, विविध परवानग्या मिळविण्याच्या निमित्ताने शासनयंत्रणेशी संवाद साधण्याची पद्धत आदी शालेय शिक्षणबाह्य गोष्टी शिकायला मिळतात. सामाजिक अभिसरण, विजिगीषू वृत्तीत वाढ आणि नेतृत्वगुणाला वाव मिळण्याच्या दृष्टीकोनातून गणेशोत्सवाचे महत्व अधोरेखीत होते. हीच बाब लक्षात घेऊन गणेश मंडळांना प्रोत्साहन देण्यासाठी शासनाने हे पुरस्कार अभियान सुरु केले.
        यावेळी वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, गणेशोत्सव हा केवळ उत्सव नसून सर्वांसाठी प्रेरणास्रोत आहे. लोकमान्यांनी केलेली स्वराज्य मिळविण्याची घोषणा ही आपल्या अधिकाराला दर्शविणारी आहे. समाजाला दिशा देण्याचे काम गणेश मंडळे करतात म्हणून त्यांना पारितोषिकाच्या माध्यमातून प्रोत्साहन देण्याचे काम शासन करत आहे.
       या कार्यक्रमात राज्यात विभागनिहाय प्रथम क्रमांक आलेल्या गणेश मूर्तीकारांचा सत्कार मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आला. यामध्ये मुंबई शहर विभागातून प्रथम आलेले मनोहर बागवे, मुंबई उपनगर- दिगंबर मयेकर, रत्नागिरी- संतोष रत्नाकर कांबळी, सांगली- मंगेश कुंभार, सोलापूर- महेश शहाणे, कोल्हापूर- संजये सर्जेराव निगवेकर, औरंगाबाद- संजय सूर्यवंशी, परभणी- विनायक मिसाळ, बुलडाणा- हरिभाऊ राजाराम राऊत, अमरावती- राहुल बजरंग पेंढारकर, भंडारा- आनंद वावणे, चंद्रपूर- श्री नरसिंग बाल गणेश मंडळ यांना प्रमाणपत्र, सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
        विभागनिहाय द्वितीय व तृतीय क्रमांक मिळविलेल्या गणेश मूर्तीकारांचा सत्कारही कार्यक्रमात करण्यात आला. प्रथम क्रमांक मिळालेल्या मूर्तीकारांना 50 हजार रुपये, द्वितीय पुरस्कार 40 हजार रुपये आणि तृतीय पुरस्कार 30 हजार रुपये असे पुरस्कार देण्यात आले. विभागीय पातळीवर प्रथम आलेल्या गणेश मंडळाला 2 लाख रुपये, द्वितीय पुरस्कार 1 लाख 50 हजार रुपये तर तृतीय पुरस्कार 1 लाख रुपये असे पुरस्कार देण्यात आले.
        विभागस्तरीय पुरस्कारांमध्ये प्रथम पुरस्कार प्राप्त गणेश मंडळांचाही सत्कार करण्यात आला. यामध्ये मुंबई विभाग- शिवडी मध्य विभाग, शिवडी, कोकण विभाग- संत रोहिदास मित्र मंडळ, महाड, जि. रायगड, नाशिक विभाग- जागृती मित्र मंडळ, भडगाव, जि. जळगाव, पुणे विभाग- समर्थ एज्युकेशन इन्स्टिट्यूट समर्थ गणेश मंडळ, बांगरवाडी, बेल्हे, ता. जुन्नर, जि. पुणे, औरंगाबाद विभाग- श्री कालिका बलभिम गणेश मंडळ, बलभीम चौक, बीड, अमरावती विभाग- खडकेश्वर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, पातूर, जि. अकोला, नागपूर विभाग- नवयुवक किसान गणेश मंडळ, देवरी, जि. गोंदिया यांच्यासह द्वितीय व तृतीय पुरस्कारप्राप्त मंडळांचाही यावेळी सत्कार करण्यात आला. सांस्कृतिक कार्य विभागाचे संचालक संजय पाटील यांनी प्रास्ताविक केले.

Share this:

Post a Comment

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.