BREAKING NEWS

Tuesday, June 6, 2017

कृषी क्षेत्राला उद्योगांशी जोडणे आवश्यक– मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ><><><मेक इन इंडियांतर्गत उत्पादित मिनीटमेड पल्पी मोसंबी ज्यूसचे अनावरण

                                                                                        
           मुंबई :- 



शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबरोबरच तो पुन्हा कर्जबाजारी होणार नाही, यासाठी राज्य शासन प्रक्रिया उद्योगाला चालना देणार आहे. कृषी क्षेत्राच्या शाश्वत विकासासाठी शेतील उद्योगांशी जोडणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले.
कोकाकोलाच्या मिनीटमेड (Minute maid) पल्पी मोसंबी ज्यूसचे अनावरण मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते सह्याद्री अतिथीगृहात झाले. यावेळी मोर्शीचे आमदार डॉ. अनिल बोंडे, कोकाकोलाचे भारत आणि दक्षिण पश्चिम आशिया विभागाचे अध्यक्ष टी. कृष्णकुमार, जैन इरिगेशन चे अध्यक्ष अशोक जैन, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव प्रवीण परदेशी, बीईसी फूडचे व्यवस्थापकीय संचालक विनू जैन, फ्रुट सर्क्युलर इकॉनॉमीचे भारतातील उपाध्यक्ष असीम पारेख, कोकाकोलाचे इश्तियाक अहमद, अर्पण बासू, वासन शुक्ल आदी उपस्थित होते. या कार्यक्रमास जळगाव, औरंगाबाद, जालना तसेच विदर्भातील मोसंबी उत्पादक शेतकरी उपस्थित होते.
          मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, विदर्भ, मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या फळांना उचित मूल्य मिळावे, यासाठी मेक इन इंडिया दरम्यान प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत कोकाकाला सोबत करार केला होता. आज मोसंबी ज्यूसचे अनावरण त्याचेच फलित आहे. फलोत्पादक शेतकऱ्यांना योग्य भाव व बाजारमूल्य मिळणे हे परिस्थितीवर आधारभूत असते. बेभरवशाच्या बाजारापासून सुटका हवी असेल तर शेती मालावर प्रक्रिया करणे आवश्यक आहे. यातून फलोत्पादनाला शाश्वत बाजारभाव मिळेल. यासाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे.
           मोर्शी येथे 12 विविध फळांवर प्रक्रिया करणारा प्रकल्प उभारण्यात येत आहे. तसेच उत्तम फळे यावीत, यासाठी दर्जेदार रोपटी शेतकऱ्यांना पुरविण्यासाठी नर्सरीही उभारण्यात येत आहे. यासाठी जैन इरिगेशन व कोकाकोलाचे सहकार्य मिळत आहे. मोसंबी ज्यूस सोबतच कोकाकोलाच्या फॅंटा या शीतपेयामध्ये सध्या 5 टक्के संत्र्याचे ज्यूस मिसळण्याचा आणि हे प्रमाण पुढील काळात 10 टक्के करण्याचा निर्णय शेतकऱ्यांसाठी फायदेशीर आहे. वीस हजार टन फळांवर प्रक्रिया करण्याची या प्रकल्पात क्षमता आहे. तसेच ज्यूसची निर्यातही सोपी झाली आहे. जालना, अमरावती, सोलापूर यासारख्या फळ उत्पादक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे, असेही श्री. फडणवीस यांनी सांगितले.
         श्री. फडणवीस म्हणाले की, सध्या शेतकऱ्यांसमोर अनेक आव्हाने आहेत. त्यावर फलोत्पादन व प्रक्रिया करणे हाच योग्य उपाय आहे. त्यासाठी राज्यात उत्पादन होणाऱ्या शेतीमालावर प्रक्रिया उद्योग उभारण्यावर राज्य शासन भर देणार आहे. त्यासाठी प्रक्रिया धोरण जाहीर केले आहे. नाशवंत पदार्थांच्या प्रक्रियेवरही भर देण्यात येणार आहे. शेतकऱ्याला कर्जातून बाहेर काढण्याबरोबरच दुष्काळी भागातील शेतकऱ्यांनाही कर्जमुक्त करण्याचा राज्य शासनाचा प्रयत्न आहे. त्यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रक्रिया उद्योग उभारणार आहोत.
            शेतकऱ्यांच्या पाठिशी उभे राहण्याचे काम राज्य शासनाने केले आहे. शेतीसाठीचे फिडर हे सौरऊर्जेवर चालविण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच कोळशाच्या किमती स्थिर ठेवण्यासाठीही राज्य शासनाने पावले उचलली आहेत. वेअरहाऊस, कोल्डस्टोरेज उभारण्यात येत आहेत. शेतकऱ्यांच्या पाठिशी राज्य शासन ठामपणे उभे असून त्यांना जास्तीत जास्त लाभ मिळावे, यासाठी प्रयत्नशील आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर राज्य शासन शेतकरी नेत्यांशी चर्चा करण्यास नेहमीच तयार असल्याचेही श्री. फडणवीस यांनी यावेळी सांगितले.
              कोकाकोलाच्या मोसंबी ज्यूसच्या अनावरणाचा हा कार्यक्रम देशासाठी ऐतिहासिक आहे. शेतकऱ्यांना कर्जमुक्तीकडे घेऊन जाणारा हा कार्यक्रम आहे. राज्य शासनाच्या प्रक्रिया उद्योगाला प्रोत्साहन देण्याच्या उपक्रमास कोकाकोलाने सहकार्य केल्याबद्दल त्यांचे अभिनंदन, असेही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी सांगितले.               
कोकाकोलाचे भारतातील प्रमुख श्री. कृष्णकांत म्हणाले की, फळांवर प्रक्रिया करणारा हा प्रकल्प उभारण्यासाठी मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी पुढाकार घेतला आहे. तसेच कोकाकोलाने फँटा या आपल्या लोकप्रिय ब्रँडमध्ये सध्या 5 टक्के संत्र्याचा ज्यूस मिसळण्याचा निर्णय घेतला आहे. पुढील दोन महिन्यात हे प्रमाण दहा टक्के होणार आहे. तसेच पुढील पाच वर्षात फळांच्या ज्यूस तयार करण्याचे प्रमाण वाढविणार आहे.
           श्री. जैन म्हणाले की, शेतकऱ्यांना दर्जेदार फळे उत्पादन करता यावीत, यासाठी जैन इरिगेशनतर्फे उच्च तंत्रज्ञान विकसित करून रोपे तयार करण्यात येत आहे. ही रोपे तयार करण्यासाठी मोर्शी येथे नर्सरी प्रकल्प उभारण्यात येत आहे. या प्रकल्पातील रोपे विदर्भ, मराठवाड्यातील शेतकऱ्यांना देण्यात येणार आहेत.
        आज अनावरण झालेल्या मोसंबी ज्यूसची निर्मिती ही विदर्भ, मराठवाडा व खान्देशातील शेतकऱ्यांनी पिकविलेल्या मोसंबीपासून तयार करण्यात आला आहे. मेक इन इंडिया अंतर्गत कोकाकोलाने केलेल्या सामंजस्य कराराअंतर्गत हे उत्पादन तयार करण्यात आहे, असे श्री. अहमद यांनी सांगितले.
                                               

Share this:

Post a Comment

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.