माझे बाबा पुरुषोत्तम विनायकराव जाधव माझे प्रेरणास्थान आहेत. मी आज जे काही आहे ते केवळ त्यांच्यामुळेच. मला आजही आठवते कि ते मोठे सरकारी अधिकारी असल्याने त्यांच्या नावाचा मी लहानपणी खूप फायदा उचलला होता. आम्ही मुळचे नागपूरकर आणि तिथल्या सावनेर या तालुक्यात ते तहसीलदार होते, त्यामुळे माझी मोठीच बिशाद असायची. मित्रांना घेऊन जाऊन कुठेही पैसे न देता खायचो आणि फिरायचोदेखील. गावात सगळे मला जाधव साहेबांचा मुलगा म्हणून ओळखायचे, आणि त्याचा मला गर्व देखील होता. पण जसजसा मोठा होत गेलो बाबांनी मला वळण लावण्यास सुरुवात केली. त्यांच्या नावावर मी जी काही मौजमज्जा केली होती, त्या सर्वांची परतफेड माझ्या मागे ते करत असे, हे जेव्हा मला समजले त्यावेळी त्यांच्याबद्दलचा मला वाटणारा आदर दुपटीने वाढला. त्यानंतर कोणतेही काम स्वतःच्या हिम्मतीवर आणि पायावर उभे राहून करण्याची शिस्त मला लाभली. माझ्या आयुष्यातील महत्वाच्या निर्णयात ते नेहमी माझ्यासोबत असतात. जेव्हा मी बारावीत नापास झालो होतो, तेव्हा सर्वच मला हसत होते मला तुच्छतेने बघत असायचे, पण वडिलांनी मला खंबीर साथ दिली. 'बारावीची परीक्षा मोठी नाही, तुला आजून खूप काही करायचे आहे आयुष्यात! तू नुसता पास नाही होणार तर एक दिवस माझं नाव मोठं करणार', असा विश्वास त्यांना होता आणि अजून ही आहे. त्यांच्या प्रेरणेनंतर मी त्या दिवसापासून प्रत्येक गोष्ट मन लावून, जिद्दीने आणि चिकाटीने करतो आणि त्या सर्व गोष्टी सार्थकदेखील होताच, आता तर लोक त्यांना माझ्या नावाने ओळखायला लागले आहेत. श्रेयश चे बाबा म्हणून लोक त्यांना संबोधत आहेत, त्याचा खूप जास्त अभिमान वाटतो. बाबांची हि चिरंतर साथ आजही माझ्यासोबत आहे. ते माझे आधारस्तंभ आणि आयडॉल आहेत, लव्ह यु बाबा, यु आर माय सुपर हिरो!
Post a Comment