BREAKING NEWS

Thursday, June 29, 2017

पत्रकारांवरील खोटे गुन्हे मागे घेवून पोलीस अधिकार्‍यांवर कारवाई करा - महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे मुख्यमंत्र्यांना निवेदन



महेन्द्र महाजन जैन / रिसोड -



वाशीम - अमरावती जिल्हयातील चांदुर रेल्वे येथील पत्रकार प्रशांत कांबळे व अभिजित तिवारी यांच्यावर पोलीसांनी दाखल केलेले खोटे गुन्हे मागे घेवून त्यांना अमानुष मारहाण करणार्‍या पोलीस अधिकार्‍यांवर कठोर कारवाई करावी तसेच पातुर येथील पत्रकार उमेश देशमुख यांना चान्नी येथील ठाणेदाराने जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी ठाणेदाराला त्वरीत निलंबित करावे अशी मागणी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ शाखा वाशीमच्या वतीने करण्यात आली.
  यासंदर्भात २८ जून रोजी संघटनेचे विभागीय अध्यक्ष बाळासाहेब देशमुख, जिल्हा अध्यक्ष विनोद तायडे व ग्रामीण जिल्हाध्यक्ष निलेश सोमाणी यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठविण्यात आले. निवेदन देतांना संघटनेचे जेष्ठ मार्गदर्शक मंगल इंगोले वाशीमकर, जिल्हा उपाध्यक्ष फुलचंद भगत, जिल्हा संघटक महादेव हरणे, जिल्हा कोषाध्यक्ष काशीनाथ कोकाटे, वाशीम तालुका अध्यक्ष मनिष डांगे, रजनीकांत वानखडे, विनोद गिरी नंदकिशोर वनस्कर, विशाल राऊत, सौरभ गायकवाड, गजानन देशमुख, संजय खडसे, प्रमोद काळे आदी पत्रकारांची उपस्थिती होती.
  दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की,  लोकशाही राज्य असलेल्या भारतीय राज्यघटनेच्या चार आधारस्तंभापैकी प्रसारमाध्यमे हा चवथा आधारस्तंभ आहे. मात्र या आधारस्तंभाला भक्कम आधार देणार्‍या पत्रकारांची दिवसेंदिवस गळचेपी केल्या जात आहे. पत्रकार हा निर्भिडपणे लिखाण करुन वाईट प्रवृत्तीचे बुरखे फाडून या प्रवृत्तींना चारचौघात उघडे पाडत असतो. व पत्रकार हा सरकार आणि जनता यामधील एक महत्वाचा दुवा असून जनता आणि सरकार या दोघांना सहकार्य करण्यात पत्रकारांची महत्वाची भूमिका आहे. मात्र महाराष्ट्र राज्यात दिवसेंदिवस पत्रकारांवर हल्ले होत आहेत. त्यांना जिवे मारले जात आहेत. विशेष म्हणजे पोलीस प्रशासनाकडूनच पत्रकाराना धमक्या दिल्या जात असून त्यांना अमानुष मारहाण करुन त्यांचा आवाज दाबल्या जात आहे. या प्रकारामुळे एकूणच लोकशाही प्रक्रिया धोक्यात आली आहे. देशात आणि राज्यात आतापर्यत अनेक पत्रकारावर हल्ले झाले असून यामध्ये अनेक पत्रकारांना आपला जिव गमवावा लागला आहे.
  अमरावती जिल्हयातील चांदुर रेल्वे पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या मोगरा गावच्या युवतीच्या आत्महत्या प्रकरणाची बातमी संकलीत करण्यास गेलेले पत्रकार प्रशांत कांबळे व अभिजित तिवारी या दोन युवा पत्रकारांवर आकस ठेवून तेथील ठाणेदार व पोलीसांनी अमानुष मारहाण करुन त्यांना तुरुंगात डांबले व त्यांच्यावर विविध  कलमान्वये गुन्हे दाखल केले. या प्रकरणाचा आम्ही संघटनेच्या वतीने तीव्र निषेध नोंदवित असून या प्रकरणातील या दोन पत्रकारांवरील खोटे गुन्हे मागे घेवून संंबंधीत ठाणेदार व पोलीसांना त्वरीत निलंबित करावे व त्याच्यावर कठोर कारवाई करावी. अन्यथा महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. तसेच अकोला जिल्हयातील पातुर येथील पत्रकार उमेश देशमुख यांना चान्नी पोलीस स्टेशनचे ठाणेदार वैभव पाटील यांनी जिवे मारण्याची धमकी दिल्याबद्दल संबंधीत ठाणेदारांना त्वरीत निलंबित करुन त्यांच्यावर कारवाई करावी. या दोन्ही प्रकरणाचा महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने तीव्र निषेध नोंदविण्यात येत असून संंबंधीत पोलीसांवर कारवाई न झाल्यास महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असे शेवटी निवेदनात नमूद करण्यात आले आहे

Share this:

Post a Comment

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.