◆चंद्रपूर / प्रवीण गोंगले / ◆- - आपण शासनाचे प्रतिनिधी म्हणून काम करतांना आपल्यावर दिलेली जबाबदारी पारपाडण्याची आवश्यकता असून मानसिक थकावट दुर करुन काम करण्याची पध्दत आत्मसात करणे गरजेचे असल्याचे मत जिल्हाधिकारी डॉ.दिपक म्हैसेकर यांनी 10 व्या नागरी सेवा दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बचत भवन सभागृहात आयोजित कार्यक्रमात बोलतांना व्यक्त केले.
यावेळी मनपा आयुक्त सुधीर शंभरकर, शासकीय वैद्यकिय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.एस.एस.मोरे, अप्पर जिल्हाधिकारी संजय धिवरे, अतिरीक्त पोलीस अधिक्षक हेमराजसिंग राजपूत, निवासी उपजिल्हाधिकारी संजय दैने, अधिक्षक अभियंता बालपांडे, जिल्हा अग्रणी बँकेचे सुबेसिंग उपस्थित होते.
शासन सेवेत असतांना नाविण्यपूर्ण वेगवेगळे प्रकल्प राबवून सामान्य माणसाला त्याचा लाभ कसा देता येईल या दृष्टीने काम करण्याची आवश्यकता असल्याचे जिल्हाधिकारी डॉ.दिपक म्हैसेकर यांनी सांगितले. तसेच शासनाच्या नवनवीन योजनांची माहिती जनतेला वेळोवेळी देऊन त्या योजनांचा लाभ देण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याची गरज असल्याचे ते म्हणाले. सामान्य नागरिकांच्या समस्या जाणून किमान एक वेगळा प्रकल्प राबविण्यात यावा त्याची दखल घेण्याची विनती पालकमंत्र्यांना करण्यात येईल असेही त्यांनी सांगितले. त्यामुळे या वर्षात प्रत्येक विभागाने एक वेगळी योजना राबवावी अशी संकल्पना या वेळी करु या असे ते म्हणाले.
या कार्यक्रमात पोलीस विभागातर्फे राबविण्यात आलेल्या योजनांचे सादरीकरण अतिरीक्त जिल्हा पोलीस अधिक्षक हेमराजसिंग राजपूत यांनी केले. जिल्हयात मागील एका वर्षात अपघातामध्ये मृत्यूचे प्रमाण कमी झाले असून इतरही गुन्हयात घट झाली असल्याने त्यांनी यावेळी सांगितले.
तर जिल्हा अग्रणी बॅकेचे व्यवस्थापक सेबुसिंग यांनी पंतप्रधान मुद्रा योजने अंतर्गत पंतप्रधानमंत्री जन-धन योजना, जीवन ज्योती विमा योजना, सुरक्षा विमा योजना, प्रधानमंत्री मुद्रा योजना, फसल बीमा योजना, आवास योजना व स्टॅण्ड अप इंडिया योजनांसंबंधीची माहिती त्यांनी दिली. या योजनांचा लाभ सामान्य नागरिकांना होणार असल्याने आपल्यास्तरावर या योजनांसंबंधीची माहिती नागरिकांना समजवून सांगण्यात यावी असेही ते म्हणाले. तसेच अप्पर कोषागार अधिकारी ग.भा.हिरुळकर यांनी इतर विभागातर्फे कोषागारात सादर करण्यात येणा-या देयकातील दृष्टींच्या पूर्ततेबाबची माहिती सांगितली.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक अप्पर जिल्हाधिकारी संजय धिवरे यांनी तर संचालन नायब तहसिलदार कांचन भिंगारदिवे यांनी केले. आभार निवासी उपजिल्हाधिकारी संजय दैने यांनी मानले. या कार्यक्रमास इतर विभागाचे अधिकारी व कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.
Post a Comment