चंद्रपूर / प्रवीण गोंगले
मैगसेसे अवार्ड विजेते जलतज्ञ डॉ.राजेंद्र सिंह यांनी आज सकाळी चंद्रपूरच्या इरई नदीची पाहणी केली. राज्य सरकारने इरई नदीच्या पुनरुज्जीवनाचा कार्यक्रम सुरु केला आहे आणि राजेंद्र सिंह यांच्यावर या कार्यक्रमाची धुरा सोपविण्यात आली आहे. आज सकाळी ६ वाजता पडोली येथून राजेंद्र सिंह यांनी आपल्या दौ-याची सुरुवात केली आणि जवळ-जवळ २ तास त्यांनी वेगळ्या-वेगळ्या टप्प्यांवर नदीची पाहणी केली. जवळ पास १०० किलोमीटर चा विस्तार असलेली इरई नदी ही चंद्रपूर शहराची जीवन वाहिनी समजली जाते. मात्र गेल्या अनेक वर्षांपासून कोळसा खाणींमधून निघणा-या ओव्हर-बर्डन आणि विज केंद्रातून निघणा-या राखेमुळे या नदीचं पात्र पूर्णपणे बुजलय. पावसाळा संपताच इरई कोरडी होते तर दुसरीकडे नदी उथळ झाल्याने पावसाळ्यात चंद्रपूर शहरात पूर येतो. इरई नदीच्या पात्रातील हा ८ ते १० फूट साचलेला गाळ काढण्याचे काम सध्या जिल्हा प्रशासनाने सुरु केलय आणि याचाच आढावा आज राजेंद्र सिंह यांनी घेतला. यावेळी राजेंद्र सिंह यांनी जिल्हा प्रशासनाने केलेल्या कामाचे कौतुक करतांनाच इरई नदीचं पात्र बुजवणा-या कोळसा खाणींवर आणि नदीत अनिर्बंध राख सोडणा-या वीज प्रकल्पांवर जोरदार ताशेरे ओढले. जलतज्ञ राजेंद्र सिंह यांनी नदी पुनरुज्जीवनाच्या कामात जिल्हा प्रशासनाला अनेक महत्वाच्या सूचना केल्या. यात वाळू असेल त्या खोलीपर्यंतच नदीतला गाळ काढला जावा , नदीतली जैव-विविधता कायम राखण्यासाठी नदीत अनेक ठिकाणी डोह तयार करण्यात यावे , ओव्हर-बर्डन आणि विज केंद्रातून निघणारी राख त्वरित रोखावी , शहरातील सांडपाणी नदीत प्रक्रिया न करता टाकू नका याशिवाय नदीच्या किना-यावर वृक्षारोपण आणि इरई धरणातून वर्षभर नदीत पाण्याचा विसर्ग कायम राखणे आदींचा समावेश आहे.
पालकमंत्री सुधीर मूनगंटीवार यांच्यासह जिल्हा प्रशासनाच्या वरिष्ठ अधिका-यांसह डॉ. राजेंद्रसिंग यांनी घेतलेल्या बैठकीत इरई नदीच्या पुनरूज्जीवनासाठी नदी प्राधिकरण स्थापून कृती आराखडा तयार करण्याची सूचना केली.
Post a Comment