चांदूर रेल्वे / शहेजाद खान
निमगव्हाण ग्रामस्थांचा आरोप
तालुक्यातील निमगव्हाण येथे रोजगार सेवकांने खोट्या मजुरांच्या नावे हजेरीपट भरून व सरपंच, उपसरपंच व ग्रामसेवक यांच्या खोट्या सह्या करून २८ हजार ७०० रूपयांचा अपहार केला. या प्रकरणी दोषी रोजगार सेवकाची तक्रार तहसीलदार, गटविकास अधिकारी, ठाणेदार व जिल्हाधिकारीना दिल्यानंतरही त्यावर कुठलीही कारवाई झाली नाही. त्यामूळे दोषी रोजगार सेवकाला राजाश्रय मिळत असून प्रशासन पाठबळ देत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
सविस्तर वृत्त असे की, निमगव्हाण ग्रा.पं.चे रोजगार सेवक सतिश तानबाजी पर्बत यांनी म.गांधी रोजगार हमी योजनातंर्गत केलेल्या कामामध्ये खोट्या मजुरांची नावे टाकून व सरपंच, उपसरपंच व ग्रामसेवकांच्या खोट्या सह्या करून २८ हजार ७०० रूपयाचा अपहार केला. ही बाब २५/०२/१६ च्या मासीक सभेत सरपंच, उपसरपंच व ग्रा.पं.सदस्य यांच्या उपस्थितीत चर्चेला आली. सर्वानुमते प्रत्यक्ष सतिश पर्बत यांना बोलावून त्याबद्दल विचारणा केली असता त्याने उडवाउडवीचे उत्तरे दिले. सदर प्रकरण अंगलट येत असल्याचे पाहून पर्बत यांनी सभागृहात आत्महत्या करतो आणि सर्वांना फसवितो अशी धमकी दिली. सदर बाब निर्देशीत करून कारवाईची मागणी निवेदनाव्दारे तळेगाव दशासर पोलीस स्टेशनला केली. परंतु तळेगाव पोलीस स्टेशनने तक्रार घेण्यास टाळाटाळ केल्याने रजिस्टर पोष्टाने पाठविण्यात आले. १६ एप्रिलच्या ग्रा.पं.मासीक सभेत विषय क्र.१० अन्वये सतिश पर्बत यांना रोजगार पदावरून काढण्यात यावे असा ठराव सर्वानुमते पारीत केला.श्री.पर्बत यांच्यावरील तक्रारीची दखल तळेगाव पोलीसांनी न घेतल्याने चांदूर रेल्वे उपविभागीय पोलीस अधिकारी व जिल्हा पोलीस अधिक्षक यांच्याकडे निवेदन देऊन कारवाईची मागणी केली. तसेच जिल्हाधिकारी, मुख्यकार्यपालन अधिकारी व जि.प.अध्यक्ष यांना निवेदन देऊन कारवाईची मागणी केली. या प्रकरणी कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही.उलट दोषी रोजगार सेवकाला प्रशासन व राजकिय नेते पाठीशी घालत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
Post a Comment