अमरावती, (शहेजाद खान)-/ :
राज्यात पाण्याची समस्या फार मोठी आहे. लोकचळवळीतून, लोकसहभागातून या प्रश्नावर मात करता येऊ शकते म्हणून आम्ही पाणी फाऊंडेशनच्या वतीने राज्यात सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा आयोजित केली आहे. पहिल्या टप्प्यात राज्यातील वरुड, कोरेगाव (सातारा), अंबेजोगाई (बीड) या तीन तालुक्यातील गावात स्पर्धा सुरु केली आहे. यासाठी पाणी फाऊंडेशनच्या वतीने एक कोटी रुपयाची बक्षिसे ठेवली आहे. यासाठी ग्रामस्थांनी या चळवळीत नियमितपणे सहभाग घेऊन जलसंवर्धनाची कामे घ्यावीत. राज्य टंचाईमुक्त होईपर्यंत आपण पाणी प्रश्नावर सतत कार्य करत राहु अशी ग्वाही पाणी फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष आमिर खान यांनी दिली.
अमरावती जिल्ह्याच्या वरुड तालुक्यातील वाठोडा या गावी आज पहाटेच 6-30 वाजता आमिर खान यांचे मराठी सिने कलावंतासह आगमन झाले. यावेळी ग्रामस्थांना मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. काटोलचे आमदार आशिष देशमुख, आमदार डॉ.अनिल बोंडे, जिल्हाधिकारी किरण गित्ते, उपविभागीय अधिकारी ललितकुमार वऱ्हाडे, जिल्हा माहिती अधिकारी सुरेश काचावार, तहसिलदार भुसारी, पाणी फाऊंडेशनचे सत्यजित भटकळ, सौ.बोंडे, सरपंच मनोज बाडे, उपसरपंच सरोज उपासे, पंचायत समितीचे माजी सभापती निलेश मगरदे, प्रसिद्ध अभिनेत्री रिमा लागू, मराठी अभिनेत्री सई ताम्हणकर, सुनिल बर्वे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी आमिर खान यांनी वाठोडा गावच्या पाझर तलावात श्रमदान करुन तलावातील गाळ काढला. यावेळी वाठोडा गावातील व पंचक्रोषितील नागरिकांनी मानवी साखळी करुन दोन तास श्रमदान केले.
Post a Comment