गडचिरोली / रंगय्या रेपाकवार -
कोरडया पडलेल्या तलावांमधील गाळ शेतीसाठी अतिशय सुपिक माती असून यातून उत्पादकता वाढते. शेतकऱ्यांनी ही माती उत्खनन करुन नेल्यास त्यावर कोणत्याही स्वरुपाची रॉयल्टी लावली जाणार नाही. त्यामुळे अधिकाधिक जणांनी ही माती शेतीसाठी न्यावी असे आवाहन जिल्हाधिकारी महेश आव्हाड यांनी केले आहे.
तलावात वर्षानूवर्षे साठत जाणारा गाळ हा पोषणद्रव्याने भरपूर असतो. त्यामुळे शेती अधिक सूपीक करण्यात मदत होत असते. गेल्या वर्षी कमी प्रमाणात पडलेला पाऊस आणि यंदाचा कडक उन्हाळा यामुळे यंदा अनेक तलाव कोरडे पडलेले आहे.
कोरडया तलावातील गाळ शेतीसाठी वापरल्यास कोणतीही रॉयल्टी प्रशासन आकारणार नाही असे सांगून जिल्हाधिकारी म्हणाले की, या प्रकारे गाळ उपसून शेतात टाकण्यास महाराष्ट्र दिनी सांसदग्राम असलेल्या यावली येथे झाली आहे.
या गाळाचा उपसा केल्याने तीन प्रकारचे फायदे आहेत. शेतीचा कस वाढण्यासोबतच तलावांची साठवण क्षमता वाढत असते. हा गाळ म्हणजे चिकण माती असल्याने साठलेल्या गाळामुळे पाण्याचा पाझर पुन्हा सुरु होतो ज्याचा फायदा भूजल पातळी वाढण्यात होत असतो. गडचिरोली जिल्हयातील गाळ काढण्याचे काम एका लोकचळवळी सारखे केल्यास जलयुक्त शिवार मध्ये निर्माण होणारे पाणी साठे तसेच शेततळे आणि साठवण क्षमता वाढलेले हे तलाव एका पावसाळयात जिल्हयातील अनेक भागांना पूर्णपणे जलयुक्त करीत व पाणी टंचाईच्या किंवा भूस्तरातील पाणी पातळी खाली पोहोचण्याच्या समस्येवर कायमस्वरुपी मात होवू शकणार आहे असेही ते म्हणाले.
Post a Comment