गडचिरोली / रंगय्या रेपाकवार /--
स्त्री भ्रुण हत्या रोखण्यासाठी जिल्हयात गभवती असणाऱ्या महिलांची माहिती एकत्र करुन त्यावर नियमित लक्ष ठेवणारी प्रणाली तयार करुन तसे निरिक्षण सुरु करावे अशा सूचना जिल्हाधिकारी महेश आव्हाड यांनी आज येथे दिल्या.
प्रसूती पूर्व गर्भजल लिंग तपासणीस प्रतिबंध कायदा (पीसीपीएनडीटी) कार्यबलाची मासिक आढावा बैठक आज जिल्हाधिकारी यांच्या कक्षात आयोजित केली होती त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रमोद खंडाते , सदस्य जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत दैठणकर , डॉ. अरुण शेंद्रे आदिंची प्रमुख उपस्थिती होती.
काही तालुक्यात मुलींच्या जन्माचे प्रमाण कमी होणं ही धोक्याची घंटा आहे. याची जाणीव ठेवून सर्वांनी यासाठी वेळीच प्रतिबंधात्मक पावले उचलली पाहिजेत असेही आव्हाड म्हणाले.
कायद्यातील दंडात्मक बाजू यात असली तरी ही सामाजिक समस्या देखील असल्याने यावर विविध ठिकाणी होणाऱ्या कार्यक्रमात अधिकारी तसेच स्वयंसेवी संस्था तसेच समाजातील अग्रणी लोकांनी प्रबोधन करावे.
जिल्हयातील सर्व गर्भपात केंद्राची नियमीत तपासणी आणि गरज पडल्यास कारवाई आवश्यक आहे. असे सांगून आव्हाड म्हणाले की, याबाबत नागरिकांनीही पुढाकार घेऊन कुठे काही घडत असेल तर त्यांनी त्याबाबत जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयास माहिती द्यावी. माहिती देणाऱ्याचे नाव गुप्त ठेवले जाईल. याप्रकारची माहिती जरुर द्या असेही आवाहन त्यांनी जनतेला केले आहे.
Post a Comment