राज्यात पुढील तीन वर्षात ५० कोटी झाडं लावण्यात येणार असून पुढील तीन महिन्यात गाव तिथे रोपवाटिका निर्माण करण्यात येतील तसेच या रोपवाटिकांमध्ये रोपं तयार करण्यासाठी आवश्यक असलेला निधी जिल्हा नियोजन समितीमार्फत उपलब्ध करून दिला जाईल असे प्रतिपादन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.
वनमहोत्सवाचे औचत्य साधून राज्यात दि. १ जुलै २०१६ रोजी २ कोटी वृक्ष लागवड होणार आहे. या संकल्पाची अधिक माहिती देण्यासाठी वनमंत्री यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेतली त्यावेळी ते बोलत होते.
गाव तिथं रोपवाटिका निर्माण केल्यानंतर होणाऱ्या वृक्ष लागवडीसाठी पुढील तीन वर्षात उत्तम वाढ झालेली दर्जेदार रोपं मिळू शकतील असे सांगून वनमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, वन आणि वनेतर जमीनीवर ही वृक्ष लागवड होणार असून यात लोकसहभाग महत्वाचा आहे. या संकल्पाची पहिली सुरुवात येत्या १ जुलै २०१६ रोजी होत असून राज्यात दोन कोटी वृक्ष लागवड होत आहे. यासाठी राज्यभरात ६५६७४ साईटसची निवड झाली आहे तर शासनाकडे सध्या ५ कोटी ३२ लाख ३७ हजार रोपं विविध रोपवाटिकांमधून तयार आहेत. आजच्या नोंदणी प्रमाणे वन विभागाकडे ३ कोटी ११ लाख ६६ हजार ०५७ इतक्या वृक्षांची नोंदणी झाली आहे. त्यासाठी ३ कोटी ५ लाख ५० हजार ६०४ खड्डे ही तयार आहेत.
वन विभागासह शासनाचे इतर २० विभाग या कार्यक्रमात सहभागी आहेत तसेच लोकांचा उर्त्स्फूत सहभाग ही खुप आनंददायी आणि प्रोत्साहन देणारा आहे असे सांगून वनमंत्री म्हणाले की, लोक अगदी आनंदाने या कामात सहभागी होत आहेत. त्यांच्यासाठी वन विभागाने “सेल्फी विथ ट्री” सारखी अनोखी कल्पना राबविली आहे. दि.१ जुलै २०१६ रोजी लावलेल्या वृक्षासोबतचे आपले छायाचित्र त्यांनी वन विभागाने उपलब्ध करून दिलेल्या selfiewithtree@outlook.com, selfiewithtree@hotmail.com, selfiewithtree@mahaforest.gov.in , www.mahaforest.gov.in/selfiewithtree.php या लिंकवर अपलोड करावयाचे आहेत किंवा मेल करायचे आहेत. यात लकी ड्रॉ मध्ये निवड होणाऱ्या विजेत्यांना व्याघ्र प्रकल्पात प्रवेश शुल्क न भरता पर्यटनाचा आनंद घेता येईल शिवाय जागतिक व्याघ्र दिनी होणाऱ्या कार्यक्रमात बक्षीस देखील दिले जाईल.
वृक्ष लावण्याबरोबर वृक्ष जगवण्याच्या कामाला विभागाने प्राधान्य दिले असून वन विभाग लावत असलेल्या दीड कोटी झाडांचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी रोजगार हमी योजनेअंतर्गत १००० झाडांमागे एका कुटुंबाला रोजगार उपलब्ध करून दिला जाईल. उर्वरित ५० लाख रोपं जी इतर शासकीय विभाग व लोकसहभागातून लावली जाणार आहेत ती जगवण्यासाठी संबंधित विभागाने जबाबदारी स्वीकारून काम करावे अशा सूचना ही त्यांना देण्यात आल्या आहेत. लोकांमध्ये आता वृक्ष संवर्धनाची जाणीव निर्माण झाली असल्याचे सांगतांना त्यांनी वृक्षतोडीसंदर्भातील कायद्यात सुधारणा करण्यासाठी समिती स्थापना करण्यात आल्याची माहिती दिली.
राज्यातील ८९ हजार शाळांमधून १० लाख हरित सेना निर्माण करण्याचा विभागाचा प्रयत्न आहे. ट्री क्रेडिट सारख्या संकल्पनेवर विभाग काम करत आहे. वृक्ष लागवडीचा हा उपक्रम शासकीय न राहता ती लोकचळवळ व्हावी यादृष्टीने विभागाने केलेल्या प्रयत्नांना खुप चांगला प्रतिसाद मिळत आहे. पुढील तीन वर्षाच्या ५० कोटी वृक्ष लागवडीचे नियोजन सुरु करण्यात आले असून पुढील वर्ष त्यासाठीचे मिशन वर्ष असेल असेही ते म्हणाले. दि. १ जुलै २०१६ रोजीच्या वृक्ष लागवडीच्या कार्यक्रमात सर्व शासकीय विभाग सहभागी होणार असल्याने त्यांचा त्या दिवशीचा दुपारी एक वाजेपर्यंतचा वेळ शासकीय कामकाजाचा भाग समजण्यात येईल असेही ते म्हणाले. यासाठी त्यांनी वृक्षारोपणाच्या कार्यक्रमात सहभागी होतांना इतरांना सहकार्य करणे अपेक्षित असून लावलेल्या वृक्षासोबतचा त्यांचा फोटो कार्यालयात दाखवणे आवश्यक राहणार आहे. राज्यात होणाऱ्या वृक्ष लागवडीचा मुख्य कार्यक्रम माहिम येथील निसर्ग उद्यानात होणार आहे. या कार्यक्रमात मान्यवरांसह ३५०० शालेय विद्यार्थी सहभागी होणार असून एकाच वेळी ५ हेक्टरवर वृक्षारोपण होईल, आपण सर्वांनी वृक्ष लागवडीच्या कार्यक्रमात सहभागी व्हावं आणि हा संकल्प यशस्वी करावा असं आवाहन केलं.
Thursday, June 30, 2016
तीन वर्षात ५० कोटी झाडं लावणार, गाव तिथं रोपवाटिकेसाठी निधी देणार - सुधीर मुनगंटीवार
Posted by vidarbha on 3:20:00 PM in | Comments : 0
Subscribe to:
Post Comments
(
Atom
)
Post a Comment