BREAKING NEWS

Wednesday, June 15, 2016

गोवा येथे होणार्‍या ' पंचम अखिल भारतीय हिंदु अधिवेशना'च्या निमित्त पुणे येथे घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेच्या वेळी झालेली प्रश्‍नोत्तरे - हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र राज्य संघटक श्री. सुनील घनवट यांनी दिलेली उत्तरे

 
 
 
 
प्रश्‍न : आतापर्यंत झालेल्या अधिवेशनांचा समाजाला थेट असा काय लाभ झाला आहे ? 
उत्तर : हिंदु अधिवेशनांच्या माध्यमातून देशभरातील हिंदूंचे प्रभावी संघटन उभे रहात असून संघटित झालेल्या हिंदुत्वनिष्ठांकडून हिंदूंवर होणार्‍या आघातांच्या विरोधात स्थानिक ठिकाणी आंदोलने, सभा आदी माध्यमांतून आवाज उठवला जात आहे. या अधिवेशनांची फलनिष्पत्ती म्हणजे हिंदू त्यांच्यावर होणार्‍या आघातांविषयी जागृत होऊ लागले आहेत. ठिकठिकाणी हिंदु धर्मजागृती सभा घेतल्या जात आहेत. अधिवेशनांमुळेच गोवंश हत्याबंदी कायदा महाराष्ट्रात लागू झाला. बांगलादेशातील हिंदूंवर होणार्‍या अन्यायाच्या संदर्भात जेव्हा राष्ट्रीय हिंदू आंदोलनांच्या माध्यमातून आवाज उठवण्यात आला, त्या वेळी बांगलादेशातील राजदूतांनी याची नोंद घेऊन हिंदूंच्या भावना तेथील शासनाला कळवल्या. लव्ह जिहादकडे पूर्वी केवळ प्रेमप्रकरण म्हणून पाहिले जात होते. अधिवेशनांच्या माध्यमातून झालेल्या जागृतीमुळे 'लव्ह जिहाद'कडे आता 'हिंदु धर्माच्या विरोधातील षड्यंत्र' म्हणून पाहिले जाऊ लागले. कृतीशील झालेल्या हिंदूंमुळे पांडववाडा (जि. जळगाव) सर्वसामान्यांसाठी खुला झाला. राष्ट्र आणि धर्म यांच्या संदर्भात झालेली जागृती म्हणजे सर्वसामान्य हिंदूंना झालेला लाभच आहे. 

प्रश्‍न : भाजप शासन हिंदुत्वासाठी कार्य करत नाही, असा आपला आरोप आहे का ?
उत्तर : भाजप हिंदूंसाठी काही करते कि नाही, हा प्रश्‍न भाजपलाच विचारला पाहिजे. भाजप शासन २ वर्षे सत्तेत असूनही हिंदूंच्या अपेक्षा अद्यापही पूर्ण झालेल्या दिसत नाहीत. काश्मिरी हिंदूंचे पुनर्वसन झालेले नाही, कलम ३७० रहित झालेले नाही. कोट्यवधी हिंदूंची आस्था असलेला राममंदिराच्या पुनर्निर्माणाचा प्रश्‍न प्रलंबित आहे. भाजपने 'संपूर्ण देशात गोवंशहत्या बंदी कायदा लागू करू आणि गोमांस निर्यातीवर बंदी आणू', असे आश्‍वासन दिले होते; मात्र भाजपच्याच काळात 'गुलाबी क्रांती'द्वारे मांसनिर्यातीत १५ टक्के वाढ होऊन त्यात भारत अव्वल क्रमांकावर आहे. भाजपने देशातील साडेचार कोटी बांगलादेशी घुसखोरांना हाकलून देण्याचे आश्‍वासन दिले होते; पण एकही बांगलादेशी घुसखोर अजून देशाबाहेर गेलेला नाही; उलट त्यांच्या संख्येत वाढच होत आहे. त्यामुळे दुर्दैवाने असे म्हणावे लागत आहे की, ज्या हिंदूंच्या आणि हिंदुत्ववादी संघटनांच्या अपेक्षा होत्या, त्या आजही पूर्ण झालेल्या नाहीत. 
प्रश्‍न : अशोक चव्हाण यांनी सनातनवर बंदी घालण्याची मागणी केली. त्या संदर्भात तुमचे काय म्हणणे आहे ? 
उत्तर : ज्या अशोक चव्हाणांचे आदर्श घोटाळ्यामध्ये नाव आहे, त्यांनी सनातनवर बंदीची मागणी करणे, हेच मुळात हास्यास्पद आहे. मृताच्या टाळूवरील लोणी खाणार्‍यांना अशी मागणी करण्याचा नैतिक अधिकार उरत नाही. ज्या काँग्रेसच्या काळात सहस्रावधी शिखांचे शिरकाण झाले, सहस्रावधी शेतकर्‍यांनी आत्महत्या, दीड लाखांहून काश्मिरी हिंदूंचा वंशविच्छेद झाला, ते कशाच्या आधारावर बंदीची मागणी करत आहेत ? काँग्रेसचे शासन असतांनाही ते सनातनवर बंदी घालू शकले नाहीत; कारण तसे पुरावेच त्यांच्याकडे नव्हते. 
प्रश्‍न : हिंदु राष्ट्राच्या स्थापनेची मागणी करणे लोकशाहीविरोधी नाही का ? हे दिवास्वप्न नाही का ? 
उत्तर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी राज्यघटना लिहिली, तेव्हा भारत धर्मनिरपेक्ष नव्हता. वर्ष १९७६ मध्ये ४२व्या घटनादुरुस्तीद्वारे राज्यघटनेत 'धर्मनिरपेक्षता' हा शब्द घुसडण्यात आला. मग 'वर्ष १९७६च्या पूर्वी धर्मनिरपेक्षतेची मागणीसुद्धा लोकशाहीविरोधी होती', असे म्हणणार का ? राज्यघटनेत आतापर्यंत अनुमाने १०० दुरुस्त्या झाल्या आहेत. मग घटनादुरुस्ती करून भारत 'हिंदु राष्ट्र' का होऊ शकत नाही ? हिंदु राष्ट्राची मागणी करणे लोकशाहीविरोधी नसून हा संविधानानेच दिलेला अधिकार आहे. त्यामुळे हे दिवास्वप्न नाही. वर्षे २०२३ मध्ये हिंदु राष्ट्राची स्थापना होईल, असा आम्हाला विश्‍वास आहे. घटनेनेच दिलेल्या अधिकारानुसार आम्ही हिंदु राष्ट्राचा प्रसार, प्रचार करतो. हे कोणत्याही दृष्टीने संविधानविरोधी नाही. 
प्रश्‍न : हिंदु राष्ट्रात अन्य धर्मियांचे काय होणार ? त्यांना तुम्ही हाकलणार कि त्यांचे धर्मांतर करणार ? 
उत्तर : प्रश्‍न चांगला आहे; पण हा प्रश्‍न अन्य धर्मियांना पडत नाही; पण हिंदु बांधवांना पडतो. आज विश्‍वभरात ख्रिस्त्यांची १५७ हून अधिक राष्ट्रे आहेत. ५२ इस्लामी राष्ट्रे आहेत. ११ बौद्ध राष्ट्र आहेत, तर इस्रायल हे ज्यूंचे स्वतंत्र राष्ट्र आहे. मग १०० कोटींहून अधिक हिंदू असणार्‍या हिंदूंचे 'हिंदु राष्ट्र' का असू नये ? हिंदूंना भारतातून हाकलून दिले, तर हिंदु कुठे जाणार ? पाकिस्तान, बांगलादेश, इराक, इराण ही मुस्लिम राष्ट्रे होऊ शकतात. अमेरिका, ऑस्ट्रेलिया ही ख्रिस्ती राष्ट्रे होऊ शकतात, तर हिंदूंचे 'हिंदु राष्ट्र' का होऊ शकत नाही ? ज्याप्रमाणे सध्या इस्लामी राष्ट्रांमध्ये अनेक हिंदू नोकरीनिमित्त जातात, रहातात. ते तिकडे जाऊ शकतात, तर हिंदु राष्ट्रात अन्य धर्मीय नाही राहू शकत ? रावणाच्या काळीही बिभीषण होताच; पण तो रामाच्या बाजूने लढला. जे बिभीषण असतील, ते हिंदु राष्ट्रात रहातील. हिंदु राष्ट्र हे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या हिंदवी स्वराज्याप्रमाणे असेल. हे हिंदु राष्ट्र राष्ट्र प्रेमी, धर्म प्रेमी आणि सत्त्वगुणी लोकांचे राष्ट्र असणार आहे. यामध्ये कुणाचेही फाजील लाड केले जाणार नाहीत. हिंदु राष्ट्रात कुणावरही अन्याय होणार नाही. सर्व नागरिकांना समान नियम असतील. 
प्रश्‍न : हिंदु राष्ट्राची घटना लिहित आहात का ? 
उत्तर : हिंदु राष्ट्राची घटना काळाच्या ओघात सिद्ध होईल. आम्ही आमचा प्रश्‍न जनसंसदेमध्ये मांडून लोकांना संघटित करणार आहोत.

Share this:

Post a Comment

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.