BREAKING NEWS

Monday, June 13, 2016

भारतवर्ष हे हिंदु राष्ट्र म्हणून उद्घोषित व्हावे यासाठी १९ ते २५ जून या कालावधीत गोवा येथे पंचम अखिल भारतीय हिंदू अधिवेशन

 
 
हिंदु राष्ट्र ! स्वातंत्र्यवीर सावरकरांना वाटणारे हे भक्कम सत्य स्वातंत्र्यानंतर मात्र विस्मरणात गेलेला शब्द बनला ! स्वातंत्र्यप्राप्तीनंतर स्वयंभू हिंदु राष्ट्र असलेले भारतवर्ष हे धर्मनिरपेक्ष राष्ट्र बनले. परिणामी जगात ख्रिस्त्यांची १५७, मुसलमानांची ५२, बौद्धांची १२, तर ज्यूंचे १ राष्ट्र असले, तरी हिंदूंचे एकही मानाचे राष्ट्र या विश्‍वमंडळात नाही. त्यामुळेच हिंदु संस्कृती आणि सनातन धर्म यांचा वारसा सांगणारे आणि जपणारे भारतवर्ष हे हिंदु राष्ट्र म्हणून उद्घोषित व्हावे, या निखळ हेतूने गोवा येथे गेली ४ वर्षे अखिल भारतीय हिंदू अधिवेशन आयोजित केले जात आहे. भारताच्या प्रत्येक राज्यात कार्यरत लहान-मोठ्या हिंदूंच्या संघटना आणि हिंदु धर्मातील संप्रदाय यांचे प्रतिनिधी या अधिवेशनाला उपस्थित असतात. १९ ते २५ जून २०१६ या कालावधीत रामनाथी, गोवा येथे सात दिवसीय पंचम अखिल भारतीय हिंदू अधिवेशन पार पडणार आहे. 
 
देश-विदेशातील हिंदु संघटना, संप्रदाय, संस्था यांचे संघटन करणारे हिंदू अधिवेशन ! 
 
     वर्ष २०१२ ते २०१५ या कालावधीत झालेल्या प्रथम, द्वितीय, तृतीय आणि चतुर्थ अखिल भारतीय हिंदू अधिवेशनांत हिंदु राष्ट्राच्या स्थापनेच्या हेतूने भारताच्या कानाकोपर्‍यांतून हिंदुत्वनिष्ठांनी एकत्रित येणे, हे अत्यंत आश्‍चर्यकारक आणि एखाद्या चमत्कारापेक्षा वेगळे नव्हतेे ! या अधिवेशनांचे वैशिष्ट्य म्हणजे नेपाळ, श्रीलंका, मलेशिया, बांगलादेश येथूनही हिंदुत्ववादी संघटनांचे प्रतिनिधी यात सहभागी झाले. पंचम अखिल भारतीय हिंदू अधिवेशनासाठी प्रतीवर्षीप्रमाणे हिंदु संघटनांच्या प्रतिनिधींचा वाढता प्रतिसाद लाभत आहे. हिंदु संघटनांचा हा वाढता प्रतिसाद, ही अधिवेशनाची खरी फलनिष्पत्ती आहे.
     अखिल भारतीय हिंदू अधिवेशन म्हणजे हौशागौशांचे संमेलन नाही, तर हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी भारतभरातून आलेले हिंदु राष्ट्रप्रेमींचे एकत्रीकरण आहे. साधारणतः लौकिकार्थाने विविध विषयांवरील संमेलने ही हौशी रसिकवर्गासाठी असतात. विविध विषयांवर होणार्‍या परिषदा या त्या क्षेत्राशी संबंधित तज्ञ किंवा कार्यकर्ते यांसाठी असतात. अधिवेशन हे मात्र विशिष्ट व्यक्तीद्वारे वा संघटनेद्वारे नियुक्त प्रतिनिधींचे असते. संसदीय अधिवेशन हे लोकनियुक्त प्रतिनिधींचे अर्थात खासदारांचे असते. अखिल भारतीय हिंदू अधिवेशन हेही संघटना आणि संप्रदाय नियुक्त प्रतिनिधींचे आहे. भारतभरात कार्यरत असणार्‍या हिंदू संघटनांना या अधिवेशनाचे आमंत्रण असते. विविध संतांनी लोककल्याणार्थ आणि आध्यात्मिक कार्याच्या हेतूने स्थापलेल्या संस्थांचेही १-२ प्रतिनिधी अखिल भारतीय हिंदू अधिवेशनाला आवर्जून उपस्थित रहतात, हे येथे नमूद करावेसे वाटते.

हिंदु संघटनांसाठी हिंदू अधिवेशन ठरले दिशादर्शक ! 
 
     पंचम अखिल भारतीय हिंदू अधिवेशनाला हिंदु संघटनांच्या वाढत्या सहभागामागील कारणेही तशी महत्त्वाची आहेत. आज अनेक हिंदु संघटनांना कार्य करण्याची इच्छा आहे; मात्र त्यांच्याकडे दिशा नाही. काही संघटनांकडे दिशा आहे; मात्र मनुष्यबळाचा अभाव आहे. काही हिंदु संघटनांकडे कार्यकर्ते आहेत; मात्र त्यांच्याकडून लोकाभिमुख कार्य होत नाही. काही संघटनांकडे उत्तम व्यवस्थापनकौशल्य नाही. अशा सर्व संघटना एका व्यासपिठावर आल्याने विचारांचे आणि अनुभवांचे आदानप्रदान होते. गोहत्या रोखणे, धर्मांतर रोखणे, संस्कृतीरक्षण, मंदिरपरंपरा रक्षण आणि संवर्धन अशा हिंदू संघटनांच्या पारंपरिक चळवळी अधिक प्रभावीपणे कशा राबवता येतील, याविषयी विचारमंथन होते. या विचारमंथनातून आपल्या भागात कार्य करण्याची नवी प्रेरणा आणि दिशा मिळते. अधिवेशनाच्या निमित्ताने विविध राज्यांतील हिंदुत्ववादी संघटनांचे प्रमुख पाच-सात दिवस एकत्र राहिल्याने परस्परांमध्ये जवळीक निर्माण होते. प्रत्येक संघटना जेथे थांबली असते, तेथे तिला चालना मिळून ती पुढे जाते. संघटना पुढे जाते, याचा अर्थ हिंदुत्वाच्या कार्यालाच गती मिळते. आज जरी या अधिवेशनाचे लाभ संघटनात्मक पातळीवर जास्त दिसून येत असले, तरी भविष्यातील संकटकाळात हिंदु समाजालाही याचा लाभ नक्कीच जाणवेल. उत्तराखंड येथील आपत्तीत अ.भा. हिंदू अधिवेशनाने सर्व राज्यांच्या समन्वयातून केलेले साहाय्य, हा त्याचा पुरावा आहे.

अधिवेशनांची फलश्रुती !
१. अखिल भारतीय हिंदू अधिवेशनांमुळे हिंदूसंघटनाचे व्यापक कार्य करण्यासाठी मिळालेली दिशा ! 
 
      चतुर्थ अ.भा. हिंदू अधिवेशनात हिंदू संघटनांनी एकत्र कार्य करण्यासाठी आखलेले समान कृती कार्यक्रम हे त्यांना पुढील कार्यासाठी गती आणि उत्साह देणारे ठरले. गोरक्षण, मंदिररक्षण, हिंदूरक्षण आदी हिंदूंच्या समस्यांवर प्रत्येक संघटना स्वक्षमतेनुसार संघर्ष करत असते. अखिल भारतीय हिंदू अधिवेशनामुळे या सर्व संघटना एका धाग्यात विणल्या गेल्यामुळे व्यापक दृष्टीकोन ठेवून संघशक्तीने राष्ट्रव्यापी कार्य करण्यास आरंभ झाला आहे. प्रत्येक हिंदुत्ववादी संघटना वेगवेगळे ध्येय डोळ्यांसमोर ठेवून कार्यरत असल्याने त्यांच्यात एकत्र येण्यासाठी आवश्यक समान ध्येयाचे अंतर हिंदू अधिवेशनाने पूर्ण केले. हे ध्येय म्हणजे हिंदु राष्ट्राची स्थापना ! या ध्येयाच्या प्रसारार्थ हिंदुत्ववादी संघटनांनी या वर्षी आपल्या कार्यक्षेत्रातील हिंदु संघटनांना एकत्र करून प्रांतीय हिंदू अधिवेशनांचे आयोजन केले.
     ६ राज्यांत ३० ठिकाणी प्रांतीय हिंदू अधिवेशनांचे यशस्वी आयोजन करण्यात आले. द्वितीय अ.भा. हिंदू अधिवेशनाने हिंदूंवरील समस्यांच्या विरोधात देशभरातील सर्व हिंदु संघटनांना महिन्यातून एकदा एकाच दिवशी रस्त्यावर येण्याची प्रेरणा दिली. त्यातून राष्ट्र अन् धर्म यांवर होणार्‍या आघातांविरुद्ध प्रतिमाह १० राज्यांत ५० ठिकाणी राष्ट्रीय हिंदू आंदोलन उभे राहिले. एकाच दिवशी, म्हणजे प्रत्येक महिन्याच्या पहिल्या रविवारी भारतभरात सर्वत्र सर्व हिंदूसंघटनांनी संघटितपणे एकाच राष्ट्रव्यापी समस्येवर आंदोलन करणे, असा हा उपक्रम आहे.

२. गुढीपाडव्याच्या शुभमुहुर्तावर हिंदु जनजागृती समितीच्या 
 
रणरागिणी शाखेकडून धर्मपरंपरा रक्षण चळवळीस प्रारंभ ! 
 
     हिंदु जनजागृती समितीप्रणित रणरागिणी या महिला शाखेचे कार्य गेली ७ वर्षेे चालू आहे. सध्या महिला अधिकारांच्या (हक्कांच्या) नावाखाली हिंदु धर्मातील प्राचीन परंपरा, धर्मशास्त्र आदींवर आघात करण्याच्या प्रकारांमध्ये वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. श्रीक्षेत्र शनिशिंगणापूर, श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्‍वर आणि कोल्हापूर येथील श्री महालक्ष्मी देवस्थान येथील शेकडो वर्षांच्या परंपरा मोडून समानतेच्या नावाखाली महिलांना चौथर्‍यावर अथवा गर्भगृहात प्रवेश देण्यात यावा, यासाठी आंदोलने केली जात आहेत. यामुळेच हिंदु जनजागृती समितीप्रणित रणरागिणी शाखेने या दुष्प्रवृत्तींना रोखण्यासाठी आणि धर्मपरंपरांचे रक्षण करण्यासाठी गुढीपाडव्याच्या शुभमुहुर्तावर कोल्हापूर येथील श्री महालक्ष्मीदेेवीच्या आशीर्वादाने धर्मपरंपरा रक्षण चळवळीस शुभारंभ केला आहे. या अंतर्गत १३ एप्रिल या दिवशी भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांना कोल्हापूर येथील श्री महालक्ष्मी मंदिरातील गाभार्‍यात घुसण्यास महिलांचे संघटन करून विरोध करण्यात आला.

३. रणरागिणी शाखेच्या महाराष्ट्र संघटक कु. प्रतीक्षा कोरगावकर यांना मिळालेला भगिनी पुरस्कार 
 
     हिंदु धर्माच्या उत्कृष्ट महिला धर्मप्रसारक म्हणून रणरागिणी शाखेच्या महाराष्ट्र राज्यसंघटक कु. प्रतीक्षा कोरगावकर यांना २४ एप्रिल २०१६ या दिवशी कोल्हापूर येथे भगिनी मंचद्वारे आयोजित भगिनी महोत्सव सोहळ्यात गौरवण्यात आले. रोख रक्कम ११ सहस्र रुपये आणि सन्मानचिन्ह, असे या पुरस्काराचे स्वरूप होते.

४. हिंदु विधीज्ञ परिषदेचे भरीव कार्य ! 
 
     अ.भा. हिंदू अधिवेशनातून हिंदु धर्म आणि धर्मीय यांच्या रक्षणासाठी कार्यान्वित झालेली हिंदु विधीज्ञ परिषद तर सर्वत्रच्या हिंदु संघटनांसाठी एक आधार ठरली आहे.
अ. पंढरपूर येथील शासन-नियंत्रित श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीकृत घोटाळे उघड केले, तसेच देवस्थानची हडपली गेलेली ३५० एकर भूमी परत मिळवून दिली !
आ. ३,०६७ देवळे कह्यात (ताब्यात) असणार्‍या पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचा भ्रष्टाचार उघड केला. त्यामुळे निर्माण झालेल्या जनआंदोलनामुळे शासनाला या प्रकरणाची सीआयडी चौकशी चालू करावी लागली !
इ. शासन-नियंत्रित श्री तुळजापूर मंदिर संस्थानचे विविध घोटाळे अन् चौकशी समितीचा दाबलेला अहवाल उघड केला, तसेच दोषींना शिक्षा होण्यासाठी याचिका प्रविष्ट केली !
ई. अवैधपणे विदेशी निधी जमवून हिंदु धर्माविरुद्ध कार्य करणार्‍या महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा आर्थिक गैरव्यवहार उघडकीस आणला ! तसेच त्यांना धर्मद्रोही मूर्तीदान चळवळीसाठी राष्ट्रीय सेवा योजनेचे (एन्.एस्.एस्.चे) विद्यार्थी वापरण्यास प्रतिबंध केला !
     तसेच हिंदु विधीज्ञ परिषदेकडून मिळत असलेले विनामूल्य कायदेशीर मार्गदर्शन आणि साहाय्य अनेक हिंदुत्वनिष्ठांना अन्यायाच्या विरोधात लढण्यासाठी बळ देत आहे. मुंबईतील आझाद मैदानावर झालेल्या दंगलीप्रकरणी रझा अकादमीकडून हानीभरपाई वसूल करण्याचा न्यायालयाने दिलेला आदेश, अवैध मशिदी पाडण्यासाठी परिषद मुंबई उच्च न्यायालयामध्ये चालवली जात असलेली विनामूल्य याचिका, हे हिंदु विधीज्ञ परिषदेच्या आतापर्यंतच्या भरीव कार्याचे काही दाखले आहेत.

आतंकवादाच्या विरोधातील जनआंदोलन इंडिया अगेन्स्ट इस्लामिक स्टेट ! 
 
     अखिल भारतीय हिंदु अधिवेशनात सहभागी होणार्‍या १८ देशभक्त हिंदु संघटनांनी एकत्रित येऊन चालू केलेले इंडिया अगेन्स्ट इस्लामिक स्टेट हे अभियान आता राज्याराज्यांत पसरू लागले आहे. चतुर्थ अ.भा. हिंदु अधिवेशनात या अभियानाची संकेतस्थळ लोकार्पण करण्यात आले होते. ज्याप्रमाणे समाजसेवक अण्णा हजारे यांनी इंडिया अगेन्स्ट करप्शन या अभियानाद्वारे भ्रष्टाचारविरोधी जनआंदोलन उभे केले होते, त्याप्रमाणे इंडिया अगेन्स्ट इस्लामिक स्टेट हे अभियान आतंकवादाच्या विरोधात जनआंदोलन उभे करील. या अभियानात अनेक देशभक्त युवक जोडले जात आहेत.

पंचम अखिल भारतीय हिंदू अधिवेशन आणि हिंदूंचा सहभाग ! 
 
     जगात सर्वत्र अल्पसंख्यांकांची संमेलने होतात. भारतात मात्र बहुसंख्यांकांचे अधिवेशन घ्यावे लागत आहे, याचा विचार होणे आवश्यक आहे. आज जगातील सर्व राष्ट्रे प्राधान्याने बहुसंख्यांकांचे हित जपत असतांना अल्पसंख्यांकांवर अन्याय होणार नाही, याची विशिष्ट चौकटीत राहून दक्षता घेतात. भारतात मात्र बहुसंख्यांकांच्या हिताकडे लक्ष देणे लांबच; मात्र अल्पसंख्यांकांच्या हिताच्या नावाखाली बहुसंख्यांकांवर अन्याय आणि काही वेळा अत्याचारही केले जातात. बहुसंख्यांकांमध्ये फूट पाडून स्वतःचा राजकीय स्वार्थ साधला जातो. त्यामुळेच बहुसंख्यांक हिंदूंच्या हितासाठी अधिवेशन घ्यावे लागत आहे. बहुसंख्यांक हिंदूंचे प्रतिनिधित्व करणार्‍या हिंदुत्ववादी संघटना आणि संप्रदाय यांना हिंदूंच्या रक्षणासाठी कृतीप्रवण व्हावे लागत आहे. अशाच हिंदुत्ववादी संघटना आणि संप्रदाय यांचे हे अधिवेशन आहे. सर्वसामान्य हिंदूंच्या दृष्टीनेही हे अधिवेशन खूप महत्त्वाचे आहे; कारण त्यांच्या समस्या, त्यांच्या मनातील उद्रेक या अधिवेशनात मांडला जाणार आहे. इतकेच नव्हे, तर या समस्यांवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठीही हे अधिवेशन कटिबद्ध रहाणार आहे.
     तात्पर्य, अ.भा. हिंदू अधिवेशन हे केवळ हिंदु राष्ट्र स्थापनेचा यज्ञकुंड नाही, तर हिंदूहिताचे मंथन करणारे व्यासपीठ आहे. या अधिवेशनांची ही शृंखला भविष्यातील एका नव्या इतिहासाला निश्‍चित वळण देईल. 

Share this:

Post a Comment

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.