BREAKING NEWS

Sunday, June 26, 2016

ताडोबातील धक्कादायक घटना, जिथली वाळली काडी उचलता येत नाही त्या भागात अवैध सागवान वृक्षतोड, २० हून अधिक सागवान वृक्षांची तोड, तस्करीचा प्रयत्न , ताडोबा प्रशासन हादरले, ग्रामस्थांनी केली उच्चस्तरीय चौकशीची मागणी

◆● ताडोबा / चंद्रपूर /-- प्रवीण गोंगले  ◆●    ----- राज्यात वृक्ष लावा आणि जगवा असा संदेश देत राज्याचे  वनमंत्री गल्ली ते दिल्ली जनजागृती करत असताना त्यांच्या प्रयत्नांवर पाणी फिरवण्याचे काम चक्क जगप्रसिद्ध ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या  गाभा ( कोअर ) क्षेत्रात उघडकीस आले आहे. ताडोबाच्या जंगलातील पळसगाव गावालगत वनकर्मचा-यांनी अवैध सागवान तोड आणि तस्करी चालविली असल्याचा आरोप ग्रामस्थानी केला आहे. या जंगलात २० हून अधिक सागवान वृक्ष कापले गेले असून घटनेने वनविभाग हादरला आहे.

ताडोबा म्हणजे पट्टेदार वाघ. जगभरातील वन्यजीवप्रेमींचे आवडते डेस्टिनेशन. पट्टेदार वाघ आणि हजारो वन्यजीव प्रजातींच्या संरक्षणासाठी वनविभागाने शेकडो कायदे निर्माण करत जंगलाशेजारी राहणा-या ग्रामस्थांना जंगलात जाण्यापासून परावृत्त केले आहे. परिणामी उत्तम नैसर्गिक अधिवास तयार झाल्याने या जंगलात वाघांची संख्या लक्षणीयरित्या वाढली आहे. मात्र हे सुखद चित्र वरवरचे असल्याचे धक्कादायक वास्तव पुढे आले आहे. या जंगलातील पळसगाव गावालगत कक्ष क्र. १३१ मध्ये चक्क अवैध सागवान वृक्षतोड झाली असल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली आहे. १५ जून रोजी रात्री उशिरा ही तोड झाली असून गावालगतच्या तलावाजवळ अवैध तोडीचे हे सागवान गुपचूपरित्या साठवून ठेवल्याचे ग्रामस्थांनी वनाधिका-यांच्या नजरेस आणून दिले. गावातील एक व्यक्ती यात सहभागी असल्याची सूचना ग्रामस्थांनी वनाधिका-यांना दिली. टाळाटाळ करत अखेर अधिका-यांनी या व्यक्तीच्या घरी धाड घालून सागवान पाट्या देखील जप्त केल्या. या व्यक्तीला अटक देखील केली मात्र दुस-या दिवशी लगेच जामिनावर त्याची मुक्तता केली. या एवढ्या कारवाईनंतर वनविभाग आश्चर्यकारकरीत्या मौन झाला आहे. अत्यंत कडक नियमांच्या आड वनाधिकारी 'सैराट' तर झाले नाही ना असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला आहे. चंद्रपूर असो अथवा राज्यातील अन्य कुठलाही व्याघ्र प्रकल्प उन्हाळ्याच्या सुरुवातीला वन वणव्याचे नियंत्रण करण्यासाठी 'वनविकास महामंडळाच्या' चमू व्याघ्र प्रकल्पात ठराविक काळासाठी तैनात केल्या जातात. यातील काही महामंडळ कर्मचा-यांनी ताडोबातील अधिकारी-कर्मचा-यांना हाताशी धरून अवैध सागवान वृक्ष तोड चालविली असल्याचे ग्रामस्थांचे मत आहे. बैलगाडीच्या सहाय्याने सागवान बाहेर काढायचे आणि रात्रीच्या अंधारात वणवा निरीक्षणाच्या वाहनातून सागवान ताडोबातून साळसूद बाहेर आणायचे असा हा प्रकार किती काळापासून सुरू आहे यावरही जय कुळमेथे - अध्यक्ष , वनसमिती , पळसगाव ( ताडोबा गाभा क्षेत्र ) ललिता मडावी - सदस्य , वनसमिती , पळसगाव ( ताडोबा गाभा क्षेत्र ) पुंडलिक मसराम - सदस्य, वनसमिती , पळसगाव ( ताडोबा गाभा क्षेत्र ) या ग्रामस्थांनी सवाल उपस्थित केला आहे.
www.vidarbha24news.com
ताडोबाच काय राज्यातील जंगलातील एखादी काडी किंवा बांबू जरी गावक-याने तोडून आणला तर त्याच बांबूने त्याला फटके मारणारा वनविभाग आता चक्क ताडोबाच्या गाभा क्षेत्रातील या तोडीचे गुन्हा कुणावर नोंदविणार असा प्रश्न उपस्थित झाला आहे. राष्ट्रीय व्याघ्र संरक्षण प्राधिकरण अर्थात NTCA , राज्य आणि राष्ट्रीय वनविभाग यांनी वेळोवेळी घालून दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार व्याघ्र प्रकल्पात नवे झाड लावता अथवा तुटलेले झाड उचलण्याची देखील परवानगी नाही. या जंगलातील नैसर्गिकता जपण्यासाठी हे उपाय योजण्यात आले आहेत. एखादा कागदाचा कपटा अथवा प्लास्टिक फेकणा-यावरही वनाधिकारी कारवाई करतात. अशात पळसगाव येथील सागवान वृक्षतोड, ग्रामस्थांनी केलेली तक्रार आणि त्याकडे झालेले दुर्लक्ष कुणाला वाचविण्याचा प्रयत्न आहे का अशी चर्चा ललिता मडावी - सदस्य , वनसमिती , पळसगाव ( ताडोबा गाभा क्षेत्र ) पुंडलिक मसराम - सदस्य, वनसमिती , पळसगाव ( ताडोबा गाभा क्षेत्र ) आदी ग्रामस्थ करत आहेत. दरम्यांन ताडोबाचे प्रमुख असलेले अधिकारी अशी घटना घडलीच नसल्याचा ठाम दावा  प्रारंभी करत होते. मात्र घटनेचा तपशील दिल्यावर मात्र घटना फारशी गंभीर नाही आठवडाभरात चौकशी करून बाईट देतो इथवर नरमले. येत्या १ जुलै रोजी राज्यात वनाच्छादन वाढविण्यासाठी व्यापक जनजागृती मोहीम आणि अभियान राबविले जात आहे. मात्र अतिशय संरक्षित असलेल्या ताडोबात मात्र कुंपणच शेत खात आहे की काय अशी शंका उपस्थित झाली आहे.

Share this:

Post a Comment

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.