अमरावती / मोर्शी /---
वरुड व मोर्शी तालुका हा सातपुड्याच्या कुशित वसलेला असून मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी आदिवासी बांधव राहतात. आदिवासींचा विकास व्हावा व त्यांना संपुर्ण योजनेचा लाभ मिळावा तसेच आदिवासी बांधवांची लुट करणारी टोळी तालुक्यात सक्रीय झाली असून या गोष्टीवर वचक राहण्यासाठी आदिवासी समाजातील कार्यकर्ते तयार होऊन त्यांनी आदिवासी बांधवांचे शोषण होणार नाही याची काळजी घेणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन आमदार डॉ.अनिल बोंडे यांनी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प धारणीचे, उपकार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी व्यक्त केले.
आ.डॉ.अनिल बोंडे पुढे म्हणाले कि, मोर्शी तालुक्यात आदिवासी बांधवांच्या विकासासाठी २७ कोटीचा निधी खेचून आणला असुन त्यामध्ये मोर्शी येथे आदिवासी मुलींचे वसतीगृह, अंबाडा येथे १ कोटी रुपयांचे सभागृह, धानोरा येथे आश्रम शाळेची भव्य इमारत उभी करण्यात आली आहे. पुसला व बेनोडा येथे सुद्धा १ कोटी रुपयांच्या सभागृहाचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला असून १ वर्षाच्या आत या सभागृहाची निर्मिती होणार आहे. या सभागृहाचा उपयोग आदिवासी बांधवांच्या मुलांच्या लग्नाप्रसंगासाठी व लहान – मोठ्या कार्यक्रमासाठी होणार आहे. स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसाठी १ लाख रुपयाचे पुस्तके सुद्धा उपलब्ध करून देण्यात आली. आदिवासींच्या विविध योजनेचे फॉर्म या ठिकाणी भेटले जाणार आहे व ते फॉर्म प्रकल्प कार्यालय धारणी येथे पोहचतील, व त्यांना योजनेचा लाभ मिळेल तसेच ५ ते १० पर्यंतच्या विद्यार्थ्यांना नामांकित शाळेत प्रवेश मिळवण्यासाठी सुद्धा या ठिकाणी फॉर्म उपलब्ध करण्यात आले आहे.
एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प उपकार्यालयाच्या कार्यक्रमाध्यक्षपदी सहाय्यक प्रकल्प अधिकारी शिवानंद पेठेकर प्रमुख अतिथी म्हणून डॉ.सौ.वसुधाताई बोंडे, नगरसेविका सुनिताताई कुमरे, पत्रकार अजयभाऊ पाटील, विजयभाऊ श्रींराव, अशोकभाऊ पंधरे, आदिवासी विभागाचे एस.बी.ठाकरे, मुख्यमंत्री आरोग्य समितीचे तालुकाध्यक्ष अशोकभाऊ ठाकरे यांच्यासह आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. सर्व प्रथम मोर्शी विधानसभा मतदार संघाचे आमदार डॉ.अनिल बोंडे यांचे हस्ते उपकार्यालयाच्या फलकाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी सौ.सुनिताताई कुमरे, विजयभाऊ श्रीराव, डॉ.सौ.वसुधाताई बोंडे यांनी आपले विचार व्यक्त केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक एस.बी.ठाकरे तर संचालन आदिवासी मुलांच्या वसतिगृहाचे गृहपाल गुंडो सर व आभार प्रदर्शन चव्हाण ताई यांनी केले. कार्यक्रमाला मोर्शी – वरुड तालुक्यातील आदिवासी बांधव, पाल्य, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Post a Comment