BREAKING NEWS

Wednesday, June 1, 2016

नमामी प्राधिकरण स्थापन करणार -- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

प्रवीण गोंगले /---
पंढरपूर . --- /  :-


 


चंद्रभागा नदी निर्मल, अविरत वाहती राहिली पाहिजे यासाठी नमामी प्राधिकरण स्थापन करण्यात येईल, अशी घोषणा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. 
वित्त मंत्री यांनी अर्थसंकल्पात घोषित केलेल्या व गेल्या काही दिवसापासून नियोजनबद्ध पध्द्तीने आयोजित केलेल्या नमामी चंद्रभागा अभियानासंदर्भात पंढरपूर येथे सिंहगड कॉलेज येथे आयोजित केलेल्या नमामी चंद्रभागा परिषदेत मार्गदर्शन करताना मुख्यमंत्री बोलत होते. या परिषदेस जलतज्ज्ञ राजेंद्रसिंह राणा, वित्त व नियेाजन मंत्री सुधीर मनगुंटीवार, सहकार व सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील, पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर, सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजय देशमुख, जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे, विभागीय आयुक्त एस. चोक्कलिंगम, जिल्हाधिकारी रणजीतकुमार व स्वामी रामानंद गिरी उपस्थित होते.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले नद्यांचे पावित्र्य अबाधित राखण्यासाठी राज्य शासनाने नमामी गंगेच्या धर्तीवर नमामी चंद्रभागा हे अभियान राबविण्याचे ठरविले आहे. याची सुरुवात नमामी चंद्रभागा या अभियानाने होत असून नमामी चंद्रभागा अभियान राबविताना मुळ तत्वज्ञानाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन नदी निर्मल व अविरत ठेवण्यास प्राधान्य देण्यात येत आहे. यासाठी प्राधिकरण स्थापन्यात येऊन या प्राधिकरणामार्फत मुळ आराखडा व जलतज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊन अद्यावत आराखडा तयार केला जाईल असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी सांगितले.  हे काम पूर्ण करण्यासाठी कालावधी निश्चित करुन  त्यानुसार काम करण्यात येणार  आहे. तसेच भीमा नदीच्या उगमापासून संगामापर्यंत शुध्दीकरणाची प्रक्रिया सुरु करण्यात येणार असल्याचेही त्यांनी याप्रसंगी बोलतांना सांगितले. भीमा नदीपात्रात मिळसणाऱ्या उप नद्या आणि ओढा-नाल्यांचीही दुरुस्ती करण्यास प्राधान्य दिले जाईल.
अकराव्या शतकापासून चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये वैष्णवांचा मेळा भरत आहे. वारकरी  आत्मियतने येथे येऊन चंद्रभागेचे पाणी तीर्थ म्हणून प्राशन करतो. त्यांची ही  श्रध्दा अबाधित राहण्यास आणि  चंद्रभागेला तिचे मूळ स्वरुप प्राप्त करुन देण्यास  नमामी चंद्रभागा अभियनातून मदत होणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. राज्यातील उपलब्ध पाण्याचे संवर्धन करण्याचे महत्वाचे काम राज्य शासनाने हाती घेतले असल्याचे सांगून मुख्यमंत्री म्हणाले, केवळ धरणातून पाण्याचे संवर्धन करुन न थांबता नैसर्गिक स्त्रोतांचे संवर्धन करण्यास प्राधान्य देण्यात येणार आहे.  या कार्यक्रमातून चांगला रोड मॅप तयार होऊन हे काम निश्चित कालावधीत पूर्ण होण्यास मदत होणार असल्याचेही ते म्हणाले.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी अर्थसंकल्पात चंद्रभागा शुध्दीकरणाची संकल्पाना ठेवून यासाठी तरतूद  केली. त्याची ही कल्पना सत्यात उतरविण्यासाठी आज ही परिषद आयोजित केल्याबद्दल अभिनंदन केले. आजच्या परिषदेस राजेंद्रसिह राणा उपस्थित राहीले त्यामुळे त्यांचे आभारही मुख्यमंत्र्यांनी मानले.
नमामी चंद्रभागा हा कार्यक्रम सरकारच्या माध्यमातून जनतेचा कार्यक्रम व्हावा अशी अपेक्षा अर्थमंत्री मुनगंटीवार यांनी यावेळी बोलतांना व्यक्त केली. ते म्हणाले,  राज्यातील नद्यांचे पाणी शुध्द असणे तसेच नदीमध्ये दुषित पाणी मिसळू नये यासाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे.  चंद्रभागा नदी हा वारकऱ्यांचा श्रध्देचा विषय  आहे.  त्यामुळेच अभियानाची सुरुवात पंढरपूर येथून करण्यात आली आहे.नमामी चंद्रभागा अभियान प्रभावीपणे राबविण्यासाठी नामामी प्राधिकरण स्थापन करावे अशी मागणी त्यांनी यावेळी मुख्यमंत्र्यांकडे केली.  या अभियानात लोकांचा सहभाग महत्वाचा आहे. अभियानाची माहिती सर्वांना व्हावी यासाठी नमामी चंद्रभागा ही वेबसाईट तयार करण्यात येणार असल्याचेही अर्थमंत्री मुनगंटीवार यांनी सांगितले. तसेच नजिकच्या काळात या संदर्भात विकास परिषद आयोजित करण्यात येईल असेही ते म्हणाले.
जलतज्ज्ञ राजेंद्रसिंह राणा म्हणाले, नदीला पुनर्जिवित करण्याचे काम राज्य शासनाने हाती घेतले आहे.  आतापर्यंत न झालेले काम  शासनाने हाती घेतले असून नदीला केवळ पाण्याचे स्त्रोत म्हणून न पाहात अध्यात्मिक स्त्रोत म्हणून पाहून काम केल्यास नमामी चंद्रभागा अभियान राबविण्यास कोणतीही समस्या उद्भवणार नाही. नदीचे स्वच्छ व अविरत वाहती ठेवणे हे राज्याचे दायित्व असले असले तर  सरकारच्या या उपक्रमात लोकांची जबाबदारी महत्वाची असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. तसेच नमामी चंद्रभागा या उपक्रमात वारकऱ्यांनी आपली जबाबदारी पार पाडावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री लोकणीकर म्हणाले, नमामी चंद्रभागा अभियानात पाणी पुरवठा विभागामार्फत सर्वती मदत केली जाईल. तसेच भीमा-चंद्रभागा नदीत  दुषित पाणी मिसळणार नाही याची दक्षता घेतली जाईल.
नमामी चंद्रभागा परिषदेनंतर  निरी, वन विभाग, साबरमती, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण या विभगानी त्यांची सादरीकरण केले.   यावेळी  आमदार भारत भालके,  जळगावकर महाराज,  दैनिक सकाळ सोलापूरचे सहयोगी संपादक अभय दिवाणजी,  पत्रकार संजय वाईकर व डॉ. विश्वनाथ कराडकर यांनी मनोगत व्यक्त केले.
प्रारंभी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते कलश पूजन करुन नमामी चंद्रभागा परिषदेची सुरुवात करण्यात  आली. समारंभास आमदार  गणपतराव देशमुख, सुभाष देशमुख, प्रशांत परिचारक, रामहरी रुपनर, बबनदादा शिंदे यांच्यासह महादेव जानकर व मान्यवर पदाधिकारी, अधिकारी उपस्थित होते.
00000

Share this:

Post a Comment

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.