कोल्हापूर - 'कोल्हापूर येथे डॉ. वीरेंद्र तावडे यांना झालेल्या मारहाणीविषयी लक्ष घालतो. रवी पाटील हे पोलीस अधिकारी जर 'सीबीआय'चे असतील, तर त्यांनी कोल्हापुरात येऊन मारहाण करणे योग्य नाही. यात मी पूर्ण लक्ष घालीन. डॉ. तावडेंना आवश्यक ती सुरक्षा देणे आवश्यक आहेच, त्यामुळे त्यातही मी लक्ष घालतो, कोल्हापूरच्या पोलीस अधीक्षकांशी मी स्वत: बोलतो', असे आश्वासन पोलीस महासंचालक श्री. एस्.पी. यादव यांनी हिंदुत्ववाद्यांच्या शिष्टमंडळाला दिलेे, अशी माहिती सनातन संस्थेचे डॉ. मानसिंग शिंदे यांनी येथील पत्रकार परिषदेत दिली. या वेळी हिंदु विधीज्ञ परिषदेचे अध्यक्ष अधिवक्ता श्री. वीरेंद्र इचलकरंजीकर हेही उपस्थित होते.
या शिष्टमंडळात हिंदु विधीज्ञ परिषदेचे अधिवक्ता श्री. संजीव पुनाळेकर, राष्ट्रीय वारकरी सेनेचे ह.भ.प. बापू महाराज रावकर, गोवंश रक्षा समितीचे श्री. वैभव राऊत, सनातन संस्थेच्या प्रवक्त्या सौ. नयना भगत, रायगड संवर्धन प्रतिष्ठानचे श्री. राजेंद्र सावंत, श्री शिवकार्य प्रतिष्ठानचे श्री. प्रभाकर भोसले, हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्र्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे आणि समितीचे श्री. नरेंद्र सुर्वे यांचा समावेश होता.
शिष्टमंडळाने दिलेल्या निवेदनातील सूत्रे
१. २ सप्टेंबर २०१६ या दिवशी कोल्हापूर पोलिसांनी (जे विशेष तपास पथक स्थापन झालेले आहे त्याचे सदस्य आणि अन्य पोलीस) डॉ. तावडे यांचा ताबा पुण्यातील येरवडा मध्यवर्ती कारागृहातून घेतला आणि रात्री ते त्यांना कोल्हापूर येथे घेऊन आले. तपासाच्या संदर्भात आरोपीचा ताबा घेतल्याची वार्ता खरेतर त्यांनी गुप्त ठेवायला हवी होती; परंतु त्यांची ती फोडली त्यामुळे कोल्हापुरात मोठ्या प्रमाणावर पत्रकारांना ते कळले होते. डॉ. तावडे यांना जिल्हा रुग्णालयात तपासणीसाठी नेण्यात येईल, हे पोलिसांनी पत्रकारांना अगोदरच सांगितल्यामुळे तेथे मोठ्या प्रमाणावर पत्रकार आणि त्यांच्यासमवेतच्या छायाचित्रकारांची गर्दी होती.
२. डॉ. तावडे यांना गाडीतून उतरून घेऊन जात असतांना राजारामपुरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमृत देशमुख यांनी मुद्दामच डॉ. तावडे यांना पत्रकारांसमोर एखादे बक्षीस दाखवतात तसे नेले आणि पत्रकारांना डॉ. तावडे यांची मनसोक्त छायाचित्रे काढू दिली. ही छायाचित्रे अन्य दैनिकात दुसर्या दिवशी प्रसिद्ध झाली आहेत. ज्यात जेमतेम हातभर अंतरावर उभे असणारे छायाचित्रकार चित्रीकरण करत असून अमृत देशमुख त्यांच्यावर काहीही कारवाई करतांना दिसून येत नाहीत. डॉ. भारत पाटणकरांनी सनातनचे कोंम्बिंग ऑपरेशन करू अशा जाहीर धमक्या दिल्या होत्या. त्यामुळे कॉ. पानसरे खून प्रकरण अत्यंत गंभीर आणि समाजभावना दुखावणारे आहे, असे जर सर्वांचे म्हणणे असेल, तर त्या प्रकरणातील आरोपीची कडेकोट सुरक्षा ठेवणे महत्त्वाचे नाही का ? पोलीस निरीक्षक अमृत देशमुख यंच्यावर कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक प्रदीप देशपांडे अथवा आयजीपी विश्वास नांगरे पाटील यांनी कोणतेही कारवाई अद्याप तरी केलेली नाही.
३. पोलीस निरीक्षक अमृत देशमुख यांचा पार्श्व इतिहासही दूषित आहे. हिंदु विधीज्ञ परिषदेचे सचिव श्री. संजीव पुनाळेकर यांनी पानसरे खून प्रकरणातील अल्पवयीन साक्षीदाराला सुरक्षा देण्याविषयी दिलेले पत्र राजारामपुरी पोलीस स्थानकातून फुटलेले होते. त्याचा मोठाच गाजावाजा झाला होता. हे पत्र मुख्यमंत्री कार्यालयातून कोल्हापूर येथे पाठवण्यात आल्याचाही उल्लेख त्यात होता. श्रीमती मेधा पानसरे यांनी खास लक्ष घालून अमृत देशमुख यांची बदली रहित करून घेतली होती. अशा पद्धतीने पारदर्शक तपास न करता एका विचारधारेच्या लोकांना देशमुख यांच्याकडून लक्ष्य केले जात आहे का, असा प्रश्न पडतो. असा समज जर लोकांमध्ये पसरू द्यायचा नसेल, तर त्यांच्यावर कायद्यानुसार कठोर कारवाई करणे नितांत गरजेचे आहे.
४. २ सप्टेंबरला रात्री पोलीस कोठडीमध्ये पोलीस अधिकारी रवी पाटील आणि अमृत देशमुख यांनी मिळून डॉ. तावडे यांना मारहाण केली. ही मारहाण लपवण्यासाठी तपासाधिकारी आणि अपर पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा यांनी न्यायालयात प्रथम रिमांडच्या वेळी डॉ. तावडे यांना ३ सप्टेंबरला उपस्थित करतांना आदल्या रात्रीच्या वैद्यकीय अहवालाची प्रतच सादर केली नाही. न्यायालयाने ती २-३ वेळा मागूनही त्यांनी दिली नाही. शेवटी न्यायाधिशांना ते त्यांचा आदेशात नमुद करावे लागले. यामुळे २ वैद्यकीय अहवालांमध्ये फरक शोधता आला नाही.
५. कायद्याने रिमांडच्या वेळी वैद्यकीय अहवाल देणे आवश्यक असतांनाही सुहेल शर्मा यांनी ही कर्तव्यात कसूर केली असून त्यांच्यावर कारवाई करणे आवश्यक आहे अन्यथा पोलिसांनी काहीही केले तरी चालते, असा चुकीचा संदेश पोलिसांत आणि जनतेत जाईल. याशिवाय रात्री असा तपास करू नये, असा स्वयंस्पष्ट आदेश मुंबई खंडपिठाने याआधीच दिलेला आहे, त्याचेही यात उल्लंघन झालेले असल्याचे स्पष्ट दिसते.
Post a Comment