भामरागड/ रंगय्या रेपाकवार /--
भूमकाल संघटना भामरागड तालुक्यात नद्या तसेच अनेक मोठाले नाले यांचे जाळे विणले गेले असून त्यामुळे अनेक गावांचा आजही तालुका मुख्यालयापासून चार-पाच महिने संपर्क तुटत असतो. त्यामुळे शिक्षण रोजीरोटी,आरोग्य, नोकरी, सरकारी कामे, यासंबंधी अनेक समस्या निर्माण होतात.
या समस्येवर विचारमंथन करण्यासाठी यावर्षी नेलगोंडा गावात मे महिन्यात “नदी-नाला-पूल विकास परिषद” आयोजित करण्यात आली होती.
त्यानंतर या समस्येवर चर्चा करण्यासाठी भूमकाल संघटनेच्या पुढाकाराने जुलै व ऑगस्ट महिन्यात एकंदर सहा सभा (जुवी नाल्याच्या काठावर तीन तर धोडराज येथे तीन) घेण्यात आल्या. शासनावर अवलंबून न राहता “आपला विकास आपण करू” या तत्वावर श्रमदानातून पुलीया निर्माण करण्याचा प्रयोग जुवी नाल्यावर करायचा असा निर्णय नेलगोंडा भागातील अनेक गावांनी घेतला.(घोटपाडी, नेलगोंडा, जुवी, गोंगवाडा, भटपार, कवंडे,कुचेर, परायनार, मर्दा-मालेंगा, मिडदापल्ली,हितलवाडा, दरभा, बोडंगे, ई.) यासाठी लागणारी साधन सामुग्री व तांत्रिक सहाय्य भूमकाल संघटना पुरवेल असे सर्व सहमतीने ठरले. त्यानुसार पोळ्यानंतर श्रमदान सुरु करायचे असे ठरले व जुवी नाल्यावर सिमेंट पाईप देखील टाकण्यात आले.
मात्र नक्षलवाद्यांच्या भामरागड एरिया कमिटीचा कमांडर दिनेश याने मध्यंतरी नेलगोंडा गावाजवळ एक सभा घेऊन लोकांना पुलीया बांधण्यासाठी मनाई केली आणि या कामात पुढाकार घेणाऱ्याला जीवानिशी मारण्याची धमकी दिली. तसेच या भागातील गोटा रेती ई. सामग्री सुद्धा वापरण्यास मनाई केली. त्यामुळे दि. ७ सप्टेम्बर ला धोडराज येथे झालेल्या सभेत संतापाचे वातावरण पसरले होते. या पुलाची नितांत गरज नसूनही नक्षली विनाकारण विरोध करत आहेत अशी चर्चा झाली. पूल-निर्मितीसाठी श्रमदान साधारण दि. १५ सप्टेम्बर ला सुरु होणार होते पण नक्षल्यांच्या धमकीमुळे हे वेळापत्रक गडबडले आहे.
“हा पुलीया होणे ही जनतेची गरज असताना नक्षलवादयानि या पुलाला विरोध करू नये. जर नक्षलवादी खरच जनतेचे पक्षधर असतील त्यांनी या कामाला पाठींबा जाहीर करावा” असे आवाहन भूमकाल संघटनेचे सचिव श्री. दत्ता शिर्के यांनी केले आहे आणि पुलाचे निर्माण कार्य याच महिन्यात श्रमदानातून करणार असे ठामपणे सांगितले आहे.
Post a Comment